Sunday, February 26, 2017

तात्या

त्याला पाहून हातातील चहा फेकून देऊन पळायचा प्रयत्न मी केला .पण शेवटी त्याने पकडलेच . समोरच येऊन बसला
"काल रात्री मी खूप विचार केला. या समाजात बदल घडविण्यासाठी आपण खूप काही करू शकतो " . माझ्या मांडीवर थाप मारून म्हणाला तसा  मी उडालोच . खरेच यांच्यासारखी माणसे विचार करू लागली म्हणजे नक्कीच समाजाचे नको तितके कल्याण होईल . नाइलाजाने त्याच्यासाठी चहा मागवत बोललो ",बोला साहेब ,काय म्हणणे आहे तुमचे "?
" भाऊ ,अरे पहिली गोष्ट म्हणजे सर्वांनी आपले जुने विचार बदलले पाहिजे .मुलगा मुलगी यांचा भेदभाव नष्ट केला पाहिजे . मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे घडविले पाहिजे . आपली मते त्यांच्यावर लादता कामा नयेत .
" अरे वा ,छान!! मी  म्हणालो", अजून !!??
"अजून काय ?? आपण आता सरकारच्या धोरणांना पाठिंबा द्यायला पाहिजे . शिक्षणावर भर दिला पाहिजे .सरकारी योजना अंमलात आणायला पाहिजे
". वा!! तात्या वहिनी अजून आल्या नाहीत वाटते गावावरून तरीच हे विचार सुचतयात "
"यात वहिनीचा काय संबंध आणि रात्रभर जागून इतरांबरोबर मज्जा मारण्यापेक्षा घरी बसून विचार केलेला नेहमी चांगला नाही का ?? माझ्याकडे रोखून बघत तो बोलला.
च्यायला ह्याला कळले कि काय ?रात्री मी आणि विक्रम बसलो होते ते !!तरीच हे टोमणे .
"हे बघ तात्या ,मला माहित नाही तुला काय करायचे आहे ते ,पण इतके माहित आहे पहिल्या दोन मुली झाल्या तरी तुला  मुलगा पाहिजे होता म्हणून तू तिसऱ्या साठी प्रयत्न केले ,अर्थात तुझी  3 काय तर 10 हि मुले सांभाळायची कपॅसिटी आहे .आणि आता त्या मुलाचे किती लाड चालू आहेत  हे सोसायटी बघतेय . आणि तुझी मोठी मुलगी डान्स किती छान करते तरी तिला ते करू दिले नाहीस जबरदस्तीने इंजिनीरिंग ला टाकलेस . मुलीला कधी सायकल चालवू दिली नाहीस पण मुलासाठी मोटारसायकल घेणार आहेस .
"पुरे पुरे ,माझ्या चूका काढू नकोस ? तू काय करतोस रे समाजासाठी .तात्या भडकून बोलला
"मी काहीच करीत नाही समाजासाठी तात्या. वेळ आणि इंधन वाचवण्यासाठी सरकारी वाहनातून प्रवास करतो . पाण्याची बाटली घेतली तर पूर्ण पाणी पियाल्याशिवाय फेकून देत नाही . कुठेही जेवायला गेलो तरी अन्न ताटात टाकून देत नाही . घरीही गरज असेल तेव्हाच पंखा आणि लाईट वापरतो . जमेल तेव्हढा व्यवहार कॅशलेस करतो ,ऑनलाइन पद्धतीचा वापर करतो ,कागद वाचवितो . मी शांतपणे उत्तर दिले
"आणि ह्याचे काय ?" तात्यांने अंगठा वर करून थम्स अप ची खूण केली.
"त्याने काय होते तात्या "?? मी काही मर्यादा पुरुषोत्तम राम नाही . सद्गुणांचा पुतळा असलेला .काहीतरी खोट प्रत्येकात असते . तू आहेस का सभ्य ?? तरुणपणी काय काय उद्योग केलेस ते माहित नाही का मला ??मी छद्मीपणे हसत बोललो .
"ठीक आहे ,ठीक आहे , तुझ्याइतका विचार नाही करता येत नाही .असे बोलून तात्या रागाने उठला .
"अरे थांब ",मी थांबविले तात्याला
"हे बघ ,त्या भाजीवल्याची मुलगी बघ किती छान चित्र काढते . तिला चित्रकलेचे सामान आणायला पैसे नसतात .तू मदत करू शकतोस का ?? तात्या थबकला त्याने माझ्याकडे पहिले "हो करेन ना ..हेघे 500 रु आणि आणून दे तिला ".
"नको तू आणून दे तुझ्या हाताने " मी असे म्हणताच तात्या निघून गेला
दुसऱ्या दिवशी कामाच्या घाईत मी सर्व विसरून गेलो रात्री सहज जेवल्यावर फेरी मारायला  बाहेर पडणार इतक्यात तात्या  दरात हजर "थँक्स भाऊ , माझा हात हातात घेत म्हणाला "काल सकाळी मी त्या मुलीला चित्रकलेचे समान नेऊन दिले आणि तिच्या डोळ्यातील ते भाव पाहून मी भारावून गेलो . आयुष्यात पहिल्यांदाच मी दुसऱ्यांच्या डोळ्यात माझ्याविषयी आदराच्या भावना पाहिल्यात . अरे त्या मुलीला इतका आनंद झाला हे पाहून मन भरून आले ". बोलता बोलता तात्यांचे डोळे पाणावले. पण अश्रू दाखवून कमीपणा वाटू नये म्हणून झटकन निघून गेला .

No comments:

Post a Comment