Saturday, September 14, 2024

तथास्तु

तथास्तु
आज तो त्या आलिशान मंडपात शिरताना खुशच होता. मंडळाने त्याच्या आदरातिथ्यात कोणतीही कसर ठेवली नव्हती. गेली कित्येक वर्षे तो पाहिजे ते देणारा म्हणून फेमस होता. मंडपात सगळे काही आलिशान होते.त्याचे पितांबर ,दागिने रोजच्या रोज बदलले जायचे. उंदरालाही रोज नवीन  भरजरी जॅकेट आणि दागिने घातले जायचे.
"आज मी फारच खुश झालोय. आज तर मी प्रत्येकाची इच्छा पूर्ण करणार .मग ती कोणतीही असो. " तो प्रसन्न चेहऱ्याने उंदराशी बोलत होता.
" तो श्रीमंत उद्योगपती दोन  लाखाचा नैवेद्य आणणार म्हणून खुश झालात ना ? " उंदीर खुदुखुदु मिशीत हसत म्हणाला.
" हल्ली तुही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करतोस का ? " तो चकित होऊन म्हणाला " आणि काय हरकत आहे रे ? आल्याआल्या मन प्रसन्न करणारे काही पाहिले की माणूसच काय पण देव ही खुश होतात. पण काही प्राणी तर समोर चणाडाळ ठेवली तरी खुश होतात " उंदराकडे न पाहता  तो  उत्तरला.
" कळतात हो आम्हालाही कुजकट बोलणी " शेपटी आपटत उंदीर धुसफुसला.
" चला कामाला सुरुवात करू" असे बोलून त्याने नेहमीची पोझ घेतली.
प्रभाकर  हाडाचा चोर .चोर म्हणजे अगदी कट्टर चोर. तो चोरी करताना कसलीच नीतिमत्ता  पाळत नसे. मोठा डल्ला मारला की तो उधळायचा आणि संपला की पुन्हा मोठा हात मारायचा. पण हल्ली बरेच दिवस त्याला कुठे हात मारायची संधी मिळत नव्हती .त्यातच  गणेशोत्सव आल्यामुळे पोलीस खूपच सतर्क झाले होते.
 मंडपात आपल्याला कोणावर तरी हात साफ करता येतील या आशेने घुसला होता. रांगेत उभा राहिला आणि बाप्पा समोर येईपर्यंत त्याला काहीच करता आले नाही शिवाय सीसी कॅमेरा सगळीकडे होतेच.
नाईलाजाने तो बाप्पासामोर उभा राहिला आणि हात जोडून " बाप्पा काहीतरी कर आणि मोठा हात मारायची संधी दे.गणपती उत्साहात पार पाडू दे " मनात म्हणाला.
त्यानेही खुश होऊन "तथास्तु " म्हटले आणि उंदराने चमकून त्याच्याकडे पाहिले.
" म्हणजे तुम्ही खरच सर्वांच्या इच्छा पूर्ण करणार ? आहो ह्या चोराचीही इच्छा पूर्ण करणार तर ? हेच संस्कार करता का भक्तांवर तुम्ही ? तुमची लेखी तक्रार केली पाहिजे बाबांकडे " तो हातातील काजू कतली फेकून देत रागाने म्हणाला .
" किती माज तुला .अरे,  बाराशे रुपये किलो आहे ती काजूकतली .बरेचजण फक्त काचेच्या कपाटातच पाहतात. ज्यांना फुकट मिळते त्यांना किंमत नाही " तो थोडा चिडून म्हणाला .
अर्जुन पुसाळकर भला माणूस . पण गेले काही महिने कंपनी बंद असल्यामुळे थोडा टेन्शनमध्ये असतो . नशीब आपल्या घरी गणपती येत नाही नाहीतर कंपनीच्या प्रॉब्लेममुळे काही करायला जमलेच नसते.आपले आपल्याला हल्ली पुरत नाही त्यात बाप्पाचे लाड कसे करणार . 
आर्थिक चणचण सुरू झाली होतीच त्यात मुलाच्या कॉलेजची फी भरायची होती .ओळखीच्या व्यक्तीला गाठून पीएफ मधून काही पैसे काढायची व्यवस्था केली होती. आजच त्याच्या अकाऊंटला पैसे आले होते.घरात थोडी कॅश हवी होती म्हणून बायकोने पंचवीस हजार घेऊन या असे सांगितले होते .एक काळ असा होता की अर्जुनने अडल्यानडल्या मित्राना भरपूर मदत केली होती पण आता त्यांच्याकडेच पैसे मागायची लाज वाटत होती . 
अर्जुन पैसे घेऊन बँकेतून बाहेर पडला .आपल्या हातातील छोट्या पाऊचमध्ये त्याने ती रक्कम ठेवली होती .कोपर्यावरच्या वडापावच्या गाडीवरून एक वडापाव घेतला आणि पाऊच बाजूला ठेवला.विचारांच्या धुंदीत त्याने वडापाव आणि नंतर चहा संपविला .पैसे देऊन तो काही अंतरावर गेला असताना पाऊचची आठवण झाली आणि छातीत धस्स झाले.तो पळत त्या गाडीवर आला. अपेक्षेप्रमाणे त्याचा पाऊच गायब झाला होता.वडापाववाल्याने हात वर केले. तो रडकुंडीला आला .मनाची समजूत घालण्यासाठी त्याने आजूबाजूला शोधाशोध केली पण काही उपयोग झाला नाही .आजूबाजूच्यांच्या सहानुभूतीचा नजरा सहन करीत तो निघाला .
रस्त्यातच त्याच्या जुन्या मित्राचे घर लागणार होते. सुमंत भोर नेहमीच त्याच्याकडे पैसे मागायचा आणि पगार झाला की स्वतःहून आणून द्यायचा. तो कधीही जास्त रक्कम मागायचा नाही जास्तीत जास्त पाचशे रुपये ही त्याच्याकडून घेतलेली मोठी रक्कम होती . त्याची पैसे परत करण्याची वृत्ती पाहून याने काहिजणांकडे  त्याची शिफारस केली होती आणि त्यांनाही सुमंतने कधी नाराज केले नव्हते. 
खरे तर सुमंतला जुगाराचा नाद होता .तो थोडया पैश्यावरच जुगार खेळायचा .शंभर दोनशे सुटले की उठायचा . लोकांचे पैसे आपल्याकडे आहेत ही जाणीव ठेवूनच तो खेळायचा .आज अर्जुनला दारात पाहून तो चमकला .
" साहेब आज इकडे कुठे ?" सुमंतने अर्जुनच्या हातात पाण्याचा ग्लास देत विचारले .चेहऱ्यावरून काही तरी प्रॉब्लेम आहे हे तो समजून गेला .
पाणी पीतापीता अर्जुनने जे घडले ते सांगितले .
" तू काही पैश्याची मदत करू शकतोस का ?" अर्जुनने मान खाली घालत विचारले .
" साहेब इतकी मोठी रक्कम आजच्या आज उभी करू शकत नाही. मी पण प्रयत्न करतो आणि जमेल तितके देतो .तुम्ही काळजी करू नका " खांद्यावर हात ठेवून सुमंत म्हणाला .
अर्जुन बाहेर पडला आणि समोरच्या मंडपात बसलेल्या त्याच्यावर नजर गेली. तो आत शिरला .त्याच्या दर्शनासाठी मोठी रांग होती . पण रांगेत उभ्या असलेल्या भक्तांना चहा नाश्ताची सोय होती. तासाभरात अर्जुन त्याच्यासमोर उभा राहिला .आज तो खुश आणि आनंदी दिसत होता. माग काय मागायचे असेच भाव त्याच्या डोळ्यात दिसत होते .त्याने मनोमन हात जोडून आपल्याबाबतीत काय घडले हे सांगितले.आणि माझे पैसे परत मिळू दे अशी इच्छा व्यक्त केली.
इच्छा व्यक्त करतात तो हसल्याचा भास झाला . मनावरचा भार हलका करून अर्जुन बाहेर पडला . 
" त्यालाही होय म्हणालास तू .त्याचे पैसे त्या चोरानेच चोरले होते ना .त्यालाही तू होय म्हणालास .आता काय तू बाहेर जाऊन चोराकडून पैसे काढून ह्याला देणार का " उंदीर चिडून म्हणाला पण यावेळी ड्रायफ्रुट घातलेला मोदक हातातून सोडला नाही . 
" मी कुठून पैसे आणू ? माझे काम फक्त तथास्तु म्हणायचे " तो डोळे मिचकावत म्हणाला .
अर्जुनला रिकाम्या हाताने परत पाठविताना सुमंतच्या मनाला लागले होते. आपल्या पडत्या काळात अर्जुन साहेबांनी केलेली मदत तो विसरला नव्हता. पण आज त्याच्याकडे पैसे नव्हतेच. उलट मित्राकडून तीनशे रुपये आणले होते .जुगारात तीनशेचे पाचशे करून बाहेर पडायचे असा त्याचा प्लॅन होता . आज नशीब असेल तर जास्त खेळून थोडे पैसे अर्जुनला द्यायचे असा निश्चय करून तो बाहेर पडला .
बाहेर निघताच त्याची नजर समोरच्या मंडपात गेली .आज जरा जास्तच गर्दी मंडपात दिसत होती .कोणीतरी सेलिब्रिटी आलाय तर त्याला पाहूनच जाऊ जमल्यास सेल्फी काढू असा विचार करून तो आत घुसला . सेलिब्रिटीची पूजा संपायला आणि तो बाप्पाच्यासमोर यायला एकच गाठ पडली .
"अर्जुनचा प्रॉब्लेम सोडविण्यासाठी मला मदत कर" अशी इच्छा मनात ठेवून त्याने मनोभावे नमस्कार केला आणि योगायोगाने सेलिब्रेटीच्या हातातून पाचशेची नोट त्याच्या पायाशी पडली . त्याने पटकन उचलून त्या सेलिब्रिटींच्या हातात दिली.
" लगता है ये नोट आपको मिले ऐसी बाप्पा की इच्छा है . ये बाप्पाका प्रसाद समझकर आपके पासही रख लो " असे म्हणून नोट जबरदस्तीने सुमंतच्या खिश्यात ठेवली आणि आपल्या खिशातील मोबाईल काढून एक सेल्फी त्याच्या सोबत घेतला .सेल्फीत सेलिब्रिटी, सुमंत आणि हसणारा बाप्पा सुंदर दिसत होते.
" तुमचे डोके ठिकाणावर आहे का ?" उंदीर दोन पायावर उभा राहून आवेशात म्हणाला .
" काही वर्षांपूर्वी असाच प्रश्न टिळकांनी केसरीमधून सरकार ला विचारला होता . काय दिवस होते ते. टिळक तुम्ही धन्य आहात " तो मनोभावे हात जोडत भूतकाळात गेला.
" तुम्ही त्या जुगाऱ्याला पैसे दिलेत .आता तो जुगार खेळायला जाईल बघा " तो पुन्हा चिडला आणि शेपटी आपटू लागला.
खिश्यातील पाचशेच्या नोटेची ऊब अनुभवत तो जुगाराच्या अड्डयात शिरला तेव्हा मोजकेच लोक बसले होते . आपल्याला पाहिजे तसे गिऱ्हाईक शोधत असताना त्याची नजर कोपऱ्यातल्या व्यक्तीकडे गेली .त्याच्यासमोर फक्त एकच जण खेळायला बसला होता आणि त्या व्यक्तीच्या समोरचा पाऊच थोडा फुगलेला दिसत होता .
" हाय मी सुमंत ,बसू का तुमच्या सोबत खेळायला ' सुमंत त्याच्यासमोर उभा राहून म्हणाला.
" मी प्रभाकर , बसा ना आपण खेळू "असे म्हणून त्याला समोरची खुर्ची ऑफर केली .
हळूहळू त्यांचा डाव रंगत गेला .डाव मोठा होतोय हे पाहून तिसरा साथीदार उठून गेला आणि हे दोघेच राहिले. आज  सुमंतचे नशीब जोरदार दिसत होते .एक डाव हरत होता तर चार डाव जिंकत होता .प्रभाकरच्या पाऊच मधील रक्कम कमीकमी होत होती .आता प्रभाकर हरत जात होता तसा चिडून जास्त चुका करत होता तर सुमंत सावध झाला होता .पाहता पाहता तीस हजारची रक्कम सुमंतच्या समोर जमा झाली आणि प्रभाकरने तो पाऊच त्याच्यादिशेने फेकत मी हरलो हे जाहीर केले.
ती रक्कम त्या पाऊचमध्ये भरून सुमंत तसाच अर्जुनच्या घरी गेला आणि त्याच्या हातात तो पाऊच दिला .तो पाऊच पाहताच अर्जुन चक्रावला आणि त्याने पाऊचविषयी सुमंतला विचारले .सर्व काही ऐकून सुमंतने पाच हजार काढून घेतले आणि उरलेले पंचवीस हजार रुपये अर्जुनला परत केले .
" साहेब हे तुमचेच  पैसे आहेत . शेवटी हे तुमच्या कष्टाचे पैसे आहेत . त्यावर दुसरे कोणीही हक्क सांगू शकणार नाही . ते पुन्हा मिळाले असेच समजा. इतकी वर्षे माझ्यासोबत चांगुलपणे वागण्याचे फळ आहे असे समजा " सुमंत हात जोडून म्हणाला.
इथे प्रभाकर पुन्हा बापाच्या मंडपात आला .पुन्हा आपल्याला मोठे घबाड मिळू दे अशी इच्छा व्यक्त केली .पण यावेळी त्याने फारसे लक्ष दिले नाही 
" काय निर्लज्ज लोक आहेत .पुन्हा तुझ्याकडे काहीतरी मागायला आला " उंदीर खुसखुसत म्हणाला .
" एकावेळी  एकाची एकच इच्छा पूर्ण करायची हा  माझा नियम  आहे त्यामुळे आता त्याला काहीच मिळणार नाही " तो हसत म्हणाला .
" पण हे तू कसे जुळविलेस " उंदराने मावा बर्फी तोंडात टाकीत विचारले .
" अरे मी काय करणार ? मी देव आहे जादूगार नाही .आपण ट्रेडिंग करतो . म्हणजे याचे उचलून त्याला द्यायचे आणि त्याचे उचलून ह्याला . पंचवीस हजार मी कुठून आणू. प्रभाकरला पैसे पाहिजे मी अर्जुनकडून दिले .अर्जुनला त्याचे पैसे पाहिजे होते ते सुमंतकडून दिले .सुमंतला जुगारात मोजकेच पैसे जिंकतो .यावेळी त्याला जास्त पैसे मिळाले तो जास्त जिंकला आणि त्याने अर्जुनला त्याचे पैसे दिले .आता सांग मी यात काय केले " समोरचे सफरचंद उचलून तोंडात टाकीत तो म्हणाला .
© श्री.किरण कृष्णा बोरकर 

No comments:

Post a Comment