Wednesday, September 11, 2024

लोकल

लोकल
सकाळी साडेआठच्या सुमारास रोहन कारखानीस विरार स्टेशनमध्ये धावतच शिरला. नाही हो , कसली मुंबई मॅरेथॉनची प्रॅक्टिस ?? उपनगरात राहणारे नेहमीच बस आणि लोकलसाठी धावतच असतात. त्यात आमचे रोहन कारखानीससाहेब तर साध्या छोट्या कंपनीत अकाऊंटंट. म्हणणे अंगठा दाबून हजेरी लावणारे .तीन लेट मार्क झाले की एक कॅज्युअल लिव्ह गेली.म्हणजे वेळेवरची लोकल पकडण्यासाठी धावावेच लागेल ना ?? त्याच्या आडनावात कारखानीस असले तरी कोणत्याही कारखान्याशी संबंध येत नव्हता. 
कोकणातून मोठी स्वप्न बघून आलेला रोहन आता विरार चर्चगेट रोज लोकलचे धक्के खात प्रवास करीत होता.
8.40 ची नेहमीची लोकल नुकतीच प्लॅटफॉर्मवर येत होती.पाठीवरची सॅक पुढे पोटावर घेऊन तो नजर रोखून लोकलवर लक्ष ठेवू लागला.आपल्या देशातील खेळाडूंना निदान एक महिना तरी विरार चर्चगेट स्टेशनवर लोकल ट्रेन पकडायची ट्रेनिंग दिली पाहिजे .कोणाच्याच हातातून बॉल सुटणार नाही .एकदम सावध नजर होईल त्यांची.जवळ येणाऱ्या लोकलकडे पाहत त्याच्या मनात विचार आला आणि खुणेच्या ठिकाणी लोकल येताच उडी मारून दरवाजाचा मधला दांडा पकडून शरीर आत लोटून दिले. आणि नेहमीच्या विंडो सीटवर झेपावला .
"चला सुरवात तर चांगली झाली सकाळची "असा विचार करीतच त्याने ब्लुटूथ काढून कानात सरकविले .
" रोहन भाऊ , उठा आजपासून पुढील सहा दिवस हेच तुमच्या जागेवर बसणार आहेत." सदाशिव फडके हातातील छोट्या गणेश मूर्तीकडे नजर वेधत म्हणाले.
आयला ! होकी 8.40 विरार ग्रुप दरवर्षी गणेशोत्सव लोकलमध्येच साजरा करतो . त्यासाठी दोनशे रुपये वर्गणी ही रोहन देत होता. दरदिवशी सकाळी जाताना आणि संध्याकाळी येताना गणपतीची आरती व्हायची प्रसाद वाटला जायचा. भजन व्हायची .कोण मिमिक्री सादर करायचा .एकूण या लोकलमध्ये उत्साहाचे वातावरण असायचे .
बाप्पाची जबाबदारी सदाशिव फडकेकडे असायची .ते मूर्ती ऑफिसमध्ये ठेवायचे संध्याकाळी लोकलमधून घरी घेऊन जायचे पुन्हा सकाळी लोकलमधून प्रवास.
रोहनला हे सगळे आवडायचे. पण बाप्पाला आयतीच जागा मिळते याचा राग यायचा.
" च्यायला ! रोज कसरत करत जागा पकडायची आणि बाप्पा  आरामात येउन बसतो . बरे तेही शेवटपर्यंत .आम्ही कसे प्रवास करतो याचा अनुभव एकदातरी बाप्पाने घ्यावा परत खाली आल्यावर लोकलकडे बघणारसुद्धा नाही . मी काय म्हणतो याने आमचा प्रवास सुखाचा होवो इतकाच आशीर्वाद द्यावा " टाळ्या वाजवत रोहन मनाशी पुटपुटत होता.
आज गौरी आगमनाचा दिवस होता. स्टेशनवर आज जास्तच हिरवळ दिसत होती.गौरी आगमन आणि पूजनाला बऱ्याच स्त्रिया नटून थटूनच प्रवास करीत असत. 
 सकाळी रोहन  विरार स्टेशनवर हजर झाला . आज  8.40 ची विरार लोकल दोन मिनिटे लेटच होती.त्याचेच कारण की काय या वेळेत गर्दी जास्तच वाढली . 
त्या गर्दीत तो ही रोहनच्या बाजूलाच उभा होता. बाजूला एक वयस्कर स्त्री नऊवारी नेसून  हातात छोटे गाठोडे घेऊन उभी होती. इतकी गर्दी  पाहून ते दोघेही भांबावलेले  दिसत होते.
"नवीन का ?" रोहनने हसत विचारले .
" हो , पण तुम्हाला कसे कळले ?" तो तरुण आश्चर्याने म्हणाला . त्याचा कोपर्यावरच्या तुटलेला दात बोलताना दिसत होता.
" तुझी सॅक अजून पाठीवरच आहे . ती अजून पोटावर घेतली नाहीस त्यावरूनच कळले आणि या  मॅडमला घेऊन तू पुरुषांच्या डब्यात चढणार हे पाहून कळले " असे म्हणेपर्यंत गाडी जवळ आली आणि नेहमीच्या चपळाईने रोहन आत घुसलासुद्धा .
 त्याने ताबडतोब बरोबरच्या स्त्रीला पुढच्या लेडीज डब्यात पाठविले . पण तोपर्यंत त्याचे हाल बेकार झाले .चढताना त्याची सॅक खेचली गेली.पाठीवर गुद्दे पडले. चालताना दोघांच्या पायात पाय येऊन तो अडखळला .
कोणीतरी "अरे चढने को आता नही क्या "असे रागाने विचारत शर्ट खेचला .इतके होऊनही त्याला आत बसायला जागा मिळालीच नाही .नाईलाजाने दोन सीटच्या मध्ये तो उभा राहिला .इतक्यात एक माणूस त्याच्या जवळ येऊन म्हणाला " बाहेर हो ,इथे मी उभा राहतो " 
" च्यायला !  इथे उभे राहायचे ही नंबर आहेत की काय ?? "असा विचार करीत तो बाजूला झाला तर बाजूच्याने अजुन त्याला बाहेर ढकलले .
ट्रेन सुरू झाली . आपली आई तरी स्त्रियांच्या डब्यात व्यवस्थित असेल अशी आशा मनातच व्यक्त केली.
लांबूनच बाप्पाच्या आरतीचा आवाज ऐकू येऊ लागला तसा इथल्या प्रवाश्यानी ही ताल धरला . काहींनी तर त्यालाही जबरदस्तीने आरती म्हणायला लावली. आरती संपताच एका प्रवाश्याने बॅगेतून  साखर फुटाणे काढून सर्वाना  वाटायला सुरवात केली. 
" रोज असणार का या ट्रेनला ? " साखर फुटाणे त्याच्या हाती देत एकाने विचारले .तसे त्याने नकारार्थी मान हलवली.ठीक आहे ." नाहीतर उद्याचा प्रसाद तुलाच आणायला सांगितला असता " असे बोलून देणारा हसला.
" पण इथे बाप्पा कुठेय ?" त्याने आजूबाजूला पाहत विचारले . " शेजारच्या डब्यात आहे ना ? काय बारा डब्यात बारा बाप्पा आणायचे का ?  आपण त्या डब्यात आरती सुरू झाली की इथे ही करतो " तो प्रवासी हात जोडून म्हणाला. 
प्रत्येक स्टेशनवर ट्रेन थांबत होती. पण उतरणारे कमी आणि चढणारे जास्त.  तो चाहुबाजुनी पार चेपला गेला होता . बोरीवली आले आणि एक बसलेला प्रवासी उठला ताबडतोब त्याच्या जागेवर दुसरा प्रवासी बसला . "अरे ह्यानेच तर आपल्याला बाजूला केले होते. आता त्या जागेवर मी बसायला हवे होते " असा विचार करतोच तोच तो प्रवासी त्याच्याकडे पाहून हसला .
" हे आमचे रोजचेच आहे . याची सीट बोरीवलीला रिकामी होते .कधी कधी मला बसायला मिळाले की मीच त्याला सीट देतो नंतर मी बसतो " प्रवासी त्याला समजावत म्हणाला .
नंतर प्रत्येक स्टेशनवर बसलेला प्रवासी उठून दुसऱ्याला सीट देत होता . दादर सुटले तेव्हा कोणीतरी त्याच्या पाठीवर मारून आपली सीट दिली. तो हुश्श करीत बसला.
काहीवेळाने त्याला सदाशिव फडकेच्या कपाटात शिरताना पाहून उंदीर चपापला .
" आहो सर ! काय ही तुमची अवस्था ? आता रस्त्यावर मारामारी ही करू लागलात का ? जरा समोरच्या आरश्यात अवतार पहा तुमचा ? ती कॉलर उघडली आहे . केसांचा भाग गायब .शर्ट घामाटला आहे.इन उघडले आहे .शूजची लेस लोंबतेय .कशासाठी केलात हा पराक्रम " उंदीर सहानुभूतीने म्हणाला.
इतक्याच त्याच्या सोबतची स्त्री ही धापा टाकत त्या कपाटात शिरली .
"गौरी माते तुमची ही अवस्था कोणी केली " उंदीर चिडून शेपटी आपटत म्हणाला .
" गप रे तू ! उगाच फुशारकी मारत काही बोलू नकोस .ह्या तुझ्या मालकाला विचार काय झाले ते .त्याच्यामुळेच माझी अवस्था अशी झालीय."त्या स्त्रीने जोरदार धपाटा त्याच्या पाठीत मारत चिडून म्हटले.
होय ती त्याची गौरी माता होती. यावेळी त्याने स्वतः तिला घेऊन जायचे ठरविले होते.
" पण माते काय झाले ? तू तर स्त्रियांच्या डब्यातून प्रवास करीत होतीस "  तो खाली मान घालून विनयाने म्हणाला.
" कसला तो स्त्रियांचा डबा ? नुसती बजबजपुरी माजली होती तिथे. मला तर कुठच्या कुठे लोटून टाकले .हातातील गाठोडे खाली पडले तर त्यावरूनही पाय देऊन गेल्यात. एका रिकाम्या सीटवर बसायला गेले तर बाजूची म्हणाली  उठ दुसरीची सीट आहे ती .पुढच्या स्टेशनवर अजून स्त्रिया आत शिरल्या आणि प्रत्येकीला तुम्ही कुठे उतरणार असे विचारू लागल्या .माझ्या बाजूच्या स्त्रीने तर कोपऱ्यातील बाईला मी बसेन तुमच्या जागेवर अशी ऑर्डरच सोडली.बसलेल्या स्त्रिया तर तिथेच मेकअप करू लागल्या .तर काहींनी पालेभाजी निवडायला सुरवात केली.एकीने आपले पूर्ण केस व्यवस्थित सेट करून घेतले . त्या दादरपर्यंत हेच चालू होते मध्येच काहीजणी जागेवरून अश्या भांडू लागल्या की मला वाटले कोणीतरी चालत्या ट्रेनमधून फेकले जाईल " ती स्वतःला आरश्यात पाहत रागाने धुसफूसत म्हणाली .
तिचा चेहरा लालभडक झाला होता.कापळवरचे कुंकू पार विस्कटून गेले होते.साडीचा पदर एका बाजूने फाटला होता .
" अरे त्या रोहन कारखानीसने चॅलेंज केले मला . विरार लोकलमधून प्रवास करून दाखवा . मग मी ही पेटलो .इतके लोक प्रवास करतात मग मला का जमणार नाही ? चॅलेंज स्वीकारले  त्यात आई ही येणार होती म्हटले तिलाही लोकल प्रवास घडवू आणि घुसलो ट्रेनमध्ये . पण तुला सांगतो दोन मिनिटात हवा गेली बघ .कसे रे प्रवास करतात ही लोक ? कशी ती ट्रेन जीवावर उदार होऊन पकडतात .एकमेकांना ढकलतात काय ,दुसऱ्यांची सीट अडवतात काय ,सर्व काही विचित्रच आणि या गर्दीत माझी ही पूजा आरती चालूच आहेच . कसे जमते रे याना. "तो स्वतःचे दुखरे अंग दाबीत म्हणाला .
" मग करा की काहीतरी त्यांच्यासाठी ? "उंदीर कुत्सितपणे म्हणाला .
" मी काय करणार ? काही गोष्टी माझ्या हातात नाही ? मी देव आहे जादूगार नाही. पण यांचे रोजचे हाल मी उघड्या डोळ्याने पाहू शकणार नाही  " तो उदासपणे म्हणाला .
त्या दिवशी संध्याकाळी सदाशिव फडकेला ऑफिसमधून बाहेर पडायला थोडा उशीर झाला . ते प्लॅटफॉर्मवर आले तेव्हा विरार लोकल नुकतीच सुटत होती . एका हातात मूर्ती सांभाळत दुसऱ्या हाताने त्यांनी चालत्या लोकलचा दांडा पकडला पण दुसऱ्याचा धक्का लागून बाप्पाची मूर्ती खाली पडली आणि सरळ ट्रॅकवर गेली.
सदाशिव फडकेच्या लक्षात येईपर्यंत ट्रेनने प्लॅटफॉर्म सोडला ही होता .
© श्री.किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment