Friday, September 6, 2024

आत्मसंरक्षण

आत्मसंरक्षण
अश्विनी कोसलेकर गावात परत आली ते पुन्हा कधीच मुंबईत न जाण्यासाठी. खरेतर आपले करियर करायला कोकणातील या आपल्या छोट्या गावातून मुंबईला गेली होती. कोकणातून मुंबईला आज नाही तर गेली कित्येक वर्षे लोक जातात .काही तिथेच मुंबईकर बनून राहत तर काही निवृत्तीनंतर परत गावी येत.आपल्या छोट्या जमिनीवर पाहिजे ते पिकवत आणि आरामात पुढचे आयुष्य काढीत.
अश्विनी याला अपवाद नव्हती .ती लहानपणापासूनच हुशार. पण तिची  हुशारी अभ्यासात फारशी नाही तर कोणत्याही झाडावर सरसर चढ .सापळे लावून जनावरे पकड. तर नदीत तासनतास पालथे पडून राहा यातच दाखवली होती. गणपतीची सजावट करण्यात तिचा हात कोण धरू शकत नव्हता .दरवर्षी कोसलेकरांकडे मखर कसा असेल याचीच उत्सुकता सर्वाना असायची .
त्यालाही अश्विनीमुळेच कोसलेकरांकडे जायला आवडायचे.अश्विनी यावर्षी कसले मखर बनवेल  याची उत्सुकता त्यालाही असायची." कोसलेकराकडे  दरवर्षी नवीन घरात जाण्याचा आनंद मिळतो बघ " तो आपल्या उंदराला नेहमी म्हणायचा.
" नैवेद्य ही दरवर्षी नवीन केला तर जास्त आनंद होईल . काकूने कधीतरी माडावरून नवीन नारळ काढून त्याच्या वड्या बनवाव्या इतकीच माफक इच्छा आहे माझी किंवा त्यांनी घरात नैवेद्य बनवूच नये म्हणजे आपण सुखी होऊ " उंदीर चेहऱ्यावर कोणतेच भाव न दाखवता त्याला उत्तर द्यायचा .
दहावी झाल्यावर अश्विनी मुंबईत काकांकडे राहायला आली आणि कॉलेजात जाऊ लागली. पण वाटेतल्या कराटे क्लासकडे तिचे जास्त लक्ष होते.अर्धातास दारात उभे राहून ती कराटेचे ट्रेनिंग पाहू लागली. तिची आवड पाहून क्लासच्या सरांनी तिला काही प्राथमिक गोष्टी शिकवल्या .ती एकटी असताना त्या गोष्टींचा सराव करू लागली.
या क्लासला घरचे परवानगी देणार नाही याची तिला खात्री होती आणि सरांनीही तुला सगळ्या गोष्टी फुकट शिकवणार नाही हे आधीच स्पष्ट केले होते. पण भविष्यात तुमची फी व्याजासकट परत करेन.तिची हुशारी पाहून सरही तयार झाले.
तिचे कॉलेज पूर्ण झाले तेव्हा तिने ब्लॅक बेल्ट कमावला होता. या पाच वर्षात ती बऱ्याच गोष्टी शिकली. शेजारचे ज्यांना आपण काका मामा म्हणतो त्यांची नजर ,त्यांचे स्पर्श ती ओळखू लागली. ट्रेन, बसमधून प्रवास करताना कोणीतरी अंगलटीला येतोय, त्याचे सहेतुक बोलणे, नको त्या ठिकाणी जाणारा हात याचाही अनुभव येत होता . 
पण आता तिच्यात एक आत्मविश्वास आला होता. मग तीही कोण चिकटायला आला की हाताची कमीत कमी हालचाल करून योग्य त्या ठिकाणी प्रहार करी त्यामुळे तो आपोआप वेदना सहन करीत पुढे निघून जाई. कधीकधी तिला दुसऱ्या मुलींच्या मागे उभे राहून स्पर्श करणारे दिसत आणि त्याही काही न बोलता ते सहन करीत असताना पाहून तिच्या डोक्यात जात. 
तिचे शिक्षण पूर्ण झाले आणि मुंबईचा उबग आला. म्हणे मुंबई आणि इतर शहरे सुरक्षित आहेत. रात्री अपरात्री स्त्री एकटी कुठेही फिरू शकते . पण लहान मुली , एकट्या राहणाऱ्या,प्रवास करणाऱ्या,ऑफिसात काम करणाऱ्या  स्त्रिया यांचे काय ? त्यातर ओळखीच्याच माणसांपासून सुरक्षित आहेत का ?
तिने पुन्हा गावी जाण्याचा निर्णय घेतला. तसेही घरचे वातावरण जुन्या वळणाचे होते. तिला नोकरी करायला विरोधच होणार होता. मग कशाला नोकरी करायची.आणि नोकरी करताना प्रवासात इतर प्रवाश्यांचा आणि  ऑफिसमध्ये सहकाऱ्यांचा  स्पर्श सहन करीत जगायचे का ? 
घरच्यांनी तिच्या गावी येण्याच्या निर्णयाचे स्वागतच केले. गेली पाच वर्षे ती गणपतीच्या आदल्या दिवशी घरी जायची .तिला मनासारखी सजावट करायची संधी मिळायची नाही मग ती वेगवेगळ्या प्रकारचे हार बनवून गणपतीला घालायची. रोज नवनवीन सुगंधित हार पाहून तो सुखवायचा .
या वर्षी ती घरी आली.आता तिला वेळच वेळ होता.पाच वर्षात गाव काही फारसे बदललेले नव्हते. हो पण मोबाईल संस्कृती वाढली होती. व्हाट्स अप फेसबुक इन्स्टाग्राम प्रत्येकाच्या हातात होते.  ती गेली पाच वर्षे एकच मोबाईल वापरत होती. अर्थात तीही सोशल मीडियावर होती पण जरुरी कामापूरती.
गावातील तिच्या बरोबरीची काही मुले आता तिच्यासारखीच तरुण झाली होती.बाईक घेऊन फिरायचे ,हातातील मोबाईलमधून सेल्फी काढायचे .बाजूने जाणाऱ्या तरुण मुली स्त्रियांवर कॉमेंट्स करायचे यातच वेळ जात होता त्यांचा.
तिला एका जागी नुसते बसून राहणे शक्य नव्हते .पण गावात नोकऱ्याही नाहीत. शेवटी तिने कराटेचा क्लास सुरू करायचा निर्णय घेतला .हा क्लास फक्त महिलांसाठी असेल हे ही जाहीर केले.
तिचा हा निर्णय घरच्यांनाच काय तर गावलाही आवडला नव्हता.
" कित्याक हवा ता स्वरक्षण ? आम्ही काय मेलाव काय ? लगीन होवुसतोवर आम्ही हायतच आणि लगीन झाल्यावर नवरो हाय तिच्यासाठी " गावातील जेष्ठ स्त्री पुरुषांच्या प्रतिक्रिया उमटल्या .
क्लास उघडून आठवडा झाला तरी कोण फिरकत नव्हते. नाही म्हणायला शेजारच्या दोन पाच वर्षांच्या मुली खेळायला येत होत्या.मग तीच त्यांना हळूहळू शिकवू लागली .
आता गावाला गणेशोत्सवाचे वेध लागले होते.गेल्या पाच वर्षांची कसर यावर्षी भरून काढायची हे अश्विनीने ठरविले होतेच. आणि अगदी तसाच मखर तयार केला.
यावर्षी तो अश्विनीच्या घरात शिरला आणि खुश झाला . मखर पाहून त्याला जुने दिवस आठवले. पोरीला डोके आहे चांगले. तो शेजारी डोळे मिटून बसलेल्या उंदराकडे पाहत म्हणाला .पण उंदराने डोळे उघडले नाही.
"काहींना कलेची जाणच नसते हे खरे. पण काकू प्रसादात ड्रायफ्रूट टाकणार हे ही नवीनच आहे " तो त्याला ऐकू जाईल इतक्या आवाजात पुटपुटला.
"काय म्हणता ड्रायफ्रूटस " उंदीर खडबडून जागा होत म्हणाला .
"हे बरे ऐकू येते तुला " तो हसत उत्तरला .
गणपतीची पूजा आटपून अश्विनी संध्याकाळच्या तयारीसाठी मार्केटमध्ये गेली. सण असल्यामुळे मार्केटमध्ये गर्दी जास्तच होती .तिच्यासोबत क्लासमध्ये खेळणाऱ्या छोट्या मुली होत्या.
गर्दी असली म्हणजे फायदा घेणारे असतातच . पण तो तरुण त्यांच्यामागे बराच वेळ होता. ते जातील तिथे आजूबाजूला घुटमळायचा 
मध्येच त्याने छोट्या मुलीला आईस्क्रीम देण्याचा प्रयत्न केला .पण त्यांनी झटकून टाकला . आता काहीच प्रतिकार होत नाही म्हणून त्याची भीती चेपली तो अजून धीट झाला.आपला कोपर्याचा तुटलेला दात दाखवत तो किळसवाणे हसला तशी अश्विनीच्या डोक्यात तिडीक गेली.दात ओठ खात तिने हाताचा फटका त्याच्या तोंडावर मारला . फटका खाताच तो चवताळला .रागाने तो अंगावर धावून गेला.तिने पुन्हा उजव्या पायाची लाथ त्याच्या कुशीत हाणली.आतापर्यंत मार्केटची गर्दी त्यांच्या आजूबाजूला जमा झाली होती. तिचा हल्ला पाहून सोबतच्या लहान मुलीही धीट झाल्या.कोपऱ्यात पडलेली काठी घेऊन त्यांनीही त्याच्यावर हल्ला केला.ते पाहून अश्विनी थांबली नाही तिने त्याला लाथाबुक्क्यांनी मारायला सुरुवात केली.आपले काही खरे नाही पाहून तो तरुण धावत सुटला . त्यांचे धाडस पाहून सर्वांनी टाळ्या वाजविल्या.
त्याला मखरात धडपडत शिरताना पाहून उंदीर चकित झाला." काय झाले रे ? तुझी अशी अवस्था कोणी केली ? अरे चार दिवस इथे  सुखाने राहायला येतो त्यातही तू अश्या भानगडी करतोस? चेहरा बघ कसा सुजलाय. कपाळावर ही टेंगुळ येणार बहुतेक "उंदराने प्रश्नांची तोफ सुरू केली.
" जरा गप्प बस रे ." वेदनेने कण्हत तो म्हणाला."औषधोपचार करायचे सोडून प्रश्न  कसले विचारतोस .त्या पोरीने जीव घेतला असता माझा .काय मारते ती .एकेक फटका जीवघेणा आहे तिचा .नशीब वेळीच सावध होऊन पळालो." 
" म्हणजे आता तू मारही खाऊन आलास का ? तो ही एका स्त्री कडून ? देवा आता मी कोणाचे नाव घेऊ ? हेच दिवस बघायचे बाकी होते आता. इथे येऊन इतरांना मदत करतोस हे चांगले होते. पण मारही खाऊ लागलास आता .मीच आता बाबांकडे अर्ज देऊन बदली करायची विनंती करतो . तुझ्यामुळे मीही मार खाणार एक दिवस " समईतील तेल त्याच्या अंगाला लावीत उंदीर म्हणाला.
घरी सगळ्यांनाच अश्विनीची कामगिरी समजली होती. त्यांना हे काही फारसे आवडले नव्हते. "शहरात जाऊन हेच शिकून आलीस का ? " काकू ओरडल्या. "सगळो गाव बघत होतो " कोणीतरी हळूच पुटपुटले.
" मी त्याला प्रतिकार केला ही माझी चूक झाली का" असे अश्विनीच्या मनात येत होते इतक्यात शेजारची त्या लहान मुलीची आई घरात शिरली.
"बरा झाला हो तू सोबत होतीस आणि आमच्या पोरींनीही दोन फटके मारले असे ऐकले " तिने कौतुकाने विचारले.
" ताई  आज मी होते , पण दरवेळी मी नसेन तिच्यासोबत त्यावेळी काय करेल ती " अश्विनीने डोळ्यात डोळे घालून विचारले.
" खरच की बाय .आजपासून ह्या दोघींना तूच क्लासमध्ये कराटे शिकव. उद्या त्यांनाच फायदा होईल चांगले तयार करा त्यांना " त्यांची आई म्हणाली.
" बघ रे ,  मार खाल्ल्याचा काहीतरी फायदा झाला ना ? आज दोन मुली आल्या उद्या चार येतील .आत्मसंरक्षणाचा फायदा आज ना उद्या होणारच. त्यासाठी आज थोडा मार खाल्ला तर काय हरकत आहे." वेदनेने तोंड वाकडे करीत तो म्हणाला .
आज बाप्पाचा चेहरा  सकाळपेक्षा जास्तच लाल का दिसतोय आणि समईतील तेल इतक्या लवकर कसे संपले याचाच विचार आरती म्हणताना अश्विनी करत होती.
© श्री .किरण कृष्णा बोरकर 

No comments:

Post a Comment