Wednesday, February 12, 2020

वचन

वचन
आज तिची मुलगी डॉक्टर झाली.पदवीदान समारंभात ती दाटलेल्या कंठानी आपल्या लेकीकडे पाहत होती .  प्राध्यापक तिचे कौतुक करताना थकत नव्हते . बापविना वाढलेली पोर आईने किती कष्ट घेऊन तिला वाढविले होते याचीच चर्चा सगळीकडे चालली होती. सगळीकडून होणाऱ्या कौतुकाच्या वर्षावात मायलेकीने  एकमेकांना मिठी मारली.आज तिच्या डोळ्यात मुलीबद्दल अभिमान स्पष्ट दिसत होता . 
घरी येता येता ती भूतकाळात हरवून गेली . 
त्या कोवळया वयात मिळालेले प्रेम म्हणजे तिला स्वर्गच मिळाल्यासारखे झाले होते.आपला जोडीदार आपल्याशीच एकनिष्ठ आहे याची तिला खात्री होती . पण उपयोग संपताच त्याने तिला आपल्या आयुष्यातून  बाहेर फेकून दिले होते . ती हताश झाली . अबोर्शन आता शक्य नाही असा डॉक्टरकडून निरोप आला आणि ती हादरली.
पण एक देवदूत तिच्या आयुष्यात आला . होय.... देवदूतच होता तो.मोजून तीन वर्षांचे आयुष्य होते त्याला. त्याला पत्नी ..संसार ..हवा होता आणि हिला बाळासाठी बापाचे नाव . त्यासाठी दोघांनीही समजोता केला.
मरेपर्यंत तुला स्पर्श करणार नाही आणि मृत्यूनंतर सगळे होणाऱ्या बाळाच्या नावावर करेन हे वचन त्याने  शेवटपर्यंत पाळले. 
पण तो गेल्यावर ही पुन्हा एकटी झाली.जोडीला दोन वर्षांची सोनूली.नवऱ्याच्या जागेवर नोकरी.. हाच एकमेव आधार.मरणापूर्वी त्याने मुलीला काहीही करून डॉक्टर बनव असे वचन घेतले.आता ते वचन पाळायची अवघड जबाबदारी तिच्यावर आली.
जमेल तसे तिने मुलीला शिकवले. बाप आजारपणात लवकर गेला आणि म्हणून तुला डॉक्टर बनायचे आहे हे तिच्या मनावर बिंबवित राहिली.पुढे मोठी होताच तिनेही आईला डॉक्टर बनेन असे वचन दिले.
आता खरोखरच एकमेकांच्या वचनात सगळे बांधले गेले होते . 
पण डॉक्टर बनायचे हे नुसते ठरवून होत नाही . शिक्षणासाठी पैसे ही लागतात. ते पैसे कसे उभारायचे या विवंचनेत  तिने सामाजिक संस्थेत हेलपाटे घालायला सुरवात केली.
शेवटी एक संस्था तिच्या मुलीच्या शिक्षणासाठी पुढे आली. कोणीतरी अनमिकांने तिच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली आणि तिने सुटकेचा निश्वास टाकला.
आज मुलगी डॉक्टर झाली होती आणि त्या संस्थेकडून तिला त्या दानशूर व्यक्तीला भेटायला जा असा निरोप मिळाला .मुलीला घरी सोडून ती त्याला भेटायला निघाली . 
  त्या उंची सोसायटीतील शेवटच्या मजल्यावरील एकमेव फ्लॅटची बेल तिने दाबली . एका नोकराने दरवाजा उघडला. ती आत शिरली  आणि त्याला पाहून  हादरली.आत तो होता . तीच बेफिकीर नजर, घायाळ करणारे हास्य . 
"अभिनंदन .. !! मुलगी डॉक्टर झाली .... "तो हसत उद्गारला .
"म्हणजे तूच तो... मदत करणारा ...?? ती ओरडली . का केलेस असे ..?? का आलास माझ्या आयुष्यात..?? हुंदके देत तिने विचारले .
"तुला सोडले त्यानंतर माझ्या आयुष्यात अनेक मुली आल्या. पण सगळ्या पैश्यासाठी जवळ आल्या .शेवटी कंटाळा आला आणि शेवटी लग्न केले . बायको सालस सुंदर होती . पण शेवटी माझ्या पापाची फळे तिने भोगली . एक दिवस मोटार अपघातात ती गेली आणि मी जखमी झालो. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून मला वाचविले .पण माझे पौरुषत्व वाचवू शकले नाहीत . यापुढे आयुष्यात कोणत्याही स्त्रीचा मला उपयोग नाही हे कळले. काही महिन्यांनी सावरलो . मग तुझा शोध घेतला . मुलीला डॉक्टर बनविण्याची इच्छा आहे हे कळले आणि मी मदत करायला पुढे झालो. शेवटी माझी ही मुलगी आहे ती पण या पुढे तुझ्या आयुष्यात कधीही येणार नाही मी हे वचन देतो तुला . असे बोलुन त्याने व्हीलचेयर पाठी फिरवली .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment