Monday, February 20, 2017

जंगलाचा कायदा

"पोटासाठी खूप कष्ट करावे लागतात हेच खरे" ,स्वतःशी पुटपुटतच  शेरखान गुहेत शिरला. पण जाता जाता बायकोची शेपटी ओढायला विसरला नाही . नेहमीप्रमाणे लटकी डरकाळी फोडत तिने विरोध दर्शविला . तोच गुहेच्या दारात चतुरसिंग कोल्हा उभा राहिला .
काय रे चतुर ?? आज अचानक ?? शेरखान ने विचारले .
"हो ,काय मिळाली का शिकार" ??
"अरे काय ?? हल्ली कुठे राहिलेत प्राणी जंगलात ??आपल्यालाच फिरायचे वांधे त्यांची तर सोयच नाही .
" महाराज ,मी काय म्हणतो .तुम्ही शिकारीचे काम बाहेर का देत नाही.
"म्हणजे माझी शिकार ,माझे खाणे मी नाही शोधायचे का ??
"तसे नाही पण तुम्हाला आणि तुमच्या फॅमिली ला इथे बसून जेवायला मिळाले तर काय हरकत आहे ??
" हा !हा! हा!, असे कोण देईल? रोज एक शिकार आणून कोण देईल ??
" देतील कि महाराज ,आज कुत्रे ,तरस, लांडगे यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतले आहे.ते करतील ना . आहो कॉर्पोरेट चा जमाना आहे .दुसर्यांकडून कामे करून घ्यायची . त्यांना महिन्याला बक्षीस देऊ .
" अरे पण जंगलाचे काही कायदे असतात.
"  कायदे सगळीकडेच असतात ,पण कोण विचारतोय .
" असे म्हणतोस ,"!!! शेरखानने थोडा वेळ आपल्या मिशा खाजवल्या .
"ठीक आहे ,देऊया कॉन्ट्रॅक्ट."
दुसऱ्या दिवशी तरसांच्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळाले आणि  काम सुरु झाले . शेरखान आता गुहेतून बाहेर पडेनासा झाला . त्याचा दिवस राणीच्या संगतीत जाऊ लागला . बाहेर काय चालू आहे याची त्याला माहितीहि नव्हती . आणि एक दिवस त्याच्या जेवणात ससा आला .
"हे काय?? इवल्याश्या सश्याने आमचे काय होणार" ?? चिडुन त्याने चतुरसिंग ला बोलावले .चतुरसिंगने तरसाला .तर तरसाने कुत्र्याला बोलावले.
" हा कोण "?? शेरखान ओरडला .
"माफ करा महाराज ,तुमच्या शिकारीसाठी आम्ही याची नेमणूक केलीय "तरस उत्तराला .
"काय करू महाराज ,जंगलात प्राणीच उरले नाहीत.आहेत त्यांना खायला मिळत नाहीत. तळ्यात पाणीच नाही तर तिथे कोण येणार'?? 
"म्हणून काय ससा "?? 
" जे मिळेल ते आणतो महाराज. आजचा दिवस भागवा उद्या बघू .
चिडून शेरखानने पंजा जमिनीवर आपटला आणि सशाकडे वळला . दुसऱ्या दिवशी आणलेल्या शिकारीला सडक्या मांसाचा गंध येताच शेरखान परत चिडला .पण काल रात्री शिकार केली म्हणून असेल असे सांगण्यात आले . परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली होती .शेरखांनची बाहेर फिरायची सवय पार मोडून गेली होती.
एके दिवशी कहर झाला .त्याचे दोन्ही बछडे पळत पळत गुहेत शिरले .भीतीने त्यांच्या  चेहऱ्यावरचा रंग उडाला होता . संतापून त्याने विचारले "काय झाले ??
"एक जंगली कुत्रा आमच्या मागे लागला होता .त्यांनी उत्तर दिले .
" काय माझे  बछडे कुत्रांना घाबरू लागली ".चिडून त्याने राणीवर हल्ला केला .
राणीने शांतपणे विचारले "तुम्ही त्यांना शिकार कशी करायची ते शिकवले का ?? लढाईचा ,हल्ल्याचा सराव कधी करून घेतला आहे का ?? त्यांना लढणेच माहित नही तर ते काय प्रतिकार करणार ??
शेरखानने मान खाली घातली आणि निमूटपणे गुहेबाहेर पडला . जंगलातुन फिरता फिरता त्याला आश्चर्याचे धक्के बसू लागले . अर्धे अधिक जंगल उघडे बोडके झाले होते . झाडांची कत्तल चालू होती .माणसे बिनधास्तपणे नाचत गात फिरत होती . कोणीही मजेत झाडावर बसलेल्या पक्षांना दगड मारून जखमी करीत होता .तर काही जण मज्जा म्हणून माकडांच्या मागे लागले होते . ते पाहून शेरखानचीहि पुढे जाण्याची हिम्मत झाली नाही .परत फिरताना त्याला अंकल दिसला ,आपल्या अजस्त्र सोंडेत  पाणी भरत छानपैकी तलावात डुंबत होता .पण हे काय !!!त्याचा एक सुळा कुठे गेला ???
इतक्यात अंकलने त्याच्याकडे पाहून सोंड हलवली आणि पाण्याबाहेर आला "काय शेरू आहेस कुठे ?बऱ्याच वर्षांनी भेटतोय्??
"हो ,मान खाली घालत शेरखान उत्तरला .अंकलच त्याला शेरू बोलू शकत होता .
"अंकल काय झाले हे ?? काय हालत झालीय माझ्या जंगलाची ?आणि तुझा एक सुळा कुठे गेला ??
"कुठे काय ?? काय झाले ?? सगळे ठीक चालले आहे ,तुला रोजच्या रोज जेवण मिळते ना ?" अंकल उपहासाने म्हणाला .
शेरखान लाजला .त्याच्या डोळ्यात पाणी आले .
"अंकल ..!!"जोरात डरकाळी फोडून तो म्हणाला  "अजून या जंगलाचा राजा आहे मी हे विसरू नकोस ".
" आम्ही नाही विसरलो .तूच विसरलास राजा आहेस ना ? मग या जंगलाचे रक्षण कोण करेल ? तू फिरत  नाहीस हे पाहून माणसांची तुझ्याबद्दलची भीती नष्ट झालीय . तो इथे येतो बेसुमार झाडे तोडतो ,छोट्या छोट्या प्राण्यांची हत्या करतोय ,जंगलाचा राजा या नात्याने तू त्यांचे  माणसापासून रक्षण करायला पाहिजे . आम्ही सारे प्राणी तुझी प्रजा आहोत . त्या दिवशी चार माणसांनी माझ्यावर हल्ला केला .मी प्रतिकार केला म्हणून जीवावरचे सुळावर निभावले. पण आज तुझ्या बछड्याना प्रतिकारहि करता येत नाही आणि शिकारही..आम्ही  भूक लागल्यावरच खातो ,तुम्ही प्राण्याची शिकारही  भूक लागेल तेव्हाच करता. पण हि माणसे मात्र मौजेखातीर  शिकार करतात .स्वतःच्या फायद्यासाठी जंगले साफ करतात . अरे त्यामुळे तुझेही अस्तित्व नष्ट होत चालले आहे ,हे कळते का तुला ??
शेरखान खाली मान घालून चुपचाप ऐकत होता .त्याला स्वतःची लाज वाटू लागली . स्वतःच्या फायद्यासाठी  तो जंगलाचा कायदा विसरून गेला होता .

No comments:

Post a Comment