Monday, February 24, 2020

होळी आणि सुतक

होळी आणि सुतक
रमाकांत सुर्वे सिरीयस असल्याची बातमी इथे  मुंबईत शंकर सुर्वेला कळली आणि तो चिंतेत पडला.
"शिमगो इलो.....आणि ह्या म्हाताऱ्याक काय झाला..."??बायकोने ताटात चपाती ठेवत विचारले आणि शंकर चिडला.
"माका काय माहीत ..?? मी काय त्याचे पाय चेपूक गेलेलो की काय.. .."?? त्याने तडकूनच उत्तर दिले. त्याचे अर्धे लक्ष कॅलेंडर आणि अर्धे ताटात होते . पण यावेळी  एक बोंबील कमी दिला म्हणून बायकोवर चिडला नव्हता तर नेमक्या पालखीला सुतक येईल का ..?? याच्या चिंतेत तो होता.
आता भावकी म्हटली की हे सर्व आलेच .आधीच दरवर्षी भांडून सुट्टी मंजूर करून घेत होता .कोकणातील माणूस शिमग्याला गावी जाणारच.पण यावेळी सुतक आले तर पालखी खांद्यावर घ्यायला मिळणार नाही.
"गो माय...एकदा घरी येऊन जा मग काय त्या म्हाताऱ्याचा कर ... "मनातल्या मनात देवीला गाऱ्हाणे घालत त्याने जेवायला सुरवात केली.
सुपरस्टार विनयकुमारला ही बातमी कळली तेव्हा तो कृष्णाच्या  वेशात शूटिंग करत होता. तसे ही पालखीला कधी जात नव्हता आणि सुयेरसुतकही पाळीत नव्हता.पण लहानपणी ज्याच्या अंगाखांद्यावर खेळलो तो रमाकाका आता सिरीयस आहे हे ऐकताच गंभीर झाला. बऱ्याच कालावधीनंतर त्याला काम मिळाले होते. सुपरस्टारची इमेज हळू हळू लोकांच्या मनातुन उतरत चालली होती. काका अचानक गेला तर गावी जावे लागेल .पालखी लांबेल.....काका मेला तर सर्वच घोळ होईल.माते....काकांचे मरण पुढे ढकल .. असे मनात म्हणत त्याने समोरच्या देवाला नमस्कार केला.
केरळातील नामदेव सुर्वेला फोन गेला तेव्हा तो नुकताच ऑफिसमध्ये येऊन बसला होता . गावाशी फक्त गणपतीला जाण्याचा संबंध असलेल्या नामदेव ला रमाकांत सुर्वेच्या जगण्या मरण्याचे फारसे सोयरसुतक नव्हते.तर आपल्या मुलीच्या बाळंतपणाची काळजी होती . या दिवसात ती बाळंत झाली तर भावकीला कळवावे लागणार होते . मग सुयेर चालू झाला तर पालखी लांबणार त्यात रमाकांत काकाचे काही झाले तर सूयेरात सुतक . मुलीचे पाहिले बाळंतपण म्हणून त्याला जास्त काळजी होती . त्याची केरळीयन पत्नी हे सर्व मानत नव्हती पण गावाशी संबंध ठेवायचा तर सर्वांचे ऐकायला हवे."देवा पोरींचे बाळंतपण आणि रमाकाकाचे मरण पुढे ढकल रे .....असे बोलत ऑफिसमधील गणपतीला हात जोडले .
 कॅनडातील अरविंद सुर्वेच्या घरी फोन गेला तेव्हा तिथे मध्यरात्र झाली होती. अश्यावेळी फोन फक्त भारतातून येऊ शकतो हे त्याला माहित होते.विनय... असे म्हणून ऍनाने त्याच्या हाती फोन दिला तेव्हाच काहीतरी घडलंय असे समजून गेला. रमाकाकाचे ऐकून तोही काळजीत पडला . कॅनडात असल्यामुळे तो हे सर्व काही मानत नव्हता पण कॅनडात जाण्यासाठी रमाकाकाने केलेली मदत तो विसरू शकत नव्हता .गणपतीला जायचा तेव्हा प्रत्येकवेळी त्याने पैसे परत देण्याचे प्रयत्न केले होते पण त्यांनी घेतले नव्हते. त्यांचे उपकार मनात ठेवूनच तो जगत होता.  आता त्यांचे वय झाले होते आणि होळीच्या दिवसात त्यांचे जाणे म्हणजे पालखीचे खरे नव्हते.  म्हणजे काका असे गेले तर भावकी शिव्या घालणार हे नक्की. त्यालाही ताबडतोब भारतात निघावे लागले असते . पण नवीन प्रोजेक्टचे काम शेवटच्या टप्प्यात होते. अश्यावेळी भारतात जाणेही परवडले नसते . परमेश्वरा रमाकाकांचे जाणे काही दिवस पुढे ढकल अशी प्रार्थना करून तो पुन्हा आडवा झाला .
शंकर सुर्वे रोज रमाकांत सुर्वेच्या घरी जाऊन त्याची चौकशी करीत होता . कितीही झाले तरी चुलता होता तो. आईबाबा गेल्यानंतर त्याचाच आधार होता त्याला . त्याची आणि त्याचा भावांची काळजी घेतली होती त्याने. अश्या माणसाला अंथरुणात खिळलेले पाहून जीव तुटत होता त्याचा . आपल्यापरीने जमेल तितकी सेवा चालू होती त्याची . पण आता परिस्थिती फारच बिघडली होती . त्याचे हाल बघवत नव्हते .सगळेच विधी बिछान्यात ....आपल्या सर्व भावाना फोन करून तो सिरीयस असल्याची बातमी कळवली होती. आताही तो  म्हाताऱ्याला साफ करून त्याचे कपडे... अंथरूण... बदलून घरी आला. झोपताना देवापुढे हात जोडून म्हणाला "काकांना लवकर घेऊन जा रे बाबा . बिचाऱ्याचे हाल पाहवत नाहीत..
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment