Sunday, September 1, 2024

प्रवास

प्रवास
एक जानेवारीला नवीन कॅलेंडर घरात लागले की अण्णा कोळमकर गणेश चतुर्थीवर खूण करून ठेवायचे. काहीही झाले तरी कोकणातील घरी गणपतीला जायचे हे ठरलेलेच होते. 
वयाच्या पंधराव्या वर्षी दहावी पास होऊन कोकणातील छोट्या गावातून मुंबईत शिक्षणासाठी आले . तेव्हापासून दरवर्षी फक्त गणपतीला गावी जायचे असा नियमच स्वतः ला घालून दिला होता. गावातील घरी गणेश उत्सव जोरात साजरा व्हायचा .अजूनही होतो म्हणा.
 पुढे शिक्षण पूर्ण होऊन सरकारी नोकरीत लागले. हळूहळू बढती मिळत गेली .घरात आर्थिक सुबत्ता आली .मुलेही चांगल्या शाळेत शिकली आणि घरी चार चाकी आणण्याचे स्वप्न ही पूर्ण झाले .
पण गेली काही वर्षे अण्णा गणपती मुंबईतून गावी नेऊ लागले होते.त्यावेळी गावी जाण्यासाठी फक्त लाल डब्बा म्हणजे एसटीच  उपलब्ध होती .
 अण्णांना सरकारी नोकरी लागली त्यावर्षी पासून त्यांनी मुंबईतूनच गणपतीची मूर्ती गावी नेण्यास सुरवात केली.पहिली काही वर्षे अनेकांनी कपाळावर आठ्या आणत विरोध केला.
" गावात काय चांगल्या मूर्ती बनवत नाही का ? आमच्या पवारांच्या तीन पिढ्या गणपती बनवतात आणि स्वतात विकतात ." बापू पवार  पारावर बसून चिडून  सर्वाना सांगत होते.
" चाकरमान्यांक सवयच लागली हा, साबणापासून तेलापर्यंत सर्व मुंबईसून आणूचा "म्हातारी जनाकाकू तंबाखूच्या मशेरीने दात घासत म्हणाली.
पण अण्णा कोणाचेच ऐकत नव्हते. इथल्या मूर्तिकाराला पाहिजे तशी मूर्ती बनवायची ऑर्डर द्यायची मग दोन दिवस आधी मूर्ती उचलायची आणि लाल डब्यात बुकिंग करून प्रवासाला सुरवात करायची.
पहिल्यांदा गणपती मूर्ती उघडीच असायची .अण्णांच्या शेजारच्या सीटवर बसायची.पाऊस लागू नये म्हणून अंगभर प्लास्टिक पेपर असायचा. हळूहळू कोकणात जाणाऱ्यांची गर्दी वाढू लागली तशी मूर्ती अण्णांच्या मांडीवर आली. थोडा त्रास व्हायचा पण प्रवास मजेशीर असायचा .एसटीतील सर्व प्रवासी भजन गात आरत्या म्हणत प्रवास करायचे .मुले अण्णांचा त्रास पाहून त्यांना समजवायचे पण अण्णा निश्चयापासून ढळले नाहीत.
मग रेल्वे सुरू झाली . तेव्हा प्रवास थोडा सुखकर झाला .अण्णा रात्रभर रांगेत राहून रेल्वेची तिकीट काढायचे .पाहिले काही वर्षे जनरल मग नंतर एसी .अण्णांना गणपती सोबत पाहून काही प्रवासी चेष्टेने म्हणायचे बाप्पा भाग्यवान आहे .एसीने प्रवास करतोय. पण यावेळी मूर्ती एका बॉक्समध्ये बंद झाली होती.आता ती अण्णांच्या बाजूला किंवा मांडीवर ही बसत नव्हती तर दोन सीटच्या मध्ये पायाखाली ठेवली जात होती.
आता अण्णांची मुले मोठी झाली होती.लग्न होऊन संसार ही सुरू झाला होता तर अण्णा पुढील वर्ष दोन वर्षात निवृत्त होणार होते.
मुलाने नवीन गाडी घेतली होती.गाडी मोठी होती .पूर्ण फॅमिलीचा विचार करून घेतली होती.दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणपतीवरून वाद झालाच .पण अण्णा बधले नाहीत.
गावी जाण्याआधी मूर्ती घरात आली .अण्णांनी मूर्ती पॅक करायला सुरुवात केली.पाहिले प्लास्टिक पेपर .मग थर्माकोलचे पॅकिंग नंतर सर्वबाजूनी चिकट टेप त्यावर कापडाची रिकामी घोण .मग एक छान लाकडी बॉक्स तयार करून मूर्ती त्यात फिट बसवली गेली. मुलाने फॅमिलीत गणपती आहे हे पूर्वीच मान्य केले होते त्यामुळे त्याच्यासाठी जागा होतीच.
दुसऱ्या दिवशी सकाळीच कोळमकर  फॅमिली  मूर्तीला घेऊन घराबाहेर पडली. पनवेलपर्यंत प्रवास सुखाचा होता.रस्त्यावर आणि समुद्रावर बांधलेल्या ब्रिजमुळे पनवेल लवकर आले पण जसा मुंबई गोवा महामार्ग सुरू झाला तशी गाडीत बसलेल्या सर्वांची हालत बेकार झाली.रस्तोरस्ती खड्डे ,ठिकठिकाणी ट्राफिक जाम . गाडी सोडून कुठे जाता येत नाही .पण इतके असूनही अण्णा शांतच होते .
पण बॉक्समध्ये बसलेला तो आता थोडा चिडला होता. चारीबाजूने बांधलेले असल्यामुळे त्याला हालचाल ही करता येत नव्हती .माझी ही अवस्था तर माझ्या मूषकाची काय हालत झाली असेल असा विचार करत त्याने बाजूला पाहिले तर तो उंदीर रागारागाने ती चिकटपट्टी कुरतडत होता.
" काय गरज आहे अण्णांना दरवर्षी मुंबईतून आपल्याला घेऊन गावी जायची ? तू काही करत का नाहीस ? पूर्वी ठीक होते पण आता तर आपल्याला बांधून घेऊन जातात.त्या पवारांकडून का आणत नाहीत आपल्याला.हल्ली पवार किती मॉर्डन मूर्त्या बनवितात.मागच्या वर्षी मला रॉबट बनविला होता आणि तुला कमांडो . तू एकदा खडसावून विचार त्यांना. या टेपमुळे अंगाला खाज सुटलीय ." त्यांने हसून मान डोलावली आणि डोळे मिटून झोपेची आराधना करू लागला.
घरी पोचल्यावर अण्णांनी बॉक्स खोलला. मूर्तीच्या हातावरचा आणि सोंडेवरचा रंग उतरला होता.काही ठिकाणी थोडी खपली निघाली होती . अण्णांनी ती नवीन रंगकाम करून बुजवून टाकली आणि मखराच्या तयारीला लागले.
रात्री सर्व झोपले असताना तो अण्णांच्या जवळ गेला. "अण्णा,  तुमची मनस्थिती मी समजू शकतो .कोकणात रोजगार नाही .पुरेशी प्रगती नाही ,भौगोलिक स्थिती नाही म्हणून बहुतेक तरुणवर्ग मुंबईत जातो. त्यांचा प्रवास नेहमीच कष्टाचा राहिला आहे.आहो त्यांना  गावाला येण्याजाण्यासाठी चांगले रस्तेही  नाहीत ना सोईसुविधा . तरीही दरवर्षी प्रत्येक कोकणी माणूस आपल्या कुटुंबाला घेऊन त्या प्रवासाचा त्रास सहन करत माझ्यासाठी इथे येतो. आज कित्येक  वर्षे कुटुंबासोबत मलाही तुम्ही इथे घेऊन येतात ते आम्ही तुझ्यासाठी किती कष्टाचा आणि त्रासाचा प्रवास करतो हे मला दाखविण्यासाठीच .आज कोकणात येणारे प्रवासी वाढले ,लोकांकडे वाहने आली पण रस्तेमात्र तेच आहेत उलट पूर्वीपेक्षा जास्तच खराब झालेत आणि या गोष्टीला मीच साक्षीदार आहे. अण्णा ,कोकणचा महामार्ग तयार होईल हे निश्चितच, पण त्यासाठी किती वेळ लागेल हे मीही सांगू शकणार नाही.जशी कोकणात तुम्ही संघर्ष करून रेल्वे आणलीत तसाच संघर्ष तुम्हाला रस्त्यासाठी करावा लागेल . पण जोपर्यंत तुम्ही मला मुंबईतून इथे आणाल तोपर्यंत मी कधीच कोणतीही तक्रार न करता तुमच्या सोबत येईन .तुम्हाला होणाऱ्या त्रासाबद्दल तुमची दरवर्षी माफी मागतोय मी आताही मागतोय." असे बोलून त्याने हात जोडले.
अण्णा दचकून जागे झाले तेव्हा तो कोपऱ्यात शांतपणे बसला होता. सोंडेवर आणि हातावर लावलेला नवीन रंग बाहेरच्या प्रकाशात चमकत होता.
" तू खडसावले ना त्यांना " झोपमोड झालेला उंदीर जांभई देत म्हणाला.
" कोकणातील रस्ते जोपर्यंत चांगले होत नाही आणि चाकरमान्यांचा प्रवास आरामदायी सुखकर होत नाही तोपर्यंत अण्णांसोबत असेच यावे लागणार आपल्याला " कोपरावर नवीनच लावलेल्या मातीकडे पाहत तो उदासपणे उद्गारला.
" मग कर की रस्ते चांगले .तुला काय अश्यक्य आहे " उंदीर आवेशात म्हणाला.
" मित्रा मी देव आहे .जादूगार नाही.मी काही गोष्टी अरेंज करू शकतो पण त्या पूर्ण करणे माझ्या हातात नाही. गेली सतरा वर्षे हा महामार्ग बनतोय पण कधी पूर्ण होईल ते कोणताच देव सांगू शकत नाही.चल आराम कर कारण अण्णा विसर्जनापर्यंत आपल्याला झोपू देणार नाही" डोळे मिटत तो म्हणाला.
© श्री.किरण कृष्णा बोरकर 

No comments:

Post a Comment