Friday, September 6, 2024

अंत्यसंस्कार

अंत्यसंस्कार
रायगड जिल्ह्यातील पोटगाव हे मुख्य शहरापासून थोडे आतच होते. तसेही रायगड जिल्हा मुंबईपासून साधारण शंभर किलोमीटर लांब. तरीही काही गावात मात्र अजूनही शहरीकरणाची लागण झाली नव्हती. पोटगाव ही त्यातलेच. मोजून शंभर घरांचे ते गाव. बहुसंख्य एकाच भावकीतील त्यामुळे त्यांची एकी होती.
गावात सगळे सण उत्साहाने साजरे होत. सणात पूर्वापार चालत आलेल्या प्रथा परंपरा चालत असत.चाकरमानीही हटकून बहुतेक सणाला हजर राहत.
कोकण म्हटले की होळी आणि गणेशोत्सव हे मानाचे सण. जगाच्या पाठीवर कुठेही राहत असलेला कोकणी माणूस आपल्या परीने हे सण तिथे साजरे करतात तर ज्यांना शक्य असेल ते मूळ घरी म्हणजे कोकणात येऊन साजरे करतात.
गावात अनंत चोपडेकर नावाचा एकच मूर्तिकार होता. गावातील सर्व मूर्त्या तोच तयार करत असे.साधारण पन्नाशी पार केलेला अनंत उर्फ अंत्या कोण ? कुठून आला ? हे कोणालाच माहीत नव्हते. पण गेली तीस वर्षे तो गावात एकटा राहतो इतकेच सगळ्यांना माहीत होते.
एकटा जीव सदाशिव असणारा अंत्या संध्याकाळ झाली की दारूचा खंबा उघडून बसायचा.जे फुकटे होते त्यांना आयतीच संधी मिळायची . हळूहळू वय वाढत गेले तसे अंत्याच्या कामात फरक पडू लागला .
तसा अंत्या पक्का गणेशभक्त.एकदा का मूर्ती बनवायला सुरवात केली की तहानभूक हरपून कामात झोकून द्यायचा .मग दारुचेच काय पण खाण्याचेही सुचायचे नाही . 
पण हल्ली त्याचे हात थकायला लागले .गावातील लोक त्याच्याकडून मूर्ती न आणता शेजारच्या गावातून किंवा मुंबईतून आणू लागले. 
 अनंत चोपडेकरवर या गोष्टींचा काहीही फरक पडला नाही . आपल्या कलेवर त्याचा विश्वास होता.जे काही करेन ते मनापासून आणि उत्कृष्ट करेन हेच लोकांना सांगायचा. त्यामुळे गावातील मोजकीच घरे त्याच्याकडे मूर्ती बनवायला देत.
बाळा सावंत हा त्यातील एक. घरातील सर्व बाळाला अंनंत चोपडेकरकडून मूर्ती आणू नका असे सांगत . अंत्या मूर्ती बनवायला फार वेळ लावायचा. बाळाचे शेजारी तर मूर्ती विसर्जनापर्यंत तरी घरी येईल ना ? असे चेष्टेने विचारायचे. पण बाळा नेहमीच आपल्या मतावर ठाम होता. जोपर्यंत मी किंवा अनंत चोपडेकर जिवंत आहोत तोपर्यंत मूर्ती अनंतकडूनच येईल अशी प्रतिज्ञाच केली होती त्याने.
उद्या गणपती येणार म्हणून सगळा गाव खुश होता. हरतालिकेचा उत्सव गावात साजरा होत होता.आज गाव काही झोपणार नव्हते.
बाळा सावंतकडेही सर्व जागेच होते. पण त्यांच्या चेहऱ्यावर मूर्ती वेळेत येईल ना याचेच टेन्शन होते. कारण सकाळीच अंत्याने मूर्ती बनवायला सुरवात केली होती. पण त्यानंतर  दिवसभर तो घराबाहेर दिसला नव्हता. रात्र झाली तसे बाळा अंत्याच्या घरी गेला . अंत्या मूर्तीपूढे ठाण मांडून बसला होता. 
रात्रीचे नऊ वाजले होते. मूर्तीचे साधारण नव्वद टक्के काम पूर्ण झाले होते.
" सावतानू आता मूर्ती घेऊनच जावा " बाळा सावंतला दारात पाहताच अंत्या म्हणाला.
" तू सकाळपासून जागेवरून उठलस नाय की काय ?"  बाळाने कमरेवर हात ठेवून रागात  विचारले.
" एकदा बसलंय की काम पूर्ण करूनच उठतय बघा .त्यात तुम्ही जुने गिऱ्हाईक. माझ्यावर तुमचो विश्वास असा. आतापर्यंत तुमका कधी नाराज केलंय नाय .यावर्षीची मूर्ती बघून लोका तोंडात बोटे घालतील बघा." अंत्या हसत म्हणाला.
"त्याची माका खात्री हाय .पण थोडी तब्बेतीची काळजी घे .ह्या वयात इतकी मेहनत  झेपूची नाय तुका " बाळा काळजीने म्हणाला .
शेवटी पहाटे चार वाजता मूर्ती तयार झाली. 
" बाळा भाऊ, आताच मूर्ती घेऊन जा .आता मी झोपलो तर सकाळी कधी उठेन सांगता येत नाय " थकलेल्या स्वरात अनंत म्हणाला .बाळा सावंतने ताबडतोब घरच्यांना बोलावून मूर्ती घरी नेली.
अनंतने खरोखरच मूर्तीत जीव ओतला होता.मूर्तीवरून कोणाचीच नजर हटत नव्हती. बाबा अनंताकडून का मूर्ती घेतो याचे कारण घरातील सर्वानाच पटले होते.
 पण  सकाळी अनंत चोपडेकर गेला ऐकून संपूर्ण गाव हळहळले. अर्थात  त्या हळहळीमागची कारणे वेगवेगळी होती.
काहीजण आपल्याला यापुढे स्वस्तात मूर्त्या मिळणार नाहीत याचे दुःख करीत होते. तर काहींना पैसे परत मिळणार नाहीत याचे दुःख,  तर काहींना आता त्याची स्तुती करून फुकटची प्यायला मिळणार नाही याचे दुःख.
होय अनंत  चांगला कलाकार असला तरी व्यसने होतीच. माणूस म्हणूनही खूप दिलदार होता. अनंतला लोक फक्त मूर्ती पाहिजे असे सांगत. तो त्याच्या मनाप्रमाणे तो मूर्ती घडवे आणि लोक देतील तितक्या किमतीला देत असे.
" भावानो कलेची किंमत करायची नसते" असे संध्याकाळी मैफिलीत बसल्यावर बोले. खिश्यात पैसे असले की गरजूना मदतही करत असे आणि नसले की लोकांकडून उधारही घेत असे. त्याचाच फायदा घेऊन काहीजण त्याच्याकडून दारू फुकट पिऊन जात. 
गणेशोत्सव जवळ आला की हा मूर्ती बनवायला बसायचा.त्याच्या लहरीपणामुळे लोक बाजूच्या गावातून मूर्ती आणायचे. पण  हा ज्यांना मूर्ती बनवून द्यायचा त्यांना तर तिचे विसर्जन करायचीही इच्छा होत नसे.
पण एकदा का मूर्ती बनवायला सुरवात केली की अनंत दारूला स्पर्श करत नसे. तो मोजक्याच मूर्त्या बनवायचा पण त्याही मनापासून .मूर्ती बनवताना आपल्या मनातले सर्व मूर्तीशी बोलायचा. आपली सुखदुःख त्याच्याशीच शेयर करायचा. त्याच्या कुटुंबाविषयी  कोणाला फारशी माहिती नव्हती माहिती असेल तर फक्त त्या समोर असलेल्या बाप्पाला.
आजपासून त्याचा उत्सव चालू होणार होता. हल्ली तो दोन दिवस आधीच इथे येत होता. तो येत होता की भक्त उत्साहाने त्याला आधीच घेऊन येत होते हा चर्चेचा विषय.
"आजकाल लोक खूपच उत्साही झाले आहेत. ट्रॅफिकची कारणे सांगून दोन दिवस आधीच मला मंडपात घेऊन जातात आणि तोंडावर कापड घालून कोपऱ्यात उभे करतात. " तो तयारी करत करता आपल्या उंदराशी बोलत होता.
" तुमच्या हातात आता काय राहिले आहे का ?" त्याने राजगिऱ्याच्या लाडूचा तुकडा तोडीत विचारले." मनाला वाटेल तितके दिवस तुम्हाला ठेवतील ते. त्यानिमित्ताने लोकांकडून भरपूर पैसे कमाविता येतात . पण जाऊदे आपल्यालाही चांगला नैवेद्य मिळतोच की " तो शेपटी उडवत  म्हणाला. त्याच्याही अंगावर जरीचे जॅकेट होते
" तुला नेहमी खाण्याचेच सुचते कसे ?  तुला माझे वजन सहन करता यावे म्हणून मी डायटिंग करतो . पण तू मात्र सतत खात असतोस" तो चिडून म्हणाला. 
गावात मात्र अजूनही त्याची तयारी झाली नव्हती.उद्या त्याला बाळा सावंतांकडे जायचे होते. पण दरवर्षीप्रमाणे अनंत त्याच्या हिशोबानेच चालला होता. जितका जास्त उशीर तितका उशिरा नैवेद्य हे नक्की होते. 
तो मनातल्या मनात चरफडत अंत्यासमोर बसला होता.नेहमीप्रमाणे त्याच्याशी गप्पा मारत अनंत हात चालवत होता. खरेतर दरवर्षी अनंताची नेहमीची स्टोरी ऐकून तो कंटाळला होता. ह्याच्या बडबडीतून कोणीतरी सोडवायला आले तर बरे होईल. असा विचार मनात येतोच तोच खुद्द बाळा सावंत दारात हजर झाला.चला आतातरी त्याचे काम लवकर आटपेल .
पण कसले काय ? अनंताचे तोंड दुसऱ्याच विषयावर चालू झाले. बाळाही हट्टाला पेटला होता .मूर्ती पूर्ण झाल्याशिवाय घरी जायचेच नाही असे ठरवूनच आला होता बहुतेक. 
शेवटी काम पूर्ण झाले असे अंत्याने जाहीर केले तेव्हा घड्याळात पहाटेचे चार वाजले होते. बाळा मनातून प्रचंड चिडला होता. पण शेवटी रिझल्ट पाहून त्याचा राग पळून गेला. त्याचेही  तेच झाले . पहाटे चारला अनंत त्याला पूर्ण करून उठला तेव्हा त्याने आरशात स्वतःचे रूप पाहिले आणि खुश झाला .संपूर्ण गावात त्यांच्याइतके  सुंदर कोणी नसेल याची खात्री होती. 
सकाळी तो सावंतांच्या मखरात बसला तोच अंत्या गेल्याची खबर आली.त्याच्या छातीत एकदम धस्स झाले.
आपल्या हजारो वर्षांच्या काळात मृत्यू त्याला नवीन नव्हता.त्याने स्वतः कित्येकांना ठार मारले होते. पण आज पहाटेपर्यंत जो आपल्याला घडवत होता. त्याच्या मनातले सांगत होता. तोच आता या जगातून निघून गेला होता. 
अनंत मनापासून त्याची भक्ती करायचा. तो कधीच कोणाविषयी वाईट बोलायचा नाही. आज तोच अनंत चोपडेकर आपली सर्व सिक्रेटस त्याच्याकडे सोपवून अनंतात विलीन झाला होता.
"बरे झाले बाप्पाला घरी आणले आणि तो गेला .नाहीतर ह्याला काही आणता आले नसते." कोणीतरी पुटपुटले.
" पण ह्या अंत्याचे अंतिमसंस्कार कोण करेल आता  ? कोणाला याच्या घरच्यांची माहिती आहे का ?" गावातील एक जेष्ठ नागरिक विचारत होता.
" बरा झाला हो आपल्या भावकीत नाही .नायतर आख्खो सण सुतकात गेलो असतो. सगळे गणपती देवळात बसवूक लागले असते आणि कोणाकडे जाऊक पण मिळाला नसता." दुसरा जेष्ठ नागरिक पुटपुटला.
" पण आता  या प्रेताला हात कोण लावेल ? गावात प्रत्येकाकडे गणपती बसलाय आणि पूजेची तयारी ही चालू झालीय " पुन्हा तो पहिला जेष्ठ नागरिक म्हणाला.
"आधी आपल्याकडे पूजा करून घेऊ मग काय ते ठरवू " असे ठरवून सगळे आपापल्या घरी गेले.
 इकडे मुंबईत पहाटेचे चार वाजले होते आणि बंड्याचा मोबाईल वाजला. इतक्या रात्री अनोळखी नंबरवरून  कोणाचा फोन म्हणून काळजीने घेतला.
समोरून एक व्यक्ती बोलत होती.तो आवाज भारदस्त आणि विश्वासाचा वाटत होता.  पोटगावात एका व्यक्तीचे अंत्यसंस्कार करायचे आहेत मी नाव आणि लोकेशन पाठवतो.
बंड्या आणि त्याचे काही मित्र अनाथाश्रमातील आणि वृद्धाश्रमातील अनाथ बेवारस प्रेतांचे विधिवत शास्त्रोक्त पद्धतीने अंत्यसंस्कार करीत होते. त्यांचे हे सामाजिक कार्य अनोखेच होते.पण ज्यांना मृत्यूनंतर कोणीच नाही त्यांना बंड्याचा आधार होता. त्याला कधीही कोणीही फोन केला की तो धावून जात असे.
आताही त्याच्या फोनवर  नाव आणि लोकेशन आले तसा तो उठला दोनतीन फोन फिरवले आणि एसटी डेपोकडे निघाला.
दुपारी नेहमीची  एसटी पोटगावात शिरली आणि त्यातून चार तरुण उतरले. गणेशोत्सवात गावात सतत कोणतरी येतच असतात. पण यावेळी हे सगळेच नवीन दिसत होते आणि त्यांनी आल्याआल्या अनंत चोपडेकराचा  पत्ता विचारला.
"अनंत चोपडेकर आजच गेले " पत्ता सांगणारा वरती बोट दाखवत म्हणाला.
"म्हणूनच आम्ही आलोय "त्यातील एक मुख्य तरुण उत्तरला.
" म्हणजे " आश्चर्याने त्याने विचारले.
" मी बंड्या आणि हे माझे मित्र ,आम्ही अंत्यसंस्काराचे काम करतो .पहाटेच मला मोबाईलवर मेसेज आला . अनंत चोपडेकर गेले. त्यांचे अंत्यसंस्कार करायला जाणार का ? त्यांच्या वारसांचा आणि नातेवाईकांचा पत्ता नाहीय आणि शोधायला वेळ ही नाहीय. मग ह्यांना घेतले आणि आलो .चला बॉडी दाखवा लवकर मोकळे होऊ" बंड्या नेहमीच्या सहजपणे म्हणाला.
" आहो असे कसे एकदम अंत्यसंस्कार  करणार  तुम्ही ? " गावातील माणसे हळूहळू गोळा होऊ लागली.
" मग तुम्ही करणार ? करा ,आम्ही निघतो "चेहऱ्यावर कोणतेही भाव न आणता बंड्या उत्तरला.
ते पाहून सगळे मागे झाले.
" तसे नाही हो .आज सण आहे ना ? प्रेताला हात लावायला सगळे घाबरतात. इथे प्रत्येकाच्या घरात गणपती बसलाय.सुतक पाळावे लागेल म्हणून कोणी पुढाकार घेत नाही " जेष्ठ नागरिक पुढे येऊन म्हणाले.
" हो का ! मी वर अर्ज करतो .सणासुदीला कोणाला वर बोलवू नका .अंत्यसंस्काराला चार माणसे ही गोळा होत नाहीत.तसेही म्हातारे झाले की नातेवाईक दूर होतातच आता सणाचे कारण मिळाले "बंड्या छद्मीपणे हसत म्हणाला.
"चला  आम्हीच करतो सर्व .तुम्ही लांबूनच पहा " बंड्या आवाज चढवून म्हणाला.
शेवटी सर्वजण अंत्याच्या  घरी आले.बिछान्यावर अंत्या वेडावाकडा पडला होता. बहुतेक झोपेतच हृदविकाराचा झटका आला असावा.कोणी हरकत घेणारे नव्हतेच त्यामुळे डॉक्टर सर्टिफिकेट मिळविण्यात कोणतीच अडचण आली नाही .
बंड्या आणि त्याच्या मित्रांनी त्याला उचलून खाली ठेवले.एक जण पाणी गरम करायला गेला. तोपर्यंत गावकऱ्यांनी अंत्ययात्रेचे सामान आणून ठेवले.अनंतच्या शेवटच्या आंघोळीची तयारी झाली. इतक्यात दरवाज्यावर तो येऊन उभा राहिला.
" मी ओमकार , अनंतमामाचा भाचा . मीच तुम्हाला मेसेज केला होता. मला माहितीय गावात  आज कोण हात लावणार नाही याला.  कोणाला तरी बोलावून प्रेताची व्हील्हेवाट लावतील. पण तुम्ही प्रेतावर अगदी धार्मिक रितिरिवाजनुसार अंत्यसंस्कार करतात. हे माहीत होते मला म्हणून तुम्हाला मेसेज केला .मला तुमची गरज आहे म्हणून तुम्हाला बोलावले." ओमकार दिसायला थोडा स्थूल होता. पण चेहऱ्यावर तेज होते.त्याच्या डोळ्यात एक अनामिक शक्ती होती ज्याने समोरचा शांत होत होता.
" मग अंत्यसंस्कार तुम्ही करणार तर " बंड्याने रोखून विचारले.
" होय "असे म्हणत ओमकार घरात शिरला.
" च्यायला माणूस कलाकार होता तर " बंड्या घरात चहूबाजूने नजर फिरवीत पुटपुटला.
मग सर्वांनी मिळून अनंत चोपडेकराच्या अंतिम यात्रेची तयारी केली. खांदा द्यायला ओमकार पुढे झाला तर बंड्याने नेहमीप्रमाणे मडके धरले.
स्मशानात ओमकारने प्रेताला अग्नी दिला आणि बंड्याचे आभार मानले.सर्वजण दुःखी अंतःकरणाने परत फिरले.
" कार्याचे काय ?" स्मशानातून परत फिरताना  बंड्याने ओंमकारला विचारले.
"नक्की ठरविले नाही . त्या दिवशी विसर्जन असेल .मलाही निघावे लागेल " ओमकार म्हणाला.
" तुमची इच्छा असेल तर आम्ही कार्य करू .आता हातात घेतलेले कार्य पूर्णच करू " बंड्या सहज स्वरात म्हणाला.
" तुम्हाला हे कसे जमते हो हे सर्व ?" ओमकारने कुतूहलाने विचारले. "आज घरोघरी गणपती आगमन झालेय .तुमच्याकडेही आला असेल ना ? तरी तुम्ही येथे आलात ?"
" समोर दिसत नसलेल्या देवाची पूजा करण्यापेक्षा आयुष्य जगून मेलेल्या माणसांची सेवा करणे जास्त चांगले नाही का ? गणपती दरवर्षी येतील ,नंतर नवरात्र सुरू होतील ,मग दसरा दिवाळी हे चालूच राहतील .पण जे उत्साहाने साजरे करणारे निघून गेले तर त्यांची आठवण कोण काढणार ? मला त्या लोकांना आनंद द्यायचा आहे जे मृत्यूनंतरही खुश असतील." बंड्या गंभीर होत म्हणाला आणि त्याला नमस्कार करून सर्व स्टॅण्डच्या दिशेने निघाले.
सावंतांच्या मखरात तो  शिरला तेव्हा उकडीचा मोदक खात बसलेल्या उंदराने नाक वाकडे केले. 
" प्रेताला जाऊन आलास तर आंघोळ करून तरी यायचे ना ? आता हा स्मशानातील वास चार दिवस जाणार नाही " तो शेपटी आपटीत रागाने म्हणाला.
" आंघोळ केली तर सर्व निघून जाईल ना ? मग अनंताने मेहनत घेऊन मला तयार केले त्याची मेहनत ही फुकट जाईल ना ? राहू दे असेच .त्यानिमित्ताने  घरी जाईपर्यंत अनंताची आठवण येत राहील."तो उदासपणे म्हणाला.
" शेवटी इथे आल्यावर अंत्यसंस्कार करायची इच्छा ही पूर्ण करून घेतलीस तर .ते तरुण कुठे सापडले तुला ? पटकन धावून आले तुझ्या मदतीला " उंदराने कुतूहलाने विचारले.
" या देशात मूलखावेगळी माणसे आहेत बघ.फक्त त्याची माहिती आपल्याला नसते.ह्याची माहिती मला एका वृद्धाश्रमात मिळाली. अनंतने भाचा मुंबईत असतो हे बोलता बोलता मला सांगितले होते. तो नक्की कुठे आहे हे त्यालाही माहीत नव्हते .मग मीच बंड्याला मेसेज केला आणि भाचा बनून पुढे गेलो. हे अंत्यसंस्कार कसे करतात आपल्याला माहीत नाही म्हणून याना मदतीला घेतले आणि अग्नी द्यायचे काम मी केले.तसेही अनंत दरवर्षी मला घडवितो  मग माझे बाबा झाले ना ते. त्यानिमित्ताने पुत्राचे कर्तव्य पार पाडले. अरे ही सर्व आपलीच माणसे आहेत.आपल्याला डोक्यावर घेऊन घरी आणतात आपल्याला निरोप देताना डोळ्यातून पाणी काढतात. मग त्यांच्यासाठी  मी इतकेही करू शकत नाही का ? चल मोदक काढ मलाही भूक लागली " उंदरांच्या हातातील मोदक हिसकावून घेत तो म्हणाला.
 रात्री आरती म्हणताना  गणपतीच्या अंगाला राखेचा विशिष्ठ वास कसा येतोय ?  असा प्रश्न सावंतांना पडला होता.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment