Thursday, September 12, 2024

केयरटेकर

केयरटेकर
त्या एकमजली चाळीच्या शेवटच्या कोपऱ्यातील खोलीत वासुदेव जाधव आपल्या कुटुंबासोबत राहत होते . ते  मुलगा अनिल आणि सून अनिता असे तिघांचेच कुटुंब. दोन वर्षांपूर्वी पत्नी गेली आणि ते थोडे खचलेच.त्यात परिस्थिती बेताचीच .पन्नास वर्षांपूर्वी कोकणातून मुंबईत आले खरे पण परिस्थिती बेताचीच राहिली.मुंबईत कोण उपाशी राहीत नाही हे खरे पण त्यासाठी मेहनत करावीच लागते. 
इथे येऊन ते मिल कामगार झाले आणि मिल कामगारांचे पुढे काय झाले हे सांगायला नकोच .भविष्यात पुढे काय वाढून ठेवलंय याची कल्पना आल्यामुळे एकाच मुलावर थांबायचा निर्णय घेतला . गिरणी संपात खूप हाल झाले त्याचा परिणाम मुलाच्या भविष्यावर झाला .पुढे त्यानेच स्वतःसाठी मुलगी शोधून आणली आणि आईबापाचा त्रास कमी केला .
काही वर्षांपूर्वी गावातील संबंध संपले म्हणून इथेच गणपती आणायचा निर्णय घेतला .अनिल आणि त्याची बायको कामाला जायचे . घरी हे नवरा बायकोच असायचे .अनिल आणि अनिताला देवात फारसा इंटरेस्ट नव्हता पण आई वडिलांना नाहीही म्हटले नाही .तुम्ही दोघेच बाप्पाचे सर्व काही करा असे सांगून गप्प झाले.
आपल्या पत्नीच्या साथीने वासुदेव उर्फ वासू बाप्पाची सर्व तयारी हौसेने करायचे .सहा दिवस घर कसे भरलेले असायचे .ते स्वतः मखरापासून विसर्जनापर्यंत सर्व तयारी करायचे . अनिल आणि अनिता संध्याकाळी फक्त आरतीला टाळ्या वाजवायला असायचे .
पण मागच्या वर्षी वासुदेवची पत्नी देवाघरी गेली आणि ते एकटे पडले. हल्ली ते कोणाशी फारसे बोलत नसत. एकटेच दरवाजाबाहेर कोपऱ्यात बसून रहात. पण गणेशोत्सव जवळ आला आणि ते थोडे खुलले .मुलांकडून थोडे पैसे घेऊन मूर्ती बुक करून आले .मखराचे साहित्य घेतले .
बाबा खुश आहेत हे पाहून अनिल ही काही बोलला नाही . दरवर्षीप्रमाणे सकाळीच बाप्पाचे त्यांच्या घरी आगमन झाले .
यावर्षी वासुदेवचा मखर कसा असेल अशी कल्पना करीत तो अनिलच्या डोक्यावरून घरात शिरला आणि समोरचे साधेच पण ऐसपैस मखर पाहून खुश झाला.त्याला असेच ऐसपैस मखर आवडायचे .चार नैवेद्याची ताटे जास्त राहतात असे त्याचे म्हणणे आणि या गोष्टीला त्याचा उंदीर ही सहमत होता .
सकाळची पूजा झाली आणि अनिल अनिता बाहेर पडले .आता घरात फक्त वासुदेव होते . जाताजाता अनिलने "बाबा काळजी घ्या, लक्ष ठेवा "असे सांगताच . वासुदेवने "तो आहे , तुम्ही निश्चितपणे जा " असे म्हणतात मखरात आरामात बसलेला तो दचकून उठला .
" घ्या आता ह्याला तुम्ही सांभाळा .आहो याने आपल्याला आणलेय की आपण यांच्यासाठी आलोय .बिनधास्त आपल्या जीवावर घर सोडून जातात " उंदीर त्रासिक मुद्रा करून म्हणाला.
" वासुदेव फार हौसेने करतो रे आपले आणि कधी काही मागत ही नाही आपल्याकडे .तसेही असे बोलायची पद्धत आहे .कितीजण आपल्या पायाशी उभे राहून बाप्पा लक्ष असू दे असे म्हणताच " बेफिकीर स्वरात तो म्हणाला.
 आता घरात शांतता होती म्हणून तो आणि उंदीर मोबाईलवर ल्युडो खेळत बसले होते.
" जग किती बदलले आहे बघ .एके काळी महाभारतात कौरव आणि पांडव जमिनीवर बैठक मारून समोरासमोर बसून द्युत खेळत होते आणि आता आपण मोबाईल वर खेळतोय " तो हसत उंदराला म्हणाला .
" हे काही नाही आता तर तुम्ही कैलासावर बसलेल्या बाबांशी इथे बसून ल्युडो खेळू शकता आणि इतर कोणाशीही खेळू शकता " उंदीर त्यांच्याकडे पाहून कीव करीत म्हणाला .
" काय म्हणतोस ? हे इतके पुढारलेले आहेत " आश्चर्याने तो म्हणाला .
" हो नाहीतरी हल्ली तुमची ऑनलाइन पूजा होते पुढे कदाचित आपल्याला बोलावणार नाहीत डायरेक्ट पुजाच करतील मोबाईल समोर ठेवून " उंदीर  शेंगदाणे तोंडात टाकून म्हणाला .
 तिथे अचानक पाणी पीतापीता वासुदेव खाली कोसळले . ते कोसळतात उंदीर टंणकन उडी मारून त्याच्या मागे गेला .
" अरे तो वासुदेव खाली पडला बघ आता काय करायचे "  तो उंदराला शोधत विचारू लागला . 
" मला काय माहित काय करायचे .ते तुम्हीच पहा ." उंदीर नुसता इकडेतिकडे पळत म्हणाला .
शेवटी हा मखरातून  बाहेर पडला .
"अहो असे कसे बाहेर पडलात तुमच्या ओरिजिनल रुपात ? असे पाहून वासुदेव जास्तच घाबरेल ?" त्याला ओरिजनल रुपात बाहेर पडताना पाहून उंदीर मोठ्याने ओरडला .
" इमर्जन्सी आहे .असाही तो बेशुद्ध आहे .तू दरवाज्यावर लक्ष ठेव मी बाकीचे पाहतो " असे म्हणून त्याने वासुदेवला उठवले .बिछान्यावर झोपवले . शर्ट काढून फॅनचा स्पीड वाढविला .
"बहुतेक बीपी वाढले असावे ." हातापायाला मालिश करत तो म्हणाला .
" तू काय डॉक्टर आहेस का ? "उंदीर छद्मीपणे म्हणाला " आणि निदान घरात कोणीतरी येईपर्यंत तरी त्याला काही होऊ देऊ नकोस नाहीतर पोलीस केस झाली तर आपल्याला घेऊन जातील " उंदीर त्याला सावध करीत म्हणाला .
" तू तर कायदेपंडित आहेस "तो  हसत म्हणाला.
" ह्या मुंबईत कोणाचा भरोसा नाही . एका चित्रपटात तर देवावर केस केली होती " उंदीर उत्तरला .
"असो पण या वसुदेवाचे काही खरे दिसत नाही .मी त्याची प्रेशरची गोळी दिलीय पण परिस्थिती बिकट होणार आहे " तो चिंतीत स्वरात म्हणाला .
संध्याकाळी घरी येताच वासुदेवची अवस्था पाहून अनिल हादरला. तो डॉक्टरला घरी घेऊन आला . हॉस्पिटलमध्ये ह्या दिवसात ठेवायचे म्हटले की घरात बाप्पा त्याला कोण बघेल . डबल त्रास .मग डॉक्टरांनी त्यांना संपूर्ण बेडरेस्ट करायला सांगितले.तसेही आता काही दिवस वासुदेव अथरुणांतून उठू शकत नव्हताच .
आता सकाळीच अनिल त्यांना अंघोळ घालून बाहेर बसवायचा .अनिता बाप्पाचे बघायची .दोघांनाही सुट्टी मिळत नव्हती पण उशिरा यायची परवानगी दिली होती.
सर्व आवरले की वासुदेव अनिलला" तुम्ही जा तो आहे "असे त्याच्याकडे हात करून खुणवायचे तेव्हा उंदीर खुदुखुदु हसायचा. अशाक्तपणामुळे वसुदेवला बोलताही येत नव्हते.
अनिल आणि अनिता घराबाहेर पडले की हा खाली उतरायचा. वासुदेवच्या हातापायाला मालिश करायचा .त्यांची औषधे द्यायचा.जेवण भरवायचा . कधीकधी उंदीर तो आणि  वासुदेव ल्युडो खेळायचे . त्याला पाहून वासुदेवच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते . 
आज त्याचा शेवटचा दिवस होता . आरती झाली आणि अनिलने त्याला डोक्यावर घेतले .निघताना त्याने मान वळवून वासुदेवकडे प्रेमळ नजरेने पाहिले .वासुदेवच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते.
अनिलच्या डोक्यावर बसून तो उदासपणे समुद्रकाठी आला.
"त्याला खरे रूप दाखवायची गरज होती का ? आता उद्या बरा झाल्यावर आपल्या नावाची बोंबाबोंब करेल " उंदीर शेपटी  फिरवत म्हणाला .
" हल्ली अश्या गोष्टींवर कोण विश्वास ठेवतो का ? त्याच्या डोक्यावर काही काळ परिणाम झालाय असेच डॉक्टरही म्हणतील .या जगात खरे देव आहेत यावर कोणाचाच विश्वास नाही आहे फक्त श्रद्धा " तो हसत म्हणाला .
बाप्पाला सोडून घरात शिरताच अनिलला वासुदेव शांतपणे झोपलेला दिसला ते कधीही न उठण्यासाठीच. 
© श्री.किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment