Friday, September 6, 2024

दशावतार

दशावतार 
मराठी सुपरस्टार विनयकुमार उर्फ विनायक सुर्वेने यावर्षी दहा दिवस गणपतीसाठी सुट्टी घेतली होती.
कोणाला सांगू नका. पण हल्ली त्याच्याकडे कामच कमी होते. वय वाढले तश्या नायकाच्या भूमिका कमी होत जातात आणि आपण वेळीच सावध होऊन चरित्र भूमिका स्विकारायला पाहिजे हे प्रत्येक कलाकाराने समजून घ्यायला हवे.
विनयकुमारही आता चाळिशीकडे झुकू लागला होता. हल्ली महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यातून नवीन तरुण तरुणी मराठी सिरियलसाठी येत होत्या. दोन सिरीयल केल्या की ताबडतोब चित्रपटात काम मिळत होते. शिवाय ते मानधन ही कमीच घेत होते.दिवसाला बारा ते चौदा तास काम करीत होते. विनयकुमार ह्यात कुठेही बसत नव्हता.
विनयकुमार हाडाचा कलाकार. सुरवातच त्याने गावातील दशवतारातून केली होती. शिक्षण अर्धवट सोडून तो रंगभूमीकडे वळला होता. पण मोठा भाऊ सुदामने समजावले आणि कलाकाराला शिक्षणही आवश्यक आहे असे पटवून दिले.
मग तो , दुसरा मोठा भाऊ शंकरकडे मुंबईत आला.रात्रीच्या शाळेत शिक्षण आणि दिवसा नाटकात छोटी मोठी कामे करत राहिला .अंगात कला असल्यामुळेच लवकरच चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला आणि लोकांनी त्याला सुपरस्टार केले.
विनयकुमार सुपरस्टार झाला तरी गावाला विसरला नाही. गणपतीला सर्व सुर्वे कुटुंब कोकणातील घरी एकत्र येत. एकदा तर विनायकुमारने गणपतीसाठी शूटिंगही रद्द केले होते. हे पाच सहा दिवसच असतात जेव्हा सर्वजण एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात. जुने मित्र भेटतात ,  रात्रभर विविध कार्यक्रम सुरू असतात .खूप धमाल असते आणि ह्याच आठवणी वर्षभर पुरतात. 
वयानुसार विनायकुमारची कामे कमी झाली . हल्ली तो कुटुंबाला जास्त वेळ देतो .मुख्य म्हणजे गावात लक्ष देतो.
यावर्षी गावात होणाऱ्या दशवतारात काम करायचे ठरविले होते. विनयकुमार दशवतारात काम करणार ही बातमी वाऱ्यापेक्षा जास्त वेगाने पंचक्रोशीत पसरली होती. काही मंडळांनी तर मोक्याच्या ठिकाणी बॅनर लावले होते. खरे तर गावातून एखादा कलाकार बाहेर पडला की तो पुन्हा गावातील रंगमंचावर उभा राहील ही गोष्ट विरळच. 
विनयकुमार फक्त कामच करणार नव्हता तर अभिनय आणि इतर गोष्टींची कार्यशाळाही घेणार होता. विनयकुमारने गावी येताच सर्व गोष्टींची तयारी सुरू केली होती.
यावर्षी तोही खुश होता. तसेही सुदाम सुर्वेच्या घरी जाणे त्याला पहिल्यापासून आवडत होते.वडील गेल्यावर सुदामाने त्याच्या सर्व भावाना  कसे वाढविले .स्वतः गावात राहिला पण भावाना उच्च शिक्षण दिले. गावातील परंपरा आणि संस्कार त्यांच्या मनात बिंबविल्या. म्हणूनच  प्रत्येकवर्षी जगाच्या कोपऱ्यात कुठेही असले तरी सर्व भाऊ सहकुटुंब मला भेटायला येतात याचा त्याला खूप आनंद होत होता .पण यावेळी विनयकुमारचा दशावतार पाहायला मिळेल म्हणून जास्त खुश होता .
आताही तो सुदामच्या डोक्यावर बसून घरात शिरताना स्वतःशी हसत आणि गुणगुणत होता.
"स्वारी आज जरा जास्त खुश दिसतेय. घरी लवकर जरी आलो असलो तरी तुमचा कॅनडातील एक भक्त ट्रॅफिकमध्ये अडकला आहे . तुमच्या भक्तांकडे कितीही पैसे असू द्या पण कोकणात येताना ते वेळ विकत घेऊ शकणार नाहीत.त्यांना रस्त्यावर यावेच लागेल आणि ट्रॅफिकमध्ये अडकावेच लागेल " त्याचा उंदीर कुत्सितपणे शेपटी फिरवत म्हणाला.
"काही गोष्टी देवाला जमत नाहीत आणि तसेही मला तुझ्याशी वाद घालायची इच्छा नाही. नैवेद्य वेळेवर मिळणार नाही याची तुला जास्त चिंता आहे हे माहीत आहे मला " तो किंचित हसत म्हणाला.
"हो , मी देव आहे जादूगार नाही. हे सगळे माहीत आहे मला . पण वेळेची काही किंमत आहे की नाही. हे तुम्ही भक्तांना शिकवत नाही का ? मागच्या वर्षी मुंबईत विसर्जनाला सोळा तास लागले आणि तुम्ही एका पायावर डोक्यावर पृथ्वी घेऊन उभे. शेवटीशेवटी पाय लटपटायला लागले होते. तरी नशीब मागे शेपटीचा आधार देऊन मी उभा होतो." उंदीर फुशारकीने म्हणाला.
" तू काय करतोस हे सांगायला माझे तोंड उघडू नकोस "  तो चिडून म्हणाला. यावर्षी आपले वाहन बदला असे लेखी निवेदनच बाबांना करायचे हे पक्के केले त्याने.
" पण आज एव्हडे खुश का " ? उंदराला विचारल्याशिवाय राहवत नव्हते.
" आजपासून दशावतार सुरू होणार आहेत आणि आपला विनयकुमार त्यात काम करतोय. कित्येक वर्षांनी विनयकुमारला दशवतारात काम करताना पाहणार आहे मी " तो भूतकाळात जात म्हणाला.
" विनयकुमार ना ?? मला वाटले तुम्ही काम करणार आहात की काय ? तुमचा भरोसा नाही .हल्ली इथे येऊन मखरात बसता कुठे म्हणा. कधी पोलिसांचे कपडे धुतात, तर कधी सैनिकाला भेटायला सियाचेनला जाता, तर कधी मेलेल्यांचे पोस्टमार्टेमही करता .मागे तर एका मित्रांसोबत टपरीवर चहा पीत होतात." तो स्वयंपाकघरातील नैवेद्याकडे आशाळभूत नजरेने पाहत म्हणाला.
" आयला ! काय हरकत आहे दशावतारात काम करायला . तसेही मलाच नमन करून सुरवात करतात ना.छान आयडिया दिलीस . यावर्षी दशवतारात काम करूच .अशी संधी नेहमी येत नाही " तो खुश होऊन म्हणाला आणि उंदराने कपाळावर हात मारून घेतला.
आज त्याच्या आगमनादिवशीच दशवताराचा पहिला शो करायचे ठरविले होते. विनयकुमारने बरोबर आठ वाजता कार्यक्रम सुरू करायचा अशी सक्त ताकीद सर्वाना दिली होती. शेवटी तो प्रोफेशनल होता.
आठ वाजत आले आणि विनयकुमारला अनिलचा फोन आला . " भाऊ थोडा उशीर होईल ,एका कामात अडकलय पण कार्यक्रम सुरू व्हायचा आधी तयार होऊनच  येईन " 
झाले !  विनयकुमार चिडला.पण कार्यक्रम वेळेवर सुरू झाला आणि नमनाला सुरवात झाली .सर्व कलाकार स्टेजवर आले आणि गणपतीच्या रुपात तो ही आला.
