Wednesday, August 28, 2019

देशसेवा

देशसेवा
त्या बंद खोलीत ते पाचजण एकत्र जमले होते . पाचही जणांची निवड देशाच्या कानाकोपर्यातून अतिशय जाणीवपूर्वक करण्यात आली होती.देशातील  उत्कृष्ट दर्जाचे खास कमांडो होते ते.त्यातील कोणीही एकमेकांना ओळखत नव्हते आणि त्याची गरजही भासत नव्हती.आपल्यावर सोपवलेली कामगिरी पूर्ण करायची आणि रेजिमेंटमध्ये परत फिरायचे हेच त्यांचे काम . खडतर ट्रेनिंग आणि खंबीर मन यामुळे चेहऱ्यावर कठोरता दिसत होती .समोरच्या स्क्रिनकडे आणि बोलणाऱ्या लीडरकडे लक्षपूर्वक पाहत होते .लीडरने त्यांना सांकेतिक नंबर दिले होते . तो काश्मीरमधील एका दहशतवादी तळाचे चित्रीकरण त्यांना दाखवीत होता . आपल्या जवानांची हानी होऊ नये म्हणून मोजकेच कमांडो वापरायचे असे धोरण सरकाने जाहीर केले आणि म्हणूनच फक्त पाच जणांना यासाठी निवडले गेले होते .अर्थात ते पाचहीजण पाचशेजणांना भारी होते . कोणत्याही कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याची आणि कठीण परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात होती . प्रत्येकाच्या नावावर अविश्वसनीय कामगिऱ्या जमा होत्या .
दहशतवादयांचा तळ त्यांच्या डोळ्यासमोर दिसत होता . अत्याधुनिक साधनांनी काढलेल्या त्या चित्रफितीत  सुमारे पंचवीस ते तीस जण दिसत होते . आणखीही असतील त्यात काही स्त्रियाही दिसत होत्या. नवीन जीपीएस प्रणालीमुळे तळाचे अचूक लोकेशन मिळत होते . अतिरेक्यांकडे असलेला शस्त्रसाठाही दिसत होता . परदेशी बनावटीची शस्त्रे येतात तरी कुठून ....?? पण त्याची त्यांना फिकीर नव्हती. जो प्रतिकार करेल त्यांना संपवायचे हीच ऑर्डर होती त्यांना.ते मृत्यूदूतच होते.
मीटिंग संपली आणि लीडर निघून गेला आता तिथे ते फक्त पाचच जण होते."हे xxxx सुधारणार नाही कधीच. हे जन्मापासूनच हरामी आहे . साले भांडून वेगळे झाले पण अजूनही संधी मिळेल तेव्हा आमच्या देशात घुसून वाट लावून जातात ..." नंबर एक पोटतिडकीने म्हणाला." हो रे...  ह्यांना मुळापासूनच  नष्ट केले पाहिजे. माणुसकी नाही त्यांच्याकडे. साले वर म्हणतात दिवसातून पाच वेळा देवाचे नाव घ्या .."नंबर दोन  त्याची री ओढत म्हणाला."काही नाही.. आता सापडले तर सगळ्यांना गोळ्या घालू त्यात दोन तीन निरपराधी मेले तरी चालतील.तेव्हडीच लोकसंख्या कमी होईल" नंबर तीन  हसत हसत म्हणाला." या लोकांना फक्त आपली जात आणि धर्म प्रिय आहे .उठबस तेच चालू धर्म धोक्यात आहे... धर्म धोक्यात आहे .आम्ही अल्पसंख्याक म्हणून आमच्यावर अन्याय होतोय .अरे चार चार लग्न करायची परवानगी दिली तुम्हाला तरी अल्पसख्यांक कसे ...?? नंबर पाच हसत म्हणाला.सर्व हसू लागले पण नंबर चार शांतपणे आपली हत्यारे चेक करीत होता . जणूकाही त्याच्या कानावर हे पडतच नव्हते .
मध्यरात्री दोन  वाजता त्यांचे ऑपरेशन सुरू झाले. एका हेलिकॉप्टरने त्यांना तळापासूनच्या काही अंतरावर सोडण्यात आले .रात्रीच्या गर्द अंधारात ते तळाच्या दिशेने कूच करू लागले . कोणी कोणाशी एक शब्दही बोलत नव्हते. सगळा प्लॅन प्रत्येकाच्या डोक्यात फिट होता .  सगळे फक्त हाताच्या खुणेने संपर्क करीत होते . प्रत्येकाला आपले काम माहीत होते. दुसऱ्यांची फिकीर न करता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करायचे होते .आत्मविश्वास त्यांच्या हलचालीतून स्पष्ट दिसत होता.त्या तळाच्या जवळ येताच अचानक एका बाजूने गोळीबार सुरू झाला.दहशतवादी त्यांच्या कल्पनेपेक्षा खूपच हुशार निघाले होते. त्यांच्या गोळीबारास प्रत्युत्तर देणास सुरवात झाली . ते पाचही जण हळू हळू वेढा आवळीत चालले होते . अंगात भिनलेल्या प्रशिक्षणामुळे त्यांच्या हालचाली आपोआपच  चपळपणे होत होत्या.
बराच वेळ दोन्ही बाजूने धुमश्चक्री चालू होती . मध्येच कोणाच्यातरी ओरडण्याचा आवाज ऐकू येई . हा हा म्हणता पहाट झाली ..गोळीबार कमी झाला. थोडया वेळाने शांत ही झाला. काही वेळ शांत बसून कमांडो आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेऊ लागले .कमांडो त्या तळाच्या अगदी जवळ आले . काही अंतरावरच दहशतवाद्यांची प्रेते पडली होती. कानोसा घेत हळूहळू कमांडो आत शिरले.अचानक दोन तरुणी भीतीने थरथरत कोपऱ्यात बसलेल्या दिसल्या . नंबर पाच त्यांना धीर देण्यासाठी हळुवार पावले टाकीत पुढे आला . स्त्रिया असल्यामुळे तो थोडासा गाफील राहिला. तणावपूर्ण शांतता तिथे दिसत होती . अचानक त्यापैकी एका तरुणीने पाठीमागून छोटे पिस्तूल काढून त्याच्या दिशेने झाडले.सावधपणा अंगातच मुरलेल्या नंबर पाचने सवयीनेच बाजूला उडी घेतली पण गोळी त्याच्या दंडाला चाटून गेलीच .त्याला कव्हर देणाऱ्या नंबर तीनने पुढे सरसावत दोन्ही तरुणींच्या देहाची गोळ्याने चाळणी करून टाकली . एका दरवाज्यावर पहारा करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा  नंबर दोनने आवाज न करता खातमा केला आणि दरवाजा उघडून आत शिरले.आतमध्ये चार दहशतवादी नमाज पढत होते . "xxxx ...!! नंबर दोन  संतापून ओरडला.हातातली रोखलेली बंदूक खाली घेतली . तिघेजण त्या चौघांना घेरून उभे राहिले पण  गोळ्या झाडायची हिम्मत नाही केली."नमाज पुरा होऊ दे त्यांचा .... मग ठोकू .."नंबर तीन  म्हणाला."शेवटचा नमाज.."  नंबर एक हसत ओरडला .
अचानक नंबर चार आत शिरला आणि काही न बोलता त्याने हातातील एक 47 च्या एका फैरीत चौघांना संपवून टाकले."मिशन ओव्हर ..."इतकेच बोलून तो बाहेर पडला.धक्का बसल्याप्रमाणे बाकीचे तिघे त्याच्याकडे पाहत राहिले.
"अरे ते नमाज पढत होते आणि तू त्यांना गोळ्या घातल्यास....??  आपली संस्कृती नाही ती.."नंबर एक  संतापून म्हणाला.
"असेही ते मरणारच होते  नमाज पढु दिला असता मग गोळ्या घातल्या असत्या " नंबर दोन शांतपणे म्हणाला .
"कितीही झालो तरी माणसे आहोत आपण. मशीन नाहीत " नंबर पाच तोंडावरचा बुरखा काढीत म्हणाला .
"मला ते काही माहीत नाही.देशाचे शत्रू हे फक्त शत्रूच असतात. त्यांना संधी मिळेल तेव्हा ठेचायचे असते . मी फक्त शत्रू ओळखतो त्यांची जात धर्म नाही . ते कुठेही कोणत्याही अवस्थेत असले तरी मी मारणार त्यांना . देशाचे रक्षण करणे हाच माझा धर्म आहे . कदाचित मी हा युनिफॉर्म घातल्यावर माणूसपण विसरत असेन . पण लक्षात ठेवा  विशिष्ट कामगिरीसाठी  आपल्याला  घडविले गेले आहे . आपली एक छोटीशी चूक महागात पडू शकते. तेव्हा भावनिक होऊ नका . ऑर्डर्स फॉलो करा. शूट टू किल".. नंबर चार त्याच्या डोळ्यात नजर रोखून म्हणाला .
काही वेळाने त्यांना परत घेऊन जायला वाहन आले . नंबर चार  कुठे गायब झाला म्हणून बाकीचे कमांडो त्याला शोधू लागले . शोधता शोधता  एका बंद खोलीचे दार उघडून आत घुसले . समोर नंबर चार  शांतपणे नमाज पढत होता.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment