Monday, September 9, 2024

मॅकेनिक

मॅकेनिक
" गजा.. ,नालायका !  यावर्षी तरी गणपतीच्या कमीतकमी एक दिवस आधी घरात ये, नाहीतर पुढचे सात दिवस गणपतीचे पाय ही दृष्टीस पडू देणार नाही. " आईचा खणखणीत फोनवरचा आवाज ऐकून गजा समजून गेला यावर्षी काही खरे नाही. आई जास्तच सिरीयस होऊन बोलतेय. 
अहो, का बोलणार नाही ती..? गजानन पावसकर  मुंबईत गेली तीन वर्षे  एकटाच राहतोय. 
 मुळात कोकणातला गजानन उर्फ गजा गावात भागत नाही म्हणून मुंबईत नोकरीसाठी आला. दहावी पास हेच शिक्षण आणि बाईक चालविण्याचे लायसन्स हीच पात्रता.  शिक्षणात असा तसाच असणारा गजा काय पुढे शिकणार होता. त्यातच घरातली परिस्थिती जेमतेमच. 
दोन मोठ्या बहिणी संगिता आणि योगिता आणि त्यांच्या मागचा गजा. आईवडील गणेश भक्त. कोकणात घरोघरी गणपती बसवण्याची प्रथा फार पूर्वापारपासून चालू आहे. घरातल्या अडीअडचणी ऐकणारा, सोडवणारा त्यांचा  गणपती बाप्पा. त्याच्याकडेच तर नवस बोलले होते मुलासाठी आणि थोडी उशिरा का होईना बाप्पाने पण त्यांची प्रार्थना ऐकली.  तर नवसाने झालेला असा हा गजा. जास्तच लाडावलेला. पण वर्तणुकीने चांगला. म्हणून शिक्षण घेतलं नाही तरी घरात कोणी त्याला काही बोललं नाही. करेल काहीतरी पुढे मागे असं सर्वांनाच वाटत होतं. बहिणींची पण त्याच्यावर खूप माया. मोठ्या बहिणीचेही संगीताचे  दहावीपर्यंत शिक्षण झालं होतं. त्यानंतर ती शेती भातीच्या कामात मदतीला तयार झाली. नाकीडोळी सुरेख असणाऱ्या संगीताला शेती भातीच्या कामाचे हे चांगले वळण होते. त्यामुळे तिच्यासाठी लवकरच मागणी येऊ लागली.  योग्य वर येताच तिचे तसे लवकरच हात पिवळे करून देण्यात आले होते. मुलगा शेजारच्याच गावातला होता. गावातच त्याचे किराणा मालाचे दुकान होते.  ती तशी सुखात होती. कोकणात सासरी त्रास होत नाही म्हणजे ती सुखाने नांदतेय असेच म्हटले जायचे. कोकणात पैशाने श्रीमंत म्हणजे सुखी असे अजूनही समजले जात नाही. गावातलीच असल्यामुळे रीतीभाती जाणून होती त्यामुळे लवकरच ती सासरी रुळली.
आता दुसऱ्या मुलीसाठी योगितासाठी स्थळ शोधणे सुरू झाले.  शोधणे यासाठी कारण योगिता त्यामानाने शिकलेली होती. कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षात होती. थोडी तिची मतं तयार झाली होती. तरीही आई-वडिलांच्या मतांचाही आदर करणारी होती. हुंडा द्यायचा प्रश्नच नव्हता पण पोरीच्या अंगावर दोन दागिने हवेत. त्यासाठी सध्या घरच्यांची जास्त मेहनत चालू होती. गजालाही  या सर्वांची जाणीव होतीच. त्याचाच परिणाम म्हणून गजा मुंबईत आला होता. 
आता दहावीच्या जीवावर कोणती नोकरी मिळणार? शेवटी गाववाल्याने डिलिव्हरी बॉय म्हणून एका कंपनीत चिकटवले आणि आपल्या सोबत राहण्याची सुद्धा सोय केली. 
शाळेतल्या एका खोलीत गावातलेच सात आठ जण एकत्र राहत होते. त्यामुळे सगळ्यांच्याच खर्चात थोडीफार बचत होत होती. गावातलेच असल्यामुळे सगळ्यांच्या खाण्याच्या  आवडीनिवडी जवळपास सारखाच होत्या. गप्पाटप्पा करत सगळेजण गुण्यागोविंदाने राहत होते.
गजाचे आईवडील साधे. अर्ध्या एकरात जमेल ते पिकवायचे. तीन  कलमं, एक फणस ,चार माड  यावरच उत्पन्न. पण गावात मान .प्रत्येक सण हौसेने साजरा करायचे.दारात आलेला जेवल्याशिवाय बाहेर जायचा नाही .गणपती उत्सवात तर धमाल असायची .
 पण गजा गेली दोन वर्षे गणपतीत उशिरा घरी येत होता.मागच्या वर्षी तर विसर्जनाच्या एक दिवस आधी घरात शिरला होता.म्हणून यावर्षी आईने आताच फोन करून लवकर येण्याची ऑर्डर दिली होती.
