Tuesday, February 14, 2017

परमिशन

5 चे ठोके झाले तसे आम्ही आवरले आणि निघायच्या तयारीला लागलो .इतक्यात शेट्टी म्हणाला "चला बसूया !!,सगळे पटकन तयार झाले जणू काही आमंत्रणाचीच वाट बघत होते . तोच पारकर आत शिरले. त्यांनाही सांगितल्याबरोबर होकार दिला आणि फोनकडे वळले . शांतपणे फोनवरून बायकोला सांगितले "आज उशीर होईल.  कंपनीतल्या मित्रांबरोबर बाहेर बसतोय .मध्येच माझ्याकडे बघून खूण करून विचारले "जेवणाचे काय ?? मी खुणेनेच सांगितले घरी . तसे परत फोन कडे वळून बोलले" घरी येतोय जेवायला ,ठेव थोडे" . मग फोन ठेवून आमच्याकडे पाहून स्वच्छ हसले .
आमच्या रघुनाथला थोडी थट्टा करायची लहर आली .मोठ्याने म्हणाला "काय पारकर ,लग्नाला 25 वर्ष होऊन गेली तरी अजून घरची परमिशन घ्यावीच लागते का "??  झाले मी समजून गेलो आज पारकर टार्गेट होणार . तितक्यात पावसकर ओरडला ",हो !अजून विश्वासच नाही वहिनीचा नवर्यावर ,आम्ही बघा कधीही सांगत नाही ,काय करतो ,कुठे जातो ,उगाच कशाला मागे भुणभुण तिची. आणि तुम्ही तर रोजच्या 2 गाड्या चुकल्या तरी फोन लावून कळवता आज उशिर होईल म्हणून?? 
पारकर हसत शांतपणे ऐकत होते . रागावल्याचे चिडल्याचे चिन्हही त्यांच्या तोंडावर दिसत नव्हते .त्यांचा स्वभावच होता तसा . सर्वांचे झाल्यावर ते हळूच म्हणाले ",झाले तुमचे ?? आता माझे एका.हो मी प्रत्येक गोष्ट माझ्या घरी कळवतो. त्यांना सांगून सगळीकडे जातो पण लक्षात ठेवा मी त्यांची परमिशन घेत नाही तर त्यांना माझा ठावठिकाणा कळवतो . माझे माझ्या कुटुंबावर आणि कुटुंबाचे माझ्यावर प्रेम आहे . घरातील कर्ता पुरुष असलो तरी माझ्या मनाप्रमाणे वागावे असे काही नाही . साधा नोकरी करणारा माणूस आहे मी .त्यावरच माझे भागते .  ह्या धकाधकीच्या जीवनात ,ट्रेनमधून धक्के खात कामावर येतो तेव्हा घरचे मी ऑफिस ला पोचलो कि नाही या चिंतेत असतात ,माझे काम काही फार जबाबदारीचे नाही त्यामुळे मला उशीर कधी होत नाही ,वेळेवर घरी जातो मग एखादा दिवस उशीर झाला कि घरचे काळजीत पडणारच ना ?? आणि हे पहा मला कोणतेही काम करायला बंदी नाही .ना कोणी रागावत माझ्यावर .उलट मी कुठे आहे .कोणाबरोबर आहे ,हे कळल्यावर त्यांची चिंताच दूर होते . तुम्हाला त्या wednsday चित्रपटातील comman man नसिरुद्दीन शहा आवडतो ,पटतो ,त्याचा तो संवाद आज शाम को घर लौटेंगे कि नही  इसकी चिंता बीवी को होती है हे आवडते मग प्रत्यक्षातील सामान्य माणूस का आवडत नाही.
मी हसलो कारण पारकर काय चीज आहे हे मलाच माहित होते . त्याने जे काही तरुणपणी केले होते याची कल्पनाच बाकीचे लोक करू शकत नाहीत . पारकर पुढे म्हणाला ",तुम्ही घरी न सांगता कुठे कुठे जाता ,घरच्यांची पर्वा करीत नाहीत ,पण त्यांना तुमची पर्वा असते .आज मी तुमच्याबरोबर बसेन आणि तुमच्यापेक्षा जास्त आनंद मी घेईन कारण माझ्या घरी या बद्दल सगळी माहिती आहे . पण तुमचे काय ?????? ते ऐकून मी मुकाट्याने उठलो आणि कोपऱ्यात जाऊन घरी फोन लावला .

No comments:

Post a Comment