Friday, August 30, 2019

मानाचा गणपती

मानाचा गणपती
सदाशिवभाऊना अपघात झालाय आणि हाताला मार लागलाय ही बातमी कळताच मला आता त्यांच्या गणपतीचे काय होणार.....???  हीच काळजी लागली . त्यात त्यांनी मला संध्याकाळी घरी बोलावले हे ऐकून जास्तच टेन्शन आले.आता भावकीतल्या सर्व गोष्टी पुन्हा बाहेर येणार याची खात्री होतीच.  शेवटी काय तर आजची संध्याकाळ काळजी करण्यातच जाणार होती . घरी फोन करून सौ.ला सांगितले तशी तीही यायला तयार झाली."बरे झाले ....आधीच सांगितले.. नाहीतर आताच मी पोहे भिजत घालणार होते नाश्त्यासाठी. आता त्यांच्याकडे नाश्ता करू ..". मी सौ.च्या निर्णयाला मनोमन दाद दिली.तसेही सौ.चे माहेर त्यांच्या बाजूच्याच गावात ..त्यामुळे तिला त्यांचा थोडा जास्त ओढा .म्हणजे आमची अर्धी काळजी ती घेणार हे पाहून फार बरे वाटले.
संध्याकाळी परस्पर बाहेर भेटून मी आणि सौ त्यांच्या दारी धडकलो . त्यांना पाहताच सौ.ने "दादानो... असा हंबरठा फोडला आणि त्यांच्या गळ्यात पडून रडू लागली .तिचा आवाज ऐकून शेजारच्या म्हात्रे काकू ,नलिनी वहिनी धावत घरात शिरल्या जणू काही याच गोष्टीची वाट पाहत होत्या."अगे बाय .... हाय मी अजून.... आणि त्या देवळाजवळच्या जमिनीचो  हिस्सा तुला दिल्याशिवाय जाऊचो नाय...." सदाशिवभाऊ तिच्या डोक्यावर थोपटत हसत हसत म्हणाले. "आयला....ही भानगड आहे होय.तरीच म्हटले ही कशी पटकन तयार झाली इथे यायला" मीही त्यांच्या सुरात सूर मिळवला." तुम्ही गप बसा हो ..." सौ.ने ठेवणीतला आवाज काढला आणि मी गप्प झालो .
इकडतिकडच्या बऱ्याच गोष्टी झाल्या. ते बाथरूममध्ये कसे पडले याचे वर्णन झाले .हाताला थोडा मुका मार बसलाय पंधरा दिवस काही उचलू नये अशी ताकीद मिळालीय. पण अजूनही ते मूळ मुद्द्यावर येत नव्हते .
शेवटी सौ.ने दबक्या आवाजात विचारले "भाऊ काय झाला असा.. चेरो का पाडुन बसलावं ..."
"अगो.... या झिलाची काळजी असा .यावर्षी माझा ह्या असा झालाय . आता गणपती कोण डोक्यावर घेईत . शेवटी घराचा मान असा .आमच्या रोहितला ह्या काय पटत नाय. तो काय ह्या गणपतीचा करुचा नाय . माझ्या नंतर गणपती डोक्यावर घेऊचा मान त्याचाच . मेलो गणपतीच्या दिवशी पण कामाक जाता . त्यास काम महत्वाचा मग देव. माझ्या नंतर घरच्या गणपतीचा काय होणार देव जाणे..." तशी सौ. गप झाली.
मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला "भाऊ .... काळजी करू नका होईल सर्व नीट.."
कोकणातील लोकांच्यात गणपतीबद्दल काय भावना असतात हे सांगायला नको. त्यामुळे भाऊंच्या मनात काय चालू आहे याची जाणीव मला होती.
दोन दिवसानंतर ....
सकाळी रोहित आपल्या ऑफिसमध्ये पोचला तेव्हा अजून कोणीच आले नव्हते.आल्याआल्या त्याने आपल्या टीमला मेल / व्हाट्स अप करून मीटिंगला बोलावले. इतक्यात ऑफिस बॉय  समोर कॉफी घेऊन उभा राहिला आणि एक कागद समोर ठेवला."साहेब....वर्गणी . ..." तो खाली मान घालून म्हणाला.  शांतपणे खिश्यातून पाचशे रु. पुढे केले. कॉफी  संपेपर्यंत त्याची टीम गोळा झाली.
"आपल्याला पंधरा दिवसात काम पूर्ण करायचे आहे . फॉरेन टीम दोन दिवसात येईलच ..कोणाला काही प्रॉब्लेम आहेत का ....?? त्यांनी खास आवाजात विचारले .
"सर मी सुट्टीवर आहे .चार महिने आधीच सुट्टी टाकली आहे . गणपती आहेत घरात .... एकजण हळूच म्हणाला.
"सर मीही पुण्यात चालले आहे . मैत्रिणीबरोबर गणपती पाहायला . यावर्षी लागून सुट्टी आलीय ना .. तीन दिवस मिळतील .... " एक तरुणी चेहऱ्यावरची सुरकती न हलवता म्हणाली.
" सर... यावर्षी अष्टविनायक करतोय बाबाना घेऊन . मागच्या वर्षी आजारी आईसाठी नवस बोलले होते ते.मीही तीन दिवस नसेन .." तिसरा पुटपुटला.
"मग मी एकटाच काम करू का ...."?? रोहितने आवाज चढविला. तसे सर्व स्तब्ध झाले ."चला निघा..बघू पुढे काय करायचे ". असे बोलून मान खाली घालुन काम करू लागला सगळे बाहेर पडले.
थोड्यावेळाने  त्याला साहेबांचा फोन आला "रोहित...फॉरेनच्या मंडळींचे येणे थोडे पुढे ढकलले गेलंय . आता ते गणपतीला येतील.पुण्यातील आणि मुंबईतील प्रसिद्ध गणपतीचे दर्शन घेतील.विसर्जन सोहळा बघून मग आपल्याकडे येतील.
" च्यायला... सर्वाना गणेशोत्सवाचे आकर्षण आहे . इतके कसे  वेडे होतात सगळे ....?? . घरी बाप पण चेहरा पडून बसलाय.
इतक्यात केबिनचे दार लोटून अनिल निमकर आत आला."सध्या तुझी एक दोन कामे थोडी लेट होतील . माणसे नाहीत माझ्याकडे .मीही गावी जातोय गणपतीला .. "त्याने खुर्चीत बसता बसता सांगितले.
" अरे मित्रा.....असे कसे ठरावतोस तू एकटाच..?? काही जबाबदारी आहे की नाही कामाची ..?? माणसांना सोडतोस कसे तू .....?? आणि तू ही बिनधास्त चाललास .मित्र असलास म्हणून काय झाले ...?? कामात दोस्ती नाही .. "रोहित रागाने म्हणाला.
"अरे शांत हो ...माझे कामगार कोकणातले. काही झाले तरी गणपतीला जाणारच .भले नोकरीवर लाथ मारतील.आता.. मीही काही वाटेल ते झाले दरवर्षी गणपतीला गावी जातोच .त्यामुळे त्यांना बोलून काही फायदा नाही. राहिले तुझे काम....??  ते मी इतर माणसे बोलावून करून घेईन. त्यासाठी जास्त पैसे गेले तरी चालतील . आणि पुढच्या वर्षी पासून गणपतीत तुझे काम घेणार नाही . चार पैश्याचे नुकसान झाले तरी चालेल" अनिल शांतपणे म्हणाला .
" च्यायला ...तुम्ही लोक पैसे कधीच कमवू शकणार नाहीत. देव आणि गाव हेच करीत बसा. चल जा आता.... बघू काय ते नंतर" तसा अनिल बाहेर पडला.
ऑफिसमध्ये गणेशोत्सवाचे वातावरण होते म्हणून कामही आरामात चालू होते . सर्वजण वेळेवर घरी निघाले . कोणीच नाही म्हणून रोहित ही वेळेवर बाहेर पडला .
त्याच दिवशी संध्याकाळी .....
संध्याकाळी मला नाक्यावर रोहित भेटला ."आज लवकर आलास ...?? सदाशिवभाऊंना भेटून आलो परवा .. बरे आहेत आता . तू खूप काळजी घेतोस असे म्हणत होते.." मी एका फटक्यात सर्व बोलून मोकळा झालो.
" हो ....सर्व लवकर निघाले. मग मीही काय करू बसून . लवकर आलो तर भाऊंच्या जवळ बसेन थोडा वेळ."रोहित हसत म्हणाला.
"गणपतीचे काय..." ?? मी सहज विचारले.
"माहीत नाही. अजून नक्की नाही . भाऊंना जमणार नाही. मला ही कामे आहेत .सांगू तिथे कोणाला तरी .. तुमचे काय ...?? त्याने उलट प्रश्न केला.
" अरे ...मी ऑफिसला जाऊन बसणार . दोघे तिघे सुट्टीवर चाललेत त्यांची कामे मी पूर्ण करीन. शिवाय ऑफिसच्या गणपतीची पूजा ..आरतीही करावी लागेल . माझा गणपती गावी असतो . एक वर्ष आड मी गावी जातो आणि गणपतीची जबाबदारी मोठ्या भावाकडे आहे त्यामुळे त्यालाच करावे लागते .आम्ही फक्त मिरवायला जातो"असे बोलून हसलो.
"दरवर्षी का जात नाही ...??त्याने सहज विचारले.
"गेलो असतो रे ...आवडेल जायला.पण काही जबाबदाऱ्या टाळता येत नाहीत. त्या पूर्ण कराव्याच लागतात .पण संधी मिळते तेव्हा जातोच . मागच्या वर्षी गेलो पण ह्यावर्षी चान्स नाही . पुढच्यावर्षी नक्की" असे बोलून निघालो .
रोहित घरी आला तेव्हा सदाशिवभाऊ  आश्चर्यचकित झाले." आज लवकर ....??
" हो काम नाही .."तो तुटक स्वरात बोलला. फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला तेव्हा भाऊंच्या फोनची बेल ऐकू आली . फोनवर भाऊंचे बोलणे स्पष्ट ऐकू येत होते .
"अरे.. आता हातच मोडलो त्याला मी तरी काय करू ...?? आतापर्यंत गणपती कधी चुकवलो नाय . बाबा गेल्यापासून सर्व मीच तर करतंय . त्याला डोक्यावर घेऊन आणूचा मान कधी चुकवला नाय . झिलाक पटत नाय तरी पण मी करताच ना सगळा.  त्याने सगळी तयारी करून ठेवली होती माझ्यासाठी पण अचानक ह्या घडला . यावर्षी रघुनाथला सांग गणपती घेऊन येवाक. मी नाय येऊचा . नुसता येऊन काय करू ...."?? बोलता बोलता त्यांचा कंठ दाटून आला.रोहित बाथरूम मधून बाहेर येताच भाऊनी फोन बंद केला." कोणाचा फोन ..?? त्याने विचारले . "गावावरून होता ..??  नाही जमणार यायला म्हणून सांगितले .. "असे म्हणून त्यांनी नजर चुकवली.
"का नाही जाणार ....?? दरवर्षी जातात ना तुम्ही ...?? यावर्षी मी आलो तर चालेल का ..?? तुम्ही गेल्यावर मलाच परंपरा चालवावी लागणार आहे . मग यावर्षी पासूनच सुरवात करूया ...गाडी तयार आहे . तुमची तयारी करा नेहमीप्रमाणे निघू .फक्त ह्यावर्षीपासून मी असेन .. त्यांच्या डोळ्यात पाहत रोहित म्हणाला .
"खराच की काय ...?? असे म्हणत दोन अश्रू त्यांच्या डोळ्यातून टपकले.
" भाऊ ...मी सर्व सहन करेन .पण तुमच्या डोळ्यातील अश्रू नाही सहन करू शकत . तुमची इच्छा आहे ना गणपती आपल्या घराण्यातील लोकांच्या डोक्यावरून यावा तर तो मी आणेन . बघूया तरी काय फिलिंग येते . का इतकी लोक भक्ती करतात त्याची . चला ठरल्याप्रमाणे निघू . सांगा गावी फोन करून ".पण हे सर्व बोलताना आपला उर का भरून आलं ते त्याला कळलेच नाही .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment