Friday, August 2, 2019

दत्तक ....२

दत्तक ...२
कालच ती नेहमीप्रमाणे जिममध्ये गेली होती.त्यानंतर कॉफीशॉपमध्ये ग्रुपमधील कोमलने परत अथर्वचा विषय काढला.अर्थात अथर्वचे दत्तक प्रकरण कॉलनीमध्ये हॉट विषय होता.आता रश्मीनेही सत्य स्वीकारले होते .त्यामुळे तीही हे सर्व एन्जॉय करीत होती.
पण कोमलने यावेळी तिला राहुलविषयी विचारले होते. "राहुल खरेच स्वतःचा मुलगा असल्याप्रमाणे अथर्वला वागवतो का ...?? अर्थात या प्रश्नाला रश्मीच्या मते काहीच अर्थ नव्हता . राहुलचे आणि अथर्वचे किती घट्ट संबंध आहेत हे तिच्याशिवाय कोणाला कळणार म्हणा ...?? अथर्वला दत्तक घ्यायच्या प्रोसेसमध्ये राहुलने किती प्रयत्न केले हे याची तिला जाणीव होती.
राहुल आणि रश्मीचा मूल दत्तक घेण्याचा निर्णय पक्का झाला आणि मग सुरू झाली मुलाची शोधाशोध.शहरातील अनाथाश्रमात मुलांसाठी खूपच वेटिंग लिस्ट होती आणि कायद्याप्रमाणे कोणत्याही अनाथाश्रमास मुल दत्तक देता येत नाही . त्यासाठी एक संस्था आहे आणि त्या संस्थेनी मान्यता दिलेल्या अनाथाश्रमातूनच मुलाला दत्तक घेता येते.शहरातील अनाथाश्रमातून मूल दत्तक घ्यायचे झाले तर कमीत कमी दोन वर्षे थांबावे लागणार होते आणि इतके दिवस थांबायची रश्मीची तयारी नव्हती . तिल मानसिक त्रास सुरू झाला होता.शेवटी राहुलच्याच एका मित्राने दूरच्या गावातील अनाथाश्रमाचे नाव सुचविले.योगायोगाने ते त्या संस्थेच्या लिस्टमध्ये ही होते . मुख्य तालुक्यापासून ते दूर आतल्या भागात होते त्यामुळे तिथे फारसे कोणी जात नव्हते . राहुल आणि रश्मीने योग्य ते कागदपत्र बनवून मुलाला आपल्या ताब्यात घेतले .तीन महिन्यांनी जन्म दाखला मिळेल असे सांगण्यात आले . मुलगा घरी आल्यावर दोघेही खुश झाले आणि त्याचे लाड करण्याच्या आनंदात दोन वर्षे कधी निघून गेली ते कळलेच नाही इकडे काहींना काही कारण काढून त्याचा जन्मदाखला लांबत होता .दोन वर्षानंतर त्यांना जन्मदाखल्याची जास्त गरज भासू लागली आणि त्यांनी वकिलामार्फत दाखल्यासाठी अर्ज केला.
दाखल्यासाठी पुन्हा त्यांना त्या गावातील कोर्टात मुलाला घेऊन हजर व्हायचे ही अट होती.दिलेल्या तारखेला सकाळीच अथर्वला घेऊन राहुल आणि रश्मी कोर्टात हजर राहिले. गावात राहण्याची सोय नाही त्यामुळे त्यांना आदल्या दिवशीच तालुक्यातील  एका बऱ्यापैकी हॉटेलात रूम घ्यावी लागली आणि दुसऱ्या दिवशी साधारण वीस किलोमीटरचा प्रवास करून ते कोर्टात पोचले होते.अपुरी झोप आणि प्रवास यामुळे साहजिकच अथर्व त्रासून गेला होता.कोर्टात ही त्यांना बसायला पुरेशी जागा नव्हती. म्हणून ते गाडीतच बसून होते. लवकरच आपला नंबर येईल आणि ताबडतोब दाखला मिळेल या आशेवर दोघेही अथर्वला समजावत तो त्रास सहन करीत उभी होती.शेवटी पाच वाजले आणि अथर्वचा संयम संपला. तो कुरबुर करू लागला आणि नंतर त्या कुरबुरीचे रूपांतर रडण्यात झाले.
इतक्यात नेमका त्यांचा नंबर लागला .थोड्याश्या अस्वस्थ मनस्थितीत रश्मी अथर्व आणि राहुलसोबत आत शिरली . वकिलाने सर्व मॅनेज केले असल्यामुळे त्यांना फारसे टेन्शन नव्हतेच . तरीही रश्मी आणि राहुलची जजसमोर उभे राहण्याची पहिलीच वेळ असल्यामुळे दोघेही थोडे बावरलेच होते.
आत शिरल्यावर जजने त्यांना प्रश्न विचारायला सुरवात केली."तुम्ही कोण ...?? कुठले ..?? स्थानिक  कुठले...?? रश्मीने सांगितले" आम्ही कोकणातले" मग त्याने विचारले "इथेच का आलात दत्तक घ्यायला..?? तोपर्यंत अथर्वची चिडचिड वाढली तो अजून जोरात रडू लागला . त्यामुळे जज वैतागले.त्याने रश्मीला विचारले "हा नेहमी असा रडतो का ...?? रश्मीने नाही असे उत्तर दिले . "आज त्याची तब्बेत बरी नाही".असे सांगितले . तरीही त्याने पुन्हा" त्याची तब्बेत नेहमीच अशी असते का .."??  असे विचारले . जजच्या प्रश्नांचा रोख कुठे वळतोय हे त्यांना कळू लागले . मग  त्याने रश्मीला अथर्वला घेऊन बाहेर जाण्यास सांगितले .रश्मी त्याला घेऊन बाहेर आली तरी तिला आतले संभाषण ऐकू येत होते . जजचा प्रश्नांचा रोख बदलला तरीही राहुल शांतपणे त्याच्या प्रश्नांना उत्तरे देत होता.मग तो कागदपत्रांकडे आला आणि त्यातील चुका काढू लागला.त्याने उलटसुलट प्रकारे तेच प्रश्न विचारले.तसा राहुलचा आवाज वाढला . त्याचा आवाज चढलेला बघून रश्मीचे पाय थरथरू लागले . जर जजने नाही म्हटले असते तर अथर्वला पुन्हा त्यांच्या ताब्यात द्यावे लागले असते .त्यांना तो अधिकार असतो.राहुल आता जजशी डायरेक्ट बोलू लागला.हे नियमबाह्य वर्तन होते . "इथे आम्ही सकाळी दहापासून वाट पाहत उभे आहोत . आम्ही अजून जेवलो नाही की टॉयलेटला ही गेलो नाही .हे सर्व आम्ही समजू शकतो पण दोन वर्षाच्या मुलांकडून तुम्ही कसली अपेक्षा ठेवता..?? राहिली कागदपत्रांची गोष्ट तर ती तुमच्या सूचनेनुसार वकीलानीच तयार केली आहेत .तरीदेखील त्यात काही सुधारणा असतील तर आम्ही करू. आम्ही एका मान्यताप्राप्तमार्फत त्या मुलाला दत्तक घेतोय आणि तेही माझ्याच राज्यातील एका छोट्या गावातून घेतोय.मी एक उच्चशिक्षित भारतीय नागरिक आहे. माझी पत्नी ही उच्चशिक्षित आहे. परदेशातील नोकरी सोडून आमच्या देशात नोकरी करावी म्हणून इथेपरत आलो आहोत .तुम्ही आमच्याशी असे वागू शकत नाही आणि जर एका संस्थेला तुम्ही भारतातील कोणत्याही अनाथाश्रमातून मुलांना दत्तक द्यायची परमिशन देऊ शकतात तर आम्हाला  भारतातील कोणत्याही अनाथाश्रमातून दत्तम घ्यायचा इतका त्रास का ...??काही क्षण कोर्टात शांतता पसरली.कोणीच काही बोलले नाही .
थोड्या वेळाने जज म्हणाला "तुमचा अर्ज मंजूर झाला आहे .कोर्ट  दाखला देण्याची परवानगी देत आहे".
नंतर तो राहुलला म्हणाला "आम्हाला असे प्रश्न विचारावेच लागतात .कारण दत्तक मुलाचा पुढे गैरवापर होतो.
बाहेर आल्यावर वकिलाने रश्मी राहुलचे अभिनंदन केले . तो म्हणाला "राहुल साहेब जजशी असे बोलल्याबद्दल तुम्हाला जेल ही होऊ शकली असती.पण तुम्ही परिस्थिती बरोबर हॅन्डल केली.खरेतर तुमची आर्थिक स्थिती पाहूनच इतकी वर्षे तुमची अडवणूक करत होते .कदाचित तुमच्याकडून अजून काही मिळेल  याची अपेक्षा होती त्यांना . म्हणूनच ते प्रत्येकवेळी काही चुका काढीत होते .पण आज तुमच्या चांगुलपणाचा विजय झालाय . दत्तक घेण्यामागची  तुमची खरी भावना सिद्ध झाली. मग राहुल आणि रश्मी आनंदाने अथर्वला घेऊन परत गेले .
आज म्हणूनच रश्मीला राहुल आपला नवरा आणि अथर्वचे वडील असल्याचा अभिमान वाटतो .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment