Thursday, August 15, 2019

रक्षाबंधन ...2019

रक्षाबंधन ...2019
तसे ते दोघे भाऊबहीण. पण दोन टोकाचे.तो प्रचंड मस्तीखोर...तापट..उर्मट... तर ही शांत पण अन्याय सहन न करणारी . दोघांच्या वयात फारसे अंतर नव्हतेच .आईवडील त्याचा मस्तीखोर तापट स्वभाव सहन करीत होते . हिलाही समजावत होते. हा नेहमीच तिच्या वस्तू वापरीत असे.तिचा टॉवेल,तिचा बॉडी स्प्रेसुद्धा . ती तर त्याला नजरेसमोरही ठेवायची  नाही. आईवडील लक्ष देऊ नकोस असे म्हणायचे.कॉलेजला जातानाही तो तिला कोपऱ्यात मित्रांसोबत गप्पा मारताना दिसे . तिला पाहून हात दाखवायचा तसेच मोठ्याने ओरडून तिला हाकही मारायचा  . मैत्रिणी समोर तिला लाज वाटत असे पण ह्याला त्याचे काही वाटत नसे.
त्यादिवशी ती मैत्रिणीसोबत देवळात गेली होती. दर्शन झाल्यावर काही वेळ बसली असताना मागून तिच्या कुटुंबविषयी दोघीजणी काहीतरी बोलत असल्याचे ऐकू आले. सावध होऊन ती ऐकू लागली.."अग  एकच मूल त्यांचे आहे.दुसरे रस्त्यावरून उचलून आणले आहे " एक दुसरीला सांगत होती ."खर की काय ..?? पण कोणाला उचलून आणलय . तिला की त्याला ..?? दुसरीने आश्चर्याने विचारले. ते माहीत नाही पण हॉस्पिटलमधून आणताना दोघांना आणले .ते मी स्वतः पाहिले.पण त्यातले एक मूल त्यांचे नाही हे नक्की".
ते ऐकून तिला धक्काच बसला.आपल्यातील एक दुसऱ्याचे आहे ...?? विचारूया का आईला ...?? आपण की तो ...?? नाहीतरी त्याची वागणूकच तशी आहे . खरोखरच रस्त्यावरचे आनुवंशिक गुण आहेत त्याच्यात .तोच असणार नक्की .काहीतरी विचार करून ती उठली आणि एका तिरमिरीत आई समोर उभी राहिली. "तो आपल्यातील नाही ना ...?? त्याला तुम्ही रस्त्यावरून उचलून आणले आहे ना ...?? म्हणून तो असा वागतो. सर्वांशी फटकून.कोणाबद्दल प्रेमच नाही त्याच्या मनात . मी आजपासून त्याला राखी बांधणार नाही.भाऊबीज ही करणार नाही ..."ती संतापाने धुसफूसत होती." वेड लागले आहे का तुला ..?? तुम्ही दोघेही आमचीच मुले आहात उगाच कोणाचेही ऐकू नकोस". पण तिचा राग शांत झाला नाही . पाय आपटीत ती आपल्या रूममध्ये निघून गेली.
आज रक्षाबंधन ... तसेही तिला तो असूनही कधी राखी बांधावीशी वाटलीच नाही . ती तयार होऊन बाहेर निघाली तरीही तो अंथरुणातच होता."भाऊ असून काही कामाचा नाही"असे पुटपुटतच चपला घालून बाहेर पडली . त्याचे तोंड पाहायला नको म्हणून ती मुद्दाम बाहेर वेळ काढीत राहिली.संध्याकाळी अचानक घरून फोन आला.फोनवरची बातमी ऐकताच ती हादरली .मैत्रिणीला घेऊन ताबडतोब हॉस्पिटलमध्ये आली . वॉर्ड बाहेरच तिचे आईवडील उभे होते . वॉर्डमध्ये डोकावून पाहिले तर हा शांतपणे झोपला होता . कपाळावर भले मोठे बँडेज ...हाताला प्लास्टर.
"याला रक्त द्यायचे आहे ...कोण तयार आहे ..."?? डॉक्टर आई वडिलांना विचारत होता."आम्ही दोघेही तयार आहोत ..आमच्यापैकी एकाचे मॅच होईलच"बाबा डॉक्टरला म्हणाले."काहीही काय ..?? रस्त्यावरच्या मुलाला आईबाबांचे रक्त कसे मॅच होईल.." ती मनात म्हणाली.थोड्या वेळाने आई बाहेर आली . "तुझे बाबा रक्त देतायत"आई तिला म्हणाली ."काहीतरी काय आई..... ..?? बाबांचे रक्त कसे मॅच होईल ..?? तो थोडाच आपल्या रक्ताच्या नात्याचा आहे .."??आई चिडून काही बोलणार इतक्यात पोलीस इन्स्पेक्टर त्यांच्याजवळ आला." आम्ही सर्वांचे स्टेटमेंट घेतले आहे. तुमच्या मुलाची काही चुकी नाहीय . काही मुले त्या मुलीची रोज छेड काढायचे आज नेमके ह्याच्या पुढ्यात घडले आणि हा त्यांना समजवायला गेला तेव्हा प्रकरण मारामारीपर्यंत आले . त्यातील एक मुलगा इथेच ऍडमिट आहे उरलेल्या दोघांना शोधू आम्ही .खूप भाग्यवान आहात तुम्ही ..अन्यायाची चीड असणारा मुलगा तुम्हाला लाभला आहे.लवकरच अटक करू त्या मुलांनाही. त्या मुलीनेही याच्या बाजूने स्टेटमेंट दिले आहे ...".हे ऐकून तिला धक्का बसला."बघ तुझ्या भावाचा पराक्रम....आज त्याने एका मुलीची अब्रू वाचवली आहे . दरवेळी म्हणतेस ना हा रस्त्यावरचा आहे पण खरी रस्त्यावरची तूच आहेस.हॉस्पिटलमध्ये याचा जन्म झाला त्याच्या दोन दिवस आधी तुझा जन्म झाला होता . बाहेरच्या पाळण्यात तुला कोणतरी ठेवून गेले होते . मुलाला बहीण मिळावी म्हणून आम्ही तुला घेतले. आम्हाला माहितीय तो कसाही असला तरी मनाने चांगला आहे .तुझ्यावर बारीक लक्ष ठेवून असतो तो . नात्यांचा दिखावा करण्यापेक्षा ती मानणे महत्वाचे असे म्हणतो तो..जा भेट त्याला.
ती धावतच त्याच्या जवळ गेली. तो शांतपणे पडला होता . नजर वरच्या फिरणाऱ्या पंख्यावर . तिची चाहूल लागताच त्याने  तिच्याकडे नजर वळवली . तिला पाहताच तेच चीड आणणारे हास्य त्याच्या चेहऱ्यावर पसरले  आणि हात नेहमीसारखा हलला . पण यावेळी तिला राग आला नाही उलट त्यांच्यासारखेच हसून तिने त्याला प्रत्युत्तर केले . ती त्याच्या जवळ बसली ..हात हाती घेऊन सॉरी म्हणाली .त्याने हळूच उशीखालून छोटी साधीशी राखी काढली आणि तिच्या समोर केली.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment