Tuesday, February 21, 2017

निवडणूक

घरात कांदेपोह्याचा नुसता घमघमाट सुटला होता .मोठ्या मिनतवारीने सौ.चे कौतुक करीत तिला कांदेपोहे बनवायला लावले होते .आता मस्तपैकी 3/4 डिश हादडायच्या ,पेलाभर चहा प्यायचा आणि वाचन करत बसायचे  असा साधा प्रोग्रॅम ठरविला होता  . कोणी अचानक टपकु नये म्हणून दरवाजाला  कडी लावून बेलही बंद करून टाकली होती .
पण अचानक दरवाजावर जोरजोरात थापा पडल्या आणि माझ्या काळजाचा ठोकाच चुकला .दाराबाहेर विक्रमच असणार हे पक्के समजून गेलो  .आता दरवाजा उघडण्यावाचून पर्याय नव्हता . मुकाटपणे दार उघडले तर हा मला लोटून आत शिरला .
"काय चाललंय तुझे दिवसा ढवळ्या ?? तो खेकसला
"अरे काही नाही ,सहजच " मी हताशपणे उद्गारलो .
"मग कडी लावून आणि दरवाजा बंद करून काय चालले आहे" ?? डोळे वटरत त्याने विचारले आणि अचानक जोरजोरात श्वास घेऊ लागला . "वहिनी !!!असे किंचाळतच तो स्वयंपाकघरात शिरला आणि पोह्याची भरलेली बशी घेऊन विजयी मुद्रेने बाहेर आला . तोंडात बकाणा भरत बोलला "चल बसूया, आणि आणलेल्या पिशवीकडे बोट दाखविले . "विक्या ,तू आणलिस"?? मी अविश्वासाने ओरडलो. "ह्या !!,त्या उमेदवाराने दिली . निवडणुकीला उभा राहिला आहे ना "?? त्याच्या प्रचाराला गेलो ,थोडा वेळ फिरलो ,घोषणा दिल्या ,वेळ संपली तसे त्याने प्रत्येकाला पैसे दिले आणि हि बाटली" .
"च्यायला विक्या, म्हणजे तुही राजकारण्यांच्या मागे तर ??  म्हणजे तो कसाही असला तरी बाटली आणि पैसे दिले म्हणून वोट त्यालाच"?? "
.हाड!!... बाटली आणि पैसे देणाऱ्या उमेदवाराची लायकी कळते आपल्याला भाऊ . पण तूच म्हणतोस ना जगात काहीही कष्ट केल्याशिवाय मिळत नाही ते पटले आपल्याला . साल, हे कमवायलाही 3/4 तास  लागले ." ह्यांच्याकडे कुठून येतात रे पैसे इतके ,च्यायला !!..आपण दोघे कधीतरी बसतो आणि बिलही  भागीत देतो .अरे हा आपलाच पैसा आहे ,तोच घेतला थोडा .उद्या दुसरा उमेदवार आहे ,त्याच्याकडून काहीतरी वसूल करू ,थोडक्यात काय हि निवडणूक संपेपर्यंत आपली चंगळ आहे.
"पण हे चुकीचे नाही वाटत तुला ??"मी म्हणालो.
",वाटते ना ?? पंण काय करणार ,मी नाही गेलो तर दुसरा कोणी आहेच ,अरे त्या निमित्ताने का होईना 4 पोरांना पैसे मिळतात ,आणि शेवटी मत कोणाला द्यायांचे हे आपल्याच हातात असते ना ,आणि कोणता उमेदवार चांगला कोणता वाईट हेही आपल्यालाच कळायला हवे .ज्या दिवशी हे मतदारांना कळेल त्या दिवशी आपली  लोकशाही खऱ्या अर्थाने लोकशाही बनेल ,.."तो पर्यंत आपण असेच राहू ,"हातातली बाटली उंचावून तो म्हणाला आणि मुकाट्याने मी कपडे बदलायला बेडरूममध्ये शिरलो .

No comments:

Post a Comment