Saturday, February 4, 2017

उशीर

"शी!! बाबा ,आज परत उशीर होणार?" हातातला ब्रेडचा तुकडा तोंडात टाकत घाईघाईने चपला पायात अडकवून ती बाहेर पडली .पण जाता जाता आपल्या सोनुलीकडे  नजर टाकायला विसरली नाही ती. रोजचेच झाले होते तिचे ते, बिल्डिंगच्या गेट वर आली आणि वॉचमनची नजर बघून शहारली . आता सुरु होणार होते तिचे नेहमीचे रुटीन. त्याच त्याच ओंगळवण्या नजरा ,अंगावर येणारे धक्के . इतकी वर्ष आपण हे सहन करतोय तरी याची आपल्याला सवय का नाही झाली अजून??तिने स्वतःलाच प्रश्न विचारला .अर्थात उत्तर मिळणारच नव्हतेच .
ती तशीच पुढे निघाली तर मोटारसायकलवाला समोर आला आणि लोचटपणे हसून पुटपुटला" येणार का ?? सोडतो तुम्हाला ". ती लक्ष न देताच पुढे सरकली . उत्तम शरीराची देणगी आणि सुरेख चेहरा असणे हा तिला शाप वाटू लागला होता .मनातले विचार सोडून ती ट्रेनमध्ये चढली ,धक्के खात कशीबशी स्वतःसाठी जागा करून उभी राहिली . स्वतःच्या विचारात गुंग असताना हळूच तिच्या हाताला शेजारणीचा स्पर्श होऊ लागला ,गर्दीमुळे होत असेल म्हणून तिने लक्ष दिले नाही पण तो हात आता जास्तच धीट झाला . तिने चमकून बाजूला पहिले तर ती तरुणी तिच्याकडे पाहून हसली ,त्या हस्यातच वेगळेपणा होता ,एक आवाहन होते . अरे देवा आता हि पण ??,किळस वाटून ती दूर झाली तर दुसरीने वाट पाहत असल्यासारखी तिची जागा घेतली . स्टेशन आल्यावर मात्र ती धावत सुटली ,आज तरी लेटमार्क नको म्हणत आत शिरली .समोरच रिसेप्शनला बसलेल्या बाहुलीने कळेल न कळेल असे नाक मुरडले . कसे जमते हिला चेहऱ्यावरची एकही रेषा न हलवता फक्त नाक मुरडणे . सर्व विसरून ती हसली आणि ऑफिसमध्ये शिरली .
हुश्श हुश्श करीत ती आपल्या जागेवर बसली .दोन मिनिटांनी तिचा लेटमार्क वाचला  होता .स्वतःची पाठ थोटपुन घेत तिने पाण्याचे दोन घोट घेतले आणि समोर पहिले तर शिपाई चहाचा कप घेऊन समोर होता. पण त्याची नजर मात्र बरेच काही सांगून जात होती ,सवयीनुसार तिने पदर चपापला आणि चहा पिण्यास सुरवात केली .
सगळेच पुरुष सारखेच का ??? थोड्या वेळाने घरी फोन करून खुशाली विचारून घेतली आणि बॉस ला भेटायला निघालि. दारावर टकटक करून आत शिरली आणि बॉसच्या थंड नजरेला नजर न देता उभी राहिली . त्याची नजर आपल्यातून आरपार होतेय याची जाणीव तिला होत होती . का सहन करतोय आपण ?? कशासाठी ?? परत प्रश्न ,कामाचा रिपोर्ट करून ती बाहेर पडली .लंचला सगळ्याजणी एकत्र आल्या मग झाला सगळा चिवचिवाट सुरु .त्या गोंधळात सर्व ती विसरून  गेली आणि जेवणाचा आनंद घेऊ लागली.,बघता बघता ऑफिस संपले आणि परत निघाली ती .परत तेच धक्के ,परत ती ट्रेन ,तेच चोरटे स्पर्श .पण घरी जाण्याच्या ओढीने सर्व सहन करीत होती ती .  "ए ती बघ आली, गल्लीच्या तोंडावर उभे राहिलेल्या त्या कोवळ्या मुलांचे कंमेंट्स ऐकून तिला न कळलंत हसू आले . खरेच आपण इतकी वर्ष हे सहन करतोय पण याच्यापुढे कधी गोष्टी गेल्याच नाहीत . कोणाच्यात हिम्मत हि नाही पुढे येण्याची  ,नुसती मेलेल्या शरीरावर चोच मारून लचके तोडणारी गिधाडे आहेत हि . जिवंत माणसांवर हल्ला करण्याची यांच्यात धमक नाहीच . सर्व आठवून तिचा हुरूप परत आला ,दरवाजा उघडून आता शिरली आणि" आई आली ,आई आली "असे ओरडत धावत येणाऱ्या सोनुलीला मिठीत घेऊन सर्व थकवा जाणीवा विसरून गेली .

No comments:

Post a Comment