" आज अनिल तर गणपती बाप्पा बनूनच इलो हा .पॉट कसा रे इतका वाढीवलान आणि अंगावरचे दागिने बघ ,काकूचे सगळेच दागिने पळवीलान की काय " रांगेतील दोघे कुजबुजत म्हणाले.
पयल नमन हो पयल नमन हो असे म्हणत सगळ्यांनी नमनाला सुरवात केली .पण आजचा गणपती नेहमीसारखा नाचत नव्हता . त्याचे नाचणे तालात आणि लयबद्ध होते.आपल्यासोबत तो इतरांनाही सांभाळून घेत होता .काही स्टेप तर अश्या घेतल्या की स्वतः विनयकुमारही चक्रवला.
नमन संपले सगळे आत जाऊन पुढच्या तयारीला लागले इतक्यात अनिल धापा टाकत विंगेत शिरला.
"भाऊ माफ करा थोडो उशीर झालोच " तो हात जोडून म्हणाला.
"तू नमनाला नव्हता तर तुझ्या जागी कोण होता" विनयकुमार चक्रावून म्हणाला.
" माका काय म्हायीत , दोन तीन उंदीर घरात शिरले आणि तांदळाची गोण फाडली .सगळे तांदूळ घरभर पसरले .त्यात तेल ही सांडला .बायको म्हणाली ह्या सर्व नीट करा आणि मग कुठेही जावा . तेच गोळा करीत राह्यलंय .म्हटले धा मिनिटे लेट जाऊ म्हणून तुमाक फोन करून सांगितलंय." अनिल हात जोडूनच बोलत होता.
"ओ विनयभाऊ,  नका विचार करू जास्त.तो आहे आपल्या पाठीशी उभा .आपली मान कधीच खाली जाऊ देणार नाही तो .बघा कसा उत्साह संचारला आहे सगळ्यांच्यात .चला कार्यक्रम सुरू करू." एक कलाकार  गणपतीकडे हात जोडून म्हणाला.
खरेच सर्वांच्या अंगात आज वेगळाच उत्साह संचारला होता. मोठ्या जोशातच दशवताराची सुरवात झाली .
" हे मात्र तुझे अति होतेय.तुझ्या आवडीसाठी मला कामाला लावलेस .त्या अनिलच्या घरी पाठवून तांदळाची गोण कुडतडली मी .तेलाची एक पिशवी ही फाडली .किती त्या बिचाऱ्याचे नुकसान " उंदीर रागारागात शेपटी आपटत भांडत होता.
" गप रे काही नुकसान झाले नाही .कोकणी माणूस आपल्या छंदासाठी असल्या छोट्या नुकसानीला महत्व देत नाही . अन्न ही वाया घालवणार नाही . ते तांदूळ गोळा करून ठेवणार याची खात्री होती मला.उद्या तेच तांदूळ कोंबड्यांच्या पोटात जातील बघ.आणि गोळा केलेले तेल आपल्यापुढच्या समईत जाईल." तो हसत म्हणाला.
" पण काही म्हणा,  तुम्ही नाच मस्त केलात .तुमच्यासमोर बरेच कलाकार नाचतात ते पाहूनच शिकलात का " उंदराने शेंगदाण्याचा लाडू त्याच्या समोर धरीत विचारले.
" छे रे , मला कुठे नाचता येते . पण हे नमनच असे आहे की कोणाचेही पाय थिरकतील त्यावर .किती वर्षांपासून हे नमन ऐकतोय, दशावतार पाहतोय . पण आजही त्याची गोडी कमी होत नाही बघ .किती भाग्यवान आहोत आपण असे दशावतार ,अश्या लोककला कित्येक शतके पाहतोय . मी तर संधी मिळाली तर पूर्ण दशावतार करीन म्हणतो " डोळे मिचकावत उंदराची शेपटी ओढत तो म्हणाला .
© श्री.किरण कृष्णा बोरकर 

No comments:

Post a Comment