"आहो ,पोराक काय वाईट संगत तर लागली नसा ना ?" आईने रात्री झोपताना  काळजीने विषय काढला.
" गप गो ! काहीतरी काय बोलूक नको .आपलो झील हाय तो आणि नाव पण त्याच्या नावावरून ठेवलंय आपण .आता त्याची काळजी त्यालाच " देवघरातल्या गणपतीच्या मूर्तीकडे हात करीत बाबा म्हणाले आणि झोपेची तयारी करू लागले.
"आयला , मुलगा ह्यांचा.हेच मागे लागले मुलगा हवा म्हणून . चांगली माणसे आहेत ,दरवर्षी मनोभावे पूजा करतात म्हणून होय म्हटले तर माझ्याच अंगावर जबाबदारी टाकली " देवघरातील तो स्वतःशीच चिडून म्हणाला.बाजूला खुसखुस ऐकू आली म्हणून पाहिले तर उंदीर फुटाणे खात हसत होता.
"प्रत्येकवेळी तुम्हाला सांगतोय कोणाचेच ऐकू नका. लोक वाटेल ते मागतात आणि नंतर आपल्यालाच कामाला लावतात. तुम्ही तर भोळ्या वडिलांचे भोळे पुत्र.जाता त्यांना मदत करायला .आता तो जीवाची मुंबई करत असेल आणि त्याच्यावर लक्ष ठेवायची जबाबदारी तुमची " तो आपली शेपटी आपटत म्हणाला.
जगात सर्व बदलेल पण ह्याला कोणी बदलू शकत नाही.उंदराकडे पाहत त्याने हताशपणे मान डोलावली.
इकडे गजा मात्र टेन्शनमध्ये होता.यावर्षी बहिणीच्या लग्नासाठी जमेल तितके पैसे गोळा करायचे म्हणून जीवापाड मेहनत करीत होता. मोटारसायकल वरून पूर्ण मुंबईत डिलिव्हरी करत होता.रोज बारा ते पंधरा तास डिलिव्हरीची कामे करीत होता.त्यात सण आले की जास्त काम पण इंसेंटिव्हही जास्त मिळायचा . सणाच्या दिवशी बहुतेकजण दांडी मारायचे पण हा मुंबईत एकटा म्हणून यालाच कामाला जुंपायचे. त्यामुळेच दोन वर्षे गणपतीला उशिराच घरी जात होता.आईचा फोन येताच तो चिंतेत पडला.
" गजाभाऊ ,यावेळी खूप काम आहे हो " सकाळीच मॅनेजर साहेबांनी संभाव्य धोक्याची कल्पना दिली .
" साहेब यावर्षी  गणपतीच्या दोन दिवस आधी घरी जायचे आहे .मला सुट्टी लवकर हवीय" गजा केविलवाणा चेहरा करीत म्हणाला .
" दिली असती हो, पण यावेळी एका कंपनीचे लाडूचे बॉक्स वाटायची मोठी ऑर्डर मिळाली आहे . ती ऑर्डर जितक्या लवकर पूर्ण कराल तितक्या लवकर मोकळे करेन मी तुम्हाला .बस फक्त तीच ऑर्डर पूर्ण करा .ऑर्डर मुंबईतलीच आहे पण पूर्ण मुंबईत फिरावे लागेल " मॅनेजर छद्मी हसत म्हणाला .
" फक्त एकच ऑर्डर ना ? मग हरकत नाही "गजा उत्साहाने म्हणाला .
"ऑर्डर चोवीस तास चालू आहे. जितक्या लवकर करशील तितक्या लवकर मोकळा होशील " मॅनेजर म्हणाला.
गजाने खुश होऊन ऑर्डर स्वीकारली आणि बाईकला किक मारली.पुढचे दोन दिवस तो ऑर्डर डिलिव्हरी करत होता.
कोणा एका श्रीमंताने उकडीचे मोदक आपल्या आप्तजनांना आणि मित्रांना घरपोच डिलिव्हरी करण्याचे ठरविले होते.तीच ऑर्डर गजा डिलिव्हर करत होता. 
गणपती आगमनाला दोन दिवस राहिले होते.बहिणीच्या लग्नाची बोलणी ही त्याचवेळी होणार आहेत म्हणून घरी हजर राहा अशी धमकीवजा सूचनाही घरून आली होती.
आता रात्रीचे दोन वाजले होते . डिलिव्हरी करून तो घरीच निघाला होता .अचानक त्याला डुलकी लागली आणि बाईक रस्त्यावरून उतरली.वेळीच सावध होऊन त्याने बाईक कंट्रोल करायचा प्रयत्न केला पण ती घसरत गेलीच . त्याला फारसे लागले नाही पण बाईकची मोडतोड झालीच .
" देवा आता काय करू ? बाईकची अवस्था पाहता  एक दिवस तरी गॅरेजमध्ये जाणार हे निश्चित . म्हणजे डिलिव्हरी अजून दोन दिवस पुढे जाणार .
हताश होऊन तो रस्त्याच्या कडेला बसला. अधून मधून एखादं दुसरे वाहन जात होते पण ही मुंबई आहे .उगाच कोणासाठी थांबणार नाही.पण तो तरुण गजाला पाहून थांबला .
" आपटली का ?" बाईककडे पाहत त्याने विचारले ."चल टो करून नेऊ ."
त्याने  बाईक पायाने ढकलत जवळच्या गॅरेजमध्ये आणली .गॅरेज कसले ते .एका झाडाखाली पत्र्याची उघडी शेड होती.दोन टायर, एक पाण्याचे पिंप आणि चार पाच उंदीर इकडे तिकडे फिरत होते.
" मी विनायक ,या गॅरेजचा मालक ." त्याने बाईक स्टॅण्डला लावून तिचे निरीक्षण करत सांगितले.
" गॅरेज ? " गजाने भुवया उंचवीत विचारले.
समोरचा तरुण थोडासा अंगाने सुटलेला ,बुटका होता.कान वाजवीपेक्षा जास्तच मोठे होते. हसताना तुटलेला दात दिसत होता. खोचक बोलत होता पण डोळ्यात शांत भाव होते.
" हो .काय हरकत आहे ? गॅरेज म्हटले की गाड्या दिसायला हव्याच का " त्याने खिशातील चपातीचा तुकडा उंदरांच्या दिशेने फेकत विचारले. 
" गाडी आता होणार नाही .दोन दिवस लागतील ." त्याने जाहीर केले.
" च्यायला ,उद्या माझ्या डिलिव्हरी आहेत हो" उद्याचे काम संपले की परवा गावी निघतोय .यावर्षी गणपतीच्या आधी घरात पाहिजे अशी घरच्यांची ऑर्डर आहे ".गजा कळवळून म्हणाला.
"मग मी काय करू ?  मला ही जायचंय गणपतीला चार लोकांच्या घरी. पण हे मी तुला सांगितले का " तो चिडक्या स्वरात म्हणाला .
"पण एक होईल . तो कपाळावर बोटे मारीत म्हणाला.  " तू माझी बाईक घे .उद्याची डिलिव्हरी पूर्ण कर आणि गावाला जाण्यापूर्वी बाईक परत कर. तोपर्यंत मी तुझी बाईक तयार करून ठेवीन " 
" चालेल, " गजा आनंदाने ओरडला आणि मन बदलायच्या आत त्याची बाईक घेऊन निघालाही.
दुसऱ्या दिवशी रात्री गजा बाईक घेऊन त्या गॅरेजमध्ये आला .विनायक त्याची बाईक चेक करत होता .
" ही बघ झाली तुझी बाईक तयार "त्याने गजाच्या हातात चावी दिली.
गजाने हात जोडले आणि हातातील लाडूचा बॉक्स त्याच्या हाती दिला.
"अरे ह्याच बॉक्सची डिलिव्हरी करत होतास का ?" विनायक लाडूचा बॉक्स हातात घेऊन म्हणाला.
" होय  मालकाने सर्व डिलिव्हरी वेळेत पूर्ण केल्या म्हणून मलापण एक बॉक्स दिला. पण तुमच्या मदतीशिवाय हे पूर्ण झाले नसते म्हणून या बॉक्सचा मान तुमचा " गजा हात जोडून म्हणाला.
" पण इतकी काय घाई आहे गावी जायची ?" विनायकने विचारले.
" बहिणीच्या लग्नासाठी पैसे जमविले आहेत.ते गणपतीच्या पुढ्यात ठेवायची इच्छा आहे. आईबाबांना शब्द दिला होता मुंबई जाऊन कष्ट करून पैसे साठविन आणि तेच बहिणीच्या लग्नाला देईन त्यासाठी गेली तीन वर्षे मुंबईत राहतोय.दोन वर्षे तर गणपतीच्या विसर्जनालाच गेलो. पण बाप्पाला घरी आणण्यात जे सुख आणि आनंद आहे ते विसर्जनात नाही.आता बहिणीच्या लग्नाला गावी जाईन तो पुन्हा मुंबईत येणार नाही.आपला गाव बरा" गजा डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाला.
" अरे पण माझ्या बाईकबद्दल  काही सांगितले नाहीस.कशी वाटली ?  " तो आपल्या बाईककडे वळत म्हणाला.
" तुमची बाईक स्पीड घेत नाही .सतत बुजत असते .मध्येच स्पीड घेते तर मध्येच हळू होते.आणि चीचीची असा इंजिन मधून आवाज येतो. त्या पेट्रोल टॅंकवर लावलेल्या उंदरांच्या चित्रसारखीच बाईक वागते" गजा हसत उत्तरला.
चेहरा पाडून विनायकने  पाठ वळवली.
" ही असली मॅकेनिकची काम करायला तुम्ही चार दिवस आधीच इथे आलात का ? बरे तू काम करतोस आणि मला ही कामाला लावलेस. त्याला पाठीवर बसवून अर्धी मुंबई फिरलो मी. ती पृथ्वी प्रदक्षिणा घातली तेव्हाही इतका दमलो नव्हतो. " उंदीर पाठीवर शेपटी आपटत कुरकुरला.
 पण यावर्षी गजाच्या डोक्यावर बसून घरात शिरताना तो जास्तच खुश होता.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment