Wednesday, August 28, 2019

फॅशन डिझायनर

फॅशन डिझायनर
"च्यायला....!!  ह्या धंद्यात काही राम राहिला नाही बघ..."हातातल्या कापडावर कैची चालवत रमेश राणे वैतागून म्हणाला.
"साल्या ...कोणी बनायला सांगितले होते तुला फॅशन डिझाईनर ...." मासिकातील स्त्रियांचे फोटो डोळे फाडून पाहत विक्रम म्हणाला.
" हा भाऊ ....?? माझ्याकडे बोट दाखवून स्पष्ट आवाजात रमेश म्हणाला आणि मन लावून मसाला डोसा खाणारा मी ..खाडकन भानावर आलो . "काहीतरी बोलू नकोस रम्या ...नाक्यावरुन जाणारी प्रत्येक स्त्री नजरेखालून गेली पाहिजे असा तुझाच हट्ट होता आणि ते प्रकरण तुझ्या घरी जाऊ नये म्हणून तुला ही आयडिया दिली .."
"हो.... आणि त्याचा वचपा म्हणून महिन्यातून एकदा हे असे चापून चोपून जातायत.." माझ्या हातातील मसाला डोश्याकडे बोट दाखवून रमेश ओरडला.
"तुझे नशीब चांगले आहे की बाजूच्या फास्ट फूडच्या जागी बार नाही .नाहीतर विचार कर किती बिल भरावे लागले असते.." विक्रम शांतपणे म्हणाला.
"आयला... दोस्त आहात की दुश्मन...?? एक तर धंदा होत नाही . टॅक्सेस आणि महागाई वाढतेय . रमेश चिडून म्हणाला.
" बदल कर मित्रा ..नवीन बदल स्वीकार कर ..."मी पाणी पीत म्हणालो .
"तुम्ही आल्यावर एकही कस्टमर माझ्याकडे फिरकत नाही हा बदल मी स्वीकारला आहे .."छद्मीपणे रमेशने उत्तर दिले .मी काही न बोलता त्याच्या टेबलवरचे मेन्यूकार्ड उचलले आणि नवीन काही मिळेल का ते पाहत बसलो .
इतक्यात एक सुन्दर तरुणी हातात छोट्या कुत्र्याला घेऊन आत शिरली.तो व्होडाफोनच्या जाहिरातीत दिसणारा कुत्रा आम्हाला पाहूनच गुरगुरायला लागला. "कूल डाऊन बेबी...अंकल कुछ नही करेंगे ."ती गोड आवाजात कुत्र्याशी बोलत होती.अंकल म्हणताच मी आणि विक्रमने चमकून एकमेकांकडे पाहिले आणि ओशाळवाणे हसलो .तिने हातातील बॅग रमेशपुढे ठेवून म्हणाली" देखो ...कोई लेटेस्ट स्टाईल में बताओ"
आता रमेशमधील प्रोफेशनल जागा झाला . बॅगेतून कपडा काढीत त्याने तो मोजला आणि वेगवेगळ्या डिझाइन दाखवायला सुरवात केली . तिने त्यातून दोन तीन डिझाइन निवडल्या आणि त्यातून एक डिझाईन तयार केली.त्या दरम्यान तो कुत्रा जणू आम्ही गुन्हेगार आहोत अश्या तऱ्हेने आमच्यावर लक्ष ठेवून गुरगुरत होता. मध्येच ती प्रेमाने त्याची पप्पी घेत होती आणि आम्ही उसासे सोडत होते.शेवटी रमेशचे आटपत आले.
"ये एक ट्रायल पीस है. अच्छा लगा तो और बनाऊगी ..."?? तिने गोड हसत रमेशला सांगितले. "और बचा हुवा कपडा मॅडम ...."?? रमेशने विचारल. "रखो आपके पास.." तिने सहज सांगितले.
"बुरा न मानो तो एक बात बोलू ...?? अचानक विक्रम म्हणाला आणि तिने प्रश्नार्थक चेहरा केला ,"वो बचे  पीस में आपके कुत्तेको एक ड्रेस बनाके ले लो .एक नया स्टाईल ....."
मी उठून बाहेर पडण्याच्या तयारीत राहिलो . तर रमेशने पटकन बिल बनवून तिच्या हातात दिले.
" आप कहना क्या चाहते हो अंकल...." ?? तिने कुत्र्याला जवळ ओढत विचारले.
"आजकल अपने पेटस के लिये बहोत सारे लोक ड्रेस बनवाते है. आप भी बनाओ ..."असे बोलून त्याने हातातील मोबाईलवरून बऱ्याच इमेजेस तिला काढून दाखविल्या.आम्ही ही कुतूहलाने त्याच्या मोबाईलमध्ये डोकावले . त्यात अनेक पाळीव प्राण्यांच्या विविध ड्रेस घातलेल्या इमेजेस होत्या.
"ओह...!!  सो स्वीट ...."ती तोंडावर हात ठेवून चित्कारली," आप ऐसें बना सकते हो ...."?? तिने रमेशला विचारले .
"क्यू नही....??  ही इज  ए एक्सपर्ट "विक्रम रमेशच्या पाठीवर थाप मारीत म्हणाला.
" ठीक है... इसके लिये एक बनाओ ...??
विक्रमकडे रागाने पाहत रमेशने कुत्र्याचे माप घेतले . त्याचेही बिल बनवून तिच्या हातात ठेवले . ती विक्रमला बाय करून जाताच  रमेश म्हणाला "चला......  आता निघा ....नाहीतर अश्याच आयडिया काढून मला धंद्याला लावाल "आम्ही दोघेही हसत हसत बाहेर पडलो .
पुढचे दोन महिने काही आम्हाला रमेशकडे जायला मिळाले नाही. एक दिवस ठरवून आम्ही दोघे त्याच्याकडे गेलो. तिकडे गेलो आणि पाहतो तर काय....?? आमचा नेहमीचा फास्टफूडवाला गायब होता . रमेशकडे मात्र तीन चार स्त्रिया बसल्या होत्या . बर्याचजणींकडे वेगवेगळे कुत्रे होते  तर एकीकडे ती केसाळ मांजर होती . रमेश उत्साहाने त्यांना काही फोटो दाखवीत होता . आणि त्यांच्या प्राण्यांचे माप घेत होता . आम्हाला पाहताच त्याने हात हलवून बसायला सांगितले . त्या पाळीव प्राण्यांकडे पाहत आम्ही अंग चोरुनच बसलो .काही वेळाने सर्व निघून गेले तसा रमेश आमच्याकडे आला .मी नेहमीप्रमाणे फास्ट फूड च्या दुकानाकडे नजर वळवली तसा रमेश म्हणाला" भाऊ ...दुकान विकले गेले आहे ते ...आज दुसरीकडे जाऊ " आणि हसला.
विक्रम आश्चर्याने म्हणाला" काय  रमेशभाई धंदा जोरात आहे तुमचा.  कोणाचे कपडे शिवतायत नक्की ...??
रमेश हसून म्हणाला." ही सर्व आपली कृपा विक्रम साहेब.त्यादिवशी तुम्ही काडी टाकून गेलात आणि त्या बाईच्या कुत्र्याचे कपडे मला शिवावे लागले.मीही रागात ते शिवले आणि चांगले दोन हजारचे  बिल लावले. पण ती बाई इतकी खुश झाली की तिने ओळखीच्या तीन चार बायकांना ते  दाखविले . मग काय मी त्यांच्याबरोबर त्यांच्या पाळीव प्राण्यांचेही कपडे शिवू लागलो .आता तर बायकांचे कमी आणि त्यांच्या पाळीव प्राण्यांचेच जास्त कपडे शिवतो. गेले दोन महिने मी फुल बिझी. स्टाफ वाढवावा लागला . एक ट्रेनर ठेवावा लागला . भाऊ तुझा तो फास्ट फूड वाला आहे ना ...?? त्याचेही दुकान मीच घेतले आहे . आता तिथे मी पेट फूड उघडणार आहे . शिवाय एका प्राण्यांच्या डॉक्टरला कन्सल्टंट म्हणून ठेवणार आहे . हल्ली मी गूगल वरून रोज वेगवेगळे प्राण्यांचे ड्रेस शोधतो ,डिझाईन करतो . एकूण काय तर स्त्रियांपेक्षा त्यांच्या पाळीव प्राण्यांचे ड्रेस शिवण्यात भरपूर फायदा आहे . चला....आजची पार्टी माझ्याकडून .पण उद्यापासून सहा महिने येऊ नका . कारण एखादया कुत्र्याने चावा घेतला तर मी जबाबदारी घेणार नाही "
बंद फास्टफूडच्या दुकानाकडे पाहत मी विक्रमच्या खांद्यावर हात टाकून बाहेर पडलो.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment