Monday, August 26, 2019

कृष्णजन्म

कृष्णजन्म
मित्रांनी फारच आग्रह केला होता म्हणून  गोविंदने कृष्णजन्माच्या शोभायात्रेत भाग घेतला होता.त्याच्या देखणेपणामुळे कृष्णाचीच भूमिका त्याच्या वाटेला आली होती . दिवसभर उघड्या ट्रकमध्ये बसून तो कंटाळला होता. तरी बरे ....खाण्याची ददात नव्हती.तरुणी छान हसून हळूच हात दाखवीत होत्या.बरेचजण त्याचे फोटो ही काढत होते तर काही सेल्फीही.आता रात्र झालीच होती. मिरवणूक संपवा...... असा दोनदा पोलिसांकडून निरोपही आला होता.
"संपेल बाबा एकदाचे आता...."असे पुटपुटत त्याने सहज म्हणून मोबाईल हातात घेतला."अय्या.... त्या कृष्णाकडे बघ मोबाईल आहे .... "खालून एक तरुणी दुसरीला हसत म्हणाली.तो त्यांच्याकडे पाहून हसणार इतक्यात घरचे पाच मिस कॉल दिसले.
"आयला..... घरी लफडे झाले काहीतरी.."तो मनात म्हणाला आणि घाईघाईत घरी कॉल केला."आजी सिरीयस आहे ...हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत .."बहिणीने निरोप सांगितला तसा तो उठला आणि रिक्षात बसून हॉस्पिटलकडे निघाला.
म्हातारी नव्वदीला आली होती.कधी चांगली तर कधी पटकन सिरीयस.... असे चक्र चालू होते.घरचे तिच्या जगण्यापेक्षा मरणाचीच वाट पाहत होते.अर्थात त्यामागे सर्वांचा हेतू चांगलाच होता.तिचे सर्व करायला घरी तीन बायका होत्या त्यामुळे सेवेची कमतरता नव्हती फक्त तिचे हाल कोणाला बघवत नव्हते.आयुष्य पूर्णपणे आनंदाने जगली होती. तोंडात सतत देवाचे नाव. याची आई ..मोठी वहिनी ..आणि जवळच राहणारी आते अश्या तिघी मिळून तिची सेवा करीत होत्या.तिचे करताना कुठेही कंटाळा..  त्रास ..तोंडावर दाखवीत नव्हत्या .
रिक्षातून जाताना रस्त्यात त्याला तो उभा असलेला दिसला. त्यांच्यासारखाच ड्रेस....मेकअप ... बहुतेक तोही कुठल्यातरी शोभायात्रेतून बाहेर पडला असावा.आज बरेचजण असेच दिसतील.असा विचार करीत त्याने त्याच्याबाजूला रिक्षा थांबवली.
"कुठे निघालास ....?? आपल्याच वयाचा असेल असे समजून त्याने विचारले ."चल ये सोडतो. तसा दुसरा हसला.त्याचे हास्य प्रसन्न होते आश्वासक होते.रिक्षात बाजूला बसला आणि मानेनेच चल अशी खुण केली.
मी गोविंद ... कुठल्या मिरवणुकीत होतास ...?? पाहिल्याने विचारले.
" मी यशोधर.... साईकृष्ण अपार्टमेंट .."दुसर्याने उत्तर दिले."तू कुठे ...."??
"मी तिथला  नाही... पण हॉस्पिटलमध्ये चाललोय.तुला सोडतो आणि पुढे जातो .या काळोखात एकटा  राहण्यापेक्षा मी सोडतो तुला ... गोविंद सहज म्हणाला .
आता काळोख बऱ्यापैकी पडला होता  रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हतीच.अचानक कुठूनशी एक किंकाळी ऐकू आली. गोविंदाने पटकन रिक्षा थांबवायला सांगितली आणि बाहेर उडी घेतली.त्या अंधाऱ्या कोपऱ्यात चार तरुण एका तरुणीशी झुंजत होते.ह्यांची चाहूल लागताच ते वळले .दोघांच्याही वेशभूषेकडे पाहून हसले.ती तरुणी संकटात आहे हे पाहून दोघेही तिला वाचवायला पुढे झाले पण त्यातील दोघांकडे असलेले धारधार सुरे पाहून शांत झाले.
" चला... निघा....गुपचूप.कृष्णाचा मेकअप करून कोणी खरोखर कृष्ण बनत नाही" हातातील सुरा दाखवीत एकजण ओरडला .गोविंदने हळूच यशोधरकडे पाहिले.  "भिडायचे का ......"??? यशोधर फक्त हसला.आता रिक्षावाला ही बाजूला येऊन उभा राहिला."चला...आता  तिघे झालो... गोविंद आत्मविश्वासाने म्हणाला .तिघांनी मिळून एक पाऊल पुढे टाकले तसे समोरचेही विचारात पडले. मनाशी ठरवून त्यांनी एकमेकांकडे पाहिले आणि मुकाट्याने मागे फिरून पळून गेले.त्यांनी त्या तरुणीला आपल्यासोबत घेतले . काही वेळाने एका नाक्यापाशी येताच यशोधर म्हणाला "मी हिला घरी सोडतो तू हॉस्पिटलला जा "
हॉस्पिटलजवळ येताच तो धावतच वॉर्डमध्ये शिरला . हॉस्पिटलमधील सारेजण या कृष्णाला पाहून हसत होते .बेडजवळ त्याला पाहून आजीही क्षीणपणे हसली. "माझी इच्छा होती कृष्णाच्या समोर प्राण जावेत .पण इतके कुठे आपले नशीब....??  आहेच अजून तुम्हाला पिडायला.." आजी हसत म्हणाली .
"गप ग आई .. काही नाही पिडत तू ..... आम्हाला हवी आहेस.." आतेही गमतीत म्हणाली.
इतक्यात दुसरा त्याला शोधत आत शिरला.त्याला पहाताच आजी ओळखीची हसली आणि एकदम प्राण सोडला.काय घडले कोणास काही कळेना.आजीच्या भोवती रडारड चालू झाली.
गोविंद पहिला सावरला.तो यशोधरचा हात धरून बाहेर घेऊन आला.
"कोण आहेस तू ......"??? तुला पाहताच आजीने हसून प्राण कसा सोडला ...?? यशोधर पुन्हा हसला.
"मी तुमच्यातील आहे .फक्त तुमच्या मनात राहतो . तुमच्या इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करीत असतो . आज बघ ना तुझ्या आजीची इच्छा पूर्ण झाली .पण तिचीच का पूर्ण झाली ...?? कारण तू आज योग्य वागलास . तुझ्या वेशभूषेला साजेसे वागलास. समोरच्याच्या हातात सुरे असताना देखील तू घाबरला नाहीस .तर गंभीर परिस्थितीमध्ये असतानाही तू रस्त्यावर अडचणीत असलेल्यांच्या मदतीला धावलास. मग तो मी असो किंवा ती तरुणी . आम्ही ही हेच तुमच्या मार्फत करीत असतो . कधी कधी पारख चुकते. पण बहुतेकवेळा तुझ्यासारखी माणसे भेटतात . मग तुमच्या उपयोगी पडायला  नको का .... ??  तिचे दिवस भरले होते मी फक्त निमित्त झालो आणि तिची इच्छा पूर्ण केली "असे बोलून तो चालू लागला.हॉस्पिटलमध्ये एक कृष्ण दुसऱ्या कृष्णाला पाया पडताना पाहून लोक अचंबित होत होते.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment