Thursday, February 13, 2020

किस डे

किस डे
"आज कोणता दिवस आहे ...."?? त्याने फोनवरून तिला विचारले.
"जा हो तुम्ही... .. नको ते सुचत असते तुम्हाला नेहमीच... ..आजूबाजूचे ऐकून काय म्हणतील ".तिने लाजून उत्तर दिले .
"अग कोण ऐकणार आहे ...... खूप दिवसानी मोबाईला रेंज आलीय इथे. त्यामुळे जो तो मोबाईल कानाला लावून घरी बोलत बसलाय.." तो म्हणाला.
"अग बाई ...!!  सगळेच फोनवर...??  मग समोरच्या शत्रूवर लक्ष कोण ठेवतेय..??  आता हे सांगू नका की सीमेपालिकडे ही आताच मोबाईलची रेंज आलीय.........." .ती ही चिडवत म्हणाली.
"मॅडम... आमचे तोंड चालत असले तरी एक बोट ट्रिगरवर आणि नजर समोर आहे म्हटलं ..शेवटी देश ही तुमची सवत आहे हे नेहमी लक्षात ठेवा.."त्याने हसत उत्तर दिले.
"हो का....!!  मग तिलाच विचारा आज कोणता दिवस आहे..."?? तिने लटक्या रागानेच उत्तर दिले . 
"हाय.. हाय ...!! रागावल्यावर तू नेहमीच सुंदर दिसतेस .आताही डोळ्यासमोर उभी राहिलीस बघ......" तो रंगात येऊन म्हणाला . 
"चला काहीतरीच तुमचे .. सासूबाई बघतायत म्हटलं .."ती कुजबुजली.
 "मग सांग आज कोणता डे आहे...??  नाहीतर आईलाच विचारतो.. दे तिला ...." तो ओरडून म्हणाला.
"गप्प बसा हो .. किती हा  चावटपणा .... मुले मोठी झाली आता काही वर्षांनी सून येईल घरात तरी तुमचा तरुनपणा कमी होत नाही .. "ती चिडून म्हणाली . 
"आम्ही जवान आहोत ..म्हातारे कधीच होणार नाही...."त्याने गर्वात म्हटले.
"का सतावतायत मला .... एक तर किती दिवसांनी तुमचा आवाज कानावर पडला आणि मग ही भाषा .. कोणताही दिवस असू दे .. तुम्ही बोलता तो दिवस माझ्यासाठी प्रेमाचा ...."ती भावुक होऊन म्हणाली . 
"माहितीय ग राणी ....पण हेच अजून स्पष्ट बोललीस तर माझा दिवस चांगला जाईल ....."तो अजूनही थट्टेच्या मूड मध्ये होता .
"तुम्ही सुधारणार नाही.असेच सूचक बोलता येते फक्त.आईला कालच डॉक्टरकडून घेऊन आलीय. गोळ्या बदलल्या तिच्या .आता बरे वाटते म्हणाली. हो सांगितले मी तिला तुमचा फोन आहे तसे हात हलवून तुम्हाला आशीर्वाद दिलाय... मी काय म्हणते ..जमले तर लवकर या . आईचे काय खरे वाटत नाही..."  ती काळजीने म्हणाली .
"बघतो... पण शब्द देत नाही. प्रत्येकाला घरची काळजी असते... प्रॉब्लेम असतात.सर्वच असे ठरवत बसले तर इथे कोण राहील .शेवटी देशाच्या प्रति कर्तव्य आहे म्हणूनच इथे या रणरणत्या उन्हात बंदुकीच्या चापावर बोट ठेवून बसलोय ना ...मी कारणे देऊन सुट्टी घेऊ शकत नाही आणि आईही एका सैनिकांची बायको होती... आणि तिचा मुलगा ही सैनिक आहे . तिला काहीच वाटणार नाही उलट मध्येच सुट्टी घेऊन आलो तर चिडेल .."त्याच्या आवाजात कडकपणा आला .
"हो ...पण आपल्या चिरंजीवाला आहे का काही ... सकाळीच बाहेर पडलाय . मोबाईलवर कोण्या तरुणीचा फोटो आहे . विचारले तर म्हणतो मैत्रीण आहे . हल्ली आठवडाभर सकाळी उठून बाहेर जातो . छोटीला विचारले तर म्हणाली व्हॅलेंटाईन विक चालू आहे . त्या दिवशी दोन टेडी बियर  घेऊन आला . म्हणतो गिफ्ट मिळाल्या ... तिने तक्रारीचा सूर लावला 
"आता आलीस लायनीवर .. सांग मग आज कोणता दिवस आहे .... "त्याने पुन्हा हसत विचारले .
"जा हो तुम्ही .. किती छळता.. समोर आलात तर जास्त बोलत ही नाहीत. किती खाणाखुणा केल्या तरी लक्ष नसते बाहेर असल्यावर बरेच काही सुचते तुम्हाला आणि मी का लक्षात ठेवू आज कोणता दिवस आहे ....?? ते ही तुम्ही  समोर नसताना.."?? ती पुन्हा चिडली .
"हो का ..?? मग त्या दिवशी रोझ डे चा मेसेज कोणी केला मला ....'??  तो खट्याळपणे म्हणाला .
"तो मेसेज मला मैत्रिणीने पाठविला म्हणून तुम्हाला फॉरवर्ड केला"तिने पटकन उत्तर दिले.
"मग आजही मैत्रिणीने मेसेज पाठविला असेलच . बोल ना कोणता दिवस आहे आज .उद्या व्हॅलेंटाईन डे आहे . हे तरी माहीत आहे ना ....."??त्याच्या बोलण्यात कौतुक होते .
"हो... ते तर लक्षात ठेवावे लागते .कारण तुम्ही कधीच घरी नसता अश्या वेळी. मग तुमची आठवण काढीत दिवस काढावा लागतो आणि मेला त्या दिवशीच तो दिवस लवकर संपत नाही ... "ती दाटलेल्या कंठाने म्हणाली .
"माफ कर प्रिये ... संसारात बरेच असे आनंदाचे क्षण मी तुला कधीच देऊ शकलो नाही . या देशसेवेच्या व्रतात माझ्याबरोबर तुझीही फरफट झाली..."त्याचा स्वर गंभीर झाला 
"असे नका हो बोलू ...आज तुमच्यामुळे आम्ही समाजात ताठ मानेने वावरतोय.मुलांना तुमचा गर्व वाटतो आहे .माझी सवत मला प्राणांहून प्रिय आहे........." ती अश्रू रोखीत म्हणाली .
"हो ना .. मग आज सांग कोणता दिवस आहे ...."तो पुन्हा मूडमध्ये येत म्हणाला 
"तुम्ही म्हणजे ना .. खूप हट्टी झालायत ...बर बाबा सांगते..." ती हसत म्हणाली
"आता सांगू नकोस कृती करून सांग. फोनवर कळेल मला ...." त्याने अजून चिडवले .
"किती सतावतायत हो .... आज भारीच मूड दिसतोय स्वारीचा .. आज किस डे आहे म्हणून इतकी लाडी गोडी आहे ना ...थांबा डोळे बंद करा देते ... "ती मनोमन मोहरत म्हणाली.
इतक्यात फोन मधून गोळीबाराचा आवाज ऐकू येऊ लागला .
"आहो काय झाले ...?? कसला आवाज हा .. ..??कुठे आहात तुम्ही .. ..?? किस हवा ना ...?? बोला काहीतरी बोला ...?? त्या निर्जीव फोनमध्ये ती एकटीच ओरडत राहिली .

© श्री . किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment