Tuesday, August 20, 2019

इच्छा


इच्छा
"भाऊ......." खालून बंड्याची हाक आली आणि मी गॅलरीत आलो." चला... विशूकाकांकडे जायचे ना.."? तसा मी डोक्यावर हात मारला."च्यायला..!! विसरलोच मी .. बरे झाले आठवण केलीस. चल आलोच.." असे बोलून मी खाली उतरलो.
विसू माझा आणि विक्रमचा बालपणापासूनचा मित्र. महिन्यातून एकदा दोनदा त्याच्या वडिलांना विठूभाऊना भेटायला आम्ही जायचो . विठूभाऊचे वय साधारण  पंच्याऐंशीच्यावर ..घरातच हिंडत फिरत असत. आलेल्यांशी गप्पा मारायचे. त्यांच्याकडे वेळ मिळेल तेव्हा फेरी मारायची असा बंड्याचा आग्रह. दहा मिनिटांनी काय होणार ...??जग कुठे बुडणार आहे ...?? कामे होतच राहतील . पण त्यांना आनंद मिळतो ना ...?? हा त्याचा सरळ हिशोब . महिन्यात साधारण एक तास त्यांच्यासाठी दिला असे म्हणून हसतो. त्यामुळे मी त्याच्या बरोबर जातो.आजही त्यांना भेटायला निघालो होतो .
रस्त्यात थांबून बंड्याने पाव किलो फरसाण आणि पाव किलो मावा बर्फी घेतली. त्याच बरोबर त्याने थोडे फरसाण आणि बर्फीचा एक तुकडा वेगळा बांधून घेतला . मी नेहमीप्रमाणे मनात हसलो.काही वेळातच आम्ही विशूच्या दारात होतो . आम्हाला पाहताच वहिनी खुश झाल्या" आले हो तुमचे मित्र ..."सासऱ्यांकडे वळून बघत तिने आवाज दिला.आम्हाला पाहताच विठूभाऊ उठले ."काय बंड्या....." असे म्हणत त्याला मिठी मारली."च्यायला ....!! बंड्यावर इतके प्रेम ...?? बहुतेक नंतरची ऑर्डर बंड्यालाच मिळणार " मी मनात म्हणत हसलो.आम्ही त्यांच्या शेजारी बसलो. हातातील खाऊ बंड्याने वहिनीकडे दिला." अरे कशाला इतके ..."म्हणत तो ताबडतोब आत नेला."बाबांना चालत नाही रे हे ...." खूप त्रास होतो त्यांना . फरसाण खाऊन दिवसभर खोकत राहतात . आणि बर्फी खाऊन साखर वाढते मग दिवसभर वेड्यासारखे वागतात. त्या दिवशी आईसस्क्रिम मागत होते पण सर्दी होईल म्हणून नाही दिला. उगाच त्याच्या शरीराला त्रास नको"असे बोलून आत गेली.
"च्यायला...!!  म्हाताऱ्याची जवळजवळ सगळी लाकडे स्मशानात गेली तरी त्यांना मनासारखे वागू देत नाहीत . आता ह्या वयात पथ्य पाळून शंभरी पूर्ण करणार आहेत का ...?? की एव्हरेस्टवर जाणार आहेत ..."असे बोलत बंड्याने हळूच खिश्यातील दोन पुड्या काढून विठूभाऊंच्या हातात सरकावल्या. भाऊंनी  इकडे तिकडे पाहत उशीखाली ठेवल्या. मग हळूच म्हणाले "पुढच्यावेळी गुलाबजाम आणि शेगावची कचोरी आण .आणि माझ्याकडे बघून डोळे मीचकवले. मीही हसून इकडे तिकडे पाहिले.
"बंड्या... तू आहेस म्हणून मनासारखे खायला मिळते रे बाबा. अरे काहीतरी होईल .तब्बेत बिघडेल असे ऐकून घेत रोज वरणभात आणि पालेभाज्यांच खातोय.  अरे ह्यासाठीच दीर्घ आयुष्य हवे का ...?  आयुष्यभर पथ्य पाळून संसार केला.आता शेवटच्या दिवसात तरी मनासारखे जगू दे".असे म्हणत बर्फीचा छोटा तुकडा हळूच तोंडात टाकला.
वहिनीने दिलेला चहा पिऊन आम्ही निघालो . बिल्डिंगखालीच विशू भेटला."काय भाऊ ...?? भेटले का बाबा ...?? मजेत आहेत ना ..?? बंड्या ...!! यावेळी चोरून काय दिले बाबांना ..."?? विशू हसत म्हणाला .तसे आम्ही उडालो.बंड्याने डोके खाजवत खाली मान घातली."अरे वाईट वाटून घेऊ नकोस.माहितीय मला सर्व . तुम्हाला काय वाटले मी त्यांचे मन मारतोय . ह्या शेवटच्या दिवसात त्यांना पथ्य पाळून जगवतोय.त्यांचा त्रास ....त्यांची सेवा ...करायला लागू नये म्हणून त्यांना अडवतोय ...??  तसे नाही रे .. अरे त्यांचे घरात असणेच आम्हाला धीर देते .  आम्हाला एकटेपणा  येऊ देत नाही . उलट कोणतेही संकट आले तरी ते पाठीशी आहेत हीच भावना आम्हाला सामना करायला पुरेशी पडते . म्हणूनच आम्हाला ते हवे आहेत . माझ्याकडून त्यांच्या अश्या इच्छा पूर्ण करणे जमणार नाही .पण तू त्या पूर्ण करतोयस याचा आनंद होतोय . पुढच्या वेळी त्यांना काय हवेय हे विचारलेस ना ?? आणि आम्हाला यातील काहीच माहिती नाही हा त्यांचा विश्वास कायम राहू दे ...अरे म्हाताऱ्याने आमच्यासाठी काय कष्ट केलेत ते विसरलो नाही आम्ही ".
मी प्रेमाने विशुला मिठी मारली आणि त्याने बंड्याच्या पाठीवर प्रेमाने थाप मारली . आमच्या लक्षात येऊ न देता अलगत डोळे पुसले .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment