Saturday, February 29, 2020

झोप

झोप
प्रसंग ..१
ती सकाळी उशिराच उठली.रात्रभर त्याचाच विचार करीत होती. द्यायचा का होकार त्याला....?? आपल्याला स्वीकारेल... पण सोनूलीला मुलगी म्हणून स्वीकारेल का ...?? तिला तो आवडत होता . तो ही तिच्यापाठी बरेच दिवस लग्न कर म्हणून  मागे लागला होता. खरच त्याला बायको हवीय की माझे शरीर...?? पुढे काय होईल या चिंतेत रात्रभर डोळा लागला नव्हता. जणू झोपच पळून गेली होती 
प्रसंग ..२
फ्लॅटचा दरवाजा उघडून तो बाहेर पडला तेव्हा नुकतीच पहाट झाली होती . आतमध्ये बेडवर ती झोपून होती . बऱ्याच दिवसांनी  ती घरात एकटी होती. दोघेही याच संधीची वाट पाहत होते . एकमेकांच्या मिठीत आणि धुंद प्रणयात रात्र कशी सरली तेच कळले नव्हते .रात्रभर त्यांचा खेळ चालू होता .त्या धुंदीत डोळ्याला डोळा लागला नव्हता. प्रणयाच्या धुंदीत झोपच पळून गेली होती .
प्रसंग ...३
आजची सकाळ त्याच्या आयुष्यात कदाचित  वेगळेच वळण घेऊन येणार होती. हॉस्पिटलच्या जनरल वॉर्डच्या बेडवर झोपून तो विचार करीत होता.छातीत असणारी नेमकी गाठ कसली आहे...याचा निर्णय आज लागणार होता . सहज छातीवरून हात फिरवताना ती बारीक गाठ त्याच्या हाताला लागली होती. मोठी होत गेली तसा तो डॉक्टरकडे आला आणि डॉक्टरने त्याला ऍडमिट होण्याचा सल्ला दिला होता.  कालच छोटे ऑपरेशन झाले आणि ती गाठ तपासणीसाठी पाठवली होती . रात्रभर गाठेचा विचार करता करता झोपच पळून गेली होती.
प्रसंग ...४
सकाळी बायकोने दरवाजा उघडताच नाश्त्याची पिशवी त्याने बायकोच्या हातात दिली आणि आश्चर्याने आ वासलेल्या चेहऱ्याकडे हसून पाहत तो आत शिरला. रात्रभर केलेल्या जागरणाची खूण त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती . काल रात्री बऱ्याच दिवसांनी तो जुगाराला बसला . खिश्यातले दोनशे रुपये संपवून उठायचे असा निश्चय करूनच तो बसला होता. पण आज नशीब जोरावर होते. हळू हळू पत्ता लागत गेला . डाव संपला तेव्हा खिश्यात अडीज हजार रुपये होते आणि बाहेर सकाळ झाली होती.विजयाच्या धुंदीत झोपच पळून गेली होती.
प्रसंग....५
सकाळी हसत हसतच  बिछान्यातून उठला.जणूकाही सकाळ होण्याची वाट पाहत होता. काल रात्री त्याच्या जीवनात अतिशय आनंदाचा क्षण आला होता .दुपारीच त्याच्या पत्नीला प्रसूतीवेदना सुरू झाल्या आणि सासूने तिला ऍडमिट करून त्याला हॉस्पिटलला बोलावून घेतले .तेंव्हापासून तो तिथेच होता . रात्री अकरा वाजता मुलगी झाल्याची बातमी आली आणि तो आनंदाने वेडावला.  लग्नानंतर सात वर्षांनी झालेले पाहिले अपत्य . बायकोच्या चेहऱ्यावरील आनंदाचे भाव पाहून तो डोळे पुसतच घरी आला . बाळाचे कसे करायचे ...??त्याचे नाव काय ठेवायचे .....?? बाळाच्या भविष्याची स्वप्ने पाहत असताना त्याची झोपच पळून गेली.
प्रसंग...६
सकाळी ठीक सात वाजता त्याचा रिलिव्हर त्या ओसाड बंकरमध्ये शिरला.पेंगुळलेल्या डोळ्यांनी त्याने रिलिव्हरच्या सॅल्युटचा स्वीकार केला. रात्रभर तो AK 47 च्या ट्रिगरवर बोट ठेवून बसला होता. रात्री जरा जास्तच गोळाबारी झाली त्यामुळे कोणालाच झोप मिळाली नव्हती . बेकायदेशीर मार्गाने घुसणार्या काही अतिरेक्यांना बहुतेक कंठस्नान घातले होते . सकाळी आलेला रिलिव्हर बहुतेक त्यांची प्रेते शोधायला जाईल. साले ...आमच्या देशात घुसतात .. पण आम्हाला पार करूनच जावे लागेल त्यांना... समोर येणाऱ्या प्रत्येक घुसखोरला गोळ्या घालायच्या या विचारानेच त्याची झोप पळून गेली होती.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment