Thursday, February 23, 2017

नाईट शिफ्ट

रविवारची नाईट शिफ्ट म्हणजे अनिल चौगुलेसाठी एक पर्वणीच असायची . दिवसभर मज्जा करायची ,रात्री पोटाला तड बसेपर्यंत जेवायचे आणि आरामात ट्रेन पकडून फॅक्टरीत जायचे .
रविवार संपूर्ण फॅक्टरी बंद असल्यामुळे तो आणि त्याचे दोन वर्कर ,दोन सिक्युरिटी गार्ड ,इतकेच असायचे . त्यामुळे एक राऊंड मारला कि झोपायला मोकळा .
तो रविवारहि असाच होता . कार्ड पंच करीत अनिलने सिक्युरिटीकडे पाहून हात हलवला आणि डिपार्टमेंटमध्ये आला . त्याच्या टेबलवरून समोर नजर टाकताच संपूर्ण फ्लोअर दिसत होते . इतर दिवशी चोवीस तास त्या फ्लोअरवर गडबड असायची .खडखड आवाज करीत चालणाऱ्या मशीन्स ,एकमेकांना शिव्या देत बोलणारे ऑपरेटर ,मध्येच वाजणार सायरन ,नुसता गोंधळ असायचा .पण रविवारी मात्र हा फ्लोअर अतिशय शांत असायचा . फ्लोअरच काय तर संपूर्ण फॅक्टरी शांत असायची . बाजूलाच स्मशानभूमी असल्यामुळे एक प्रकारची गूढ शांतता असायची .कधी कधी रात्री झोपमोड झाली कि अनिल राऊंडला बाहेर पडायचा पण गेट पर्यंत जाताना त्या स्मशानाच्या भिंतीच्या बाजूने जावे लागायचे. मग उगाच मनात धडधड सुरु व्हायची .
त्यारात्रीही तसेच झाले .रात्री 12.30 चा राऊंड मारायला अनिल निघाला आणि स्मशानाच्या बाजूला येताच त्याच्या छातीत अचानक धडधडून आले .कोणीतरी बाजूने चालतंय असे वाटू लागले . मग सिक्युरिटी केबिन दिसताच थोडे हायसे वाटले . केबिनमध्ये बसून त्याने गार्डबरोबर चहा घेतला आणि परत निघाला .  नेहमीप्रमाणे त्याने खिशातून साहेबांच्या केबिनची चावी काढली आणि लॉक उघडून आत शिरला . एसी चालू करून त्याने टेबलवर डोके ठेवले आणि शांतपणे निद्रादेवीची आराधना करू लागला .अचानक त्याच्या हातावर कोणीतरी चापट्या मारतोय असा भास झाला . त्याने कंटाळून मान वर करून डोळे उघडले तर समोर मानकामे उभा होता . मानकामे हा डिपार्टमेंटचा हेल्पर . कॉन्ट्रॅक्टवर काम करणारा .दर सहा महिन्यांनी एक ते दोन दिवसाचा ब्रेक घेऊन परत कामावर यायचा .  काय आहे ?? मी थोड्या संतापानेच विचारले .
"साहेब ,इथे झोपू नका आत आपल्या डिपार्टमेंटमध्ये ,तुमच्या खुर्चीवर जाऊन झोपा ".
ते वयाने मोठे असल्याने मी नुसती मान डोलावली. मी उठताच तो बाहेर निघूनही गेला . तो जाताच अनिल शांतपणे उठला ,बाहेर पडून केबिनला लॉक केले आणि आपल्या खुर्चीवर जाऊन परत टेबलवर डोके ठेवून झोपला .
अचानक कसलीशी जाणीव होताच त्याने खाडकन डोके वर करून समोर पहिले . समोर दूरपर्यंत कोळोखाचेच राज्य होते . टाचणी पडताच ऐकू येईल इतकी शांतता होती . संपूर्ण प्लांट रिकामा असताना मानकामे कुठून आला ??? तोही नाईट शिफ्ट ला ??? त्याला कधी कोणी नाइट शिफ्ट ला बोलावले ?? असे असंख्य प्रश्न अनिलच्या मनात आले . कोणीतरी उठवले हे नक्की आणि तो मानकामे होता हे हि नक्की .पण तो आलाच कसा ,आणि दिसला नाही तो .. अनिल उठला घाईघाईत तो आपल्या वर्करकडे गेला . दोघेही शांतपणे झोपले होते . कसलीच फिकीर नव्हती त्यांना .अनिल शहारून गेला आणि मुकाट्याने गेटवर सिक्युरिटी केबिन मध्ये जाऊन बसला .

No comments:

Post a Comment