Thursday, February 2, 2017

कॅज्युअल लिव्ह

आज सकाळीच वहिनी आमच्या घरात ठाण मांडून बसल्या होत्या .वहिनी म्हणजे बंड्याची आई . बराच वेळ सौ शी गप्पा मारत बसली होती . 2 वेळ तर चहाच झाला . मीही काही बोललो नाही .पण इतक्यावेळ त्या कधीच बसत नाहीत म्हणून  उत्सुकता होतीच .
शेवटी बंड्याच घरी आला आणि आई ला म्हणाला "चल ,नाश्ता झालाय करून घे . क्षणभर कानावर विश्वास बसेना!! ,अरे काय ऐकले मी ?. वहिनी ताबडतोब उठून निघाल्या पण त्यांना चेहऱ्यावरचे हास्य काही लपविता आले नाही . शेवटी बंड्याच म्हणाला " भाऊ ,काकी चला तुम्हीही आमच्यासोबत नाश्ता करायला . त्याचे आणि सौ चे मत बदलू नये म्हणून पटकन हो बोलून सौ चा हाथ पकडला आणि निघालो .
घरात शिरताच बंड्याने थंडगार पाणी आणून दिले ,तर त्याच्या वडिलांनी कांदेपोह्याच्या बशा हाती दिल्या ,सहज आत बघितले तर बंड्या चक्क कांदेपोहे परतत होता गॅसवर, तर बाजूला चहा गरम होत होता.,वाहिनीच्या बाजूला मनी खुदुखुदू हसत होती. न राहवून विचारले "बंड्या काय चालू आहे हे ? बंड्या हसत उत्तराला "आज आईची कॅज्युअल लिव्ह पास केली आम्ही ,आज तिला सुट्टी ,आज आम्ही करणार तीची कामे " अरे पण तिची कामे जमतील का तुम्हाला ?? माझा बाळबोध प्रश्न ."का नाही जमणार ,?? काय होईल जास्तीत जास्त 2/3 वेळा चुकू, पण नंतर येईलच ना ?? आणि हे करताना आई किती मेहनत करते हे हि कळेल . काल माझ्या साहेबानी महत्वाची मीटिंग असूनही सुट्टी घेतली ,पण तरीही ती मीटिंग झालीच ना ?? ते पाहूनच मी विचार केला आपली आई आणि बहीण इतकी मेहनत करतात रोज तर त्यांना एखादा दिवस आराम का देऊ नये ,बाबनाही पटले हे आणि आज सकाळी आईला घरातून बाहेर पाठविले ,आज सर्व आम्ही दोघे करणार "बंड्याने हसत हसत उत्तर दिले . सौ ची बोचरी नजर टाळून मी उद्गारलो "छान ,मग आज  जेवण बाहेरच असेल ?? नाही हो भाऊ ,मग काय उपयोग तिला सुट्टी देऊन ,आज जेवण हि आम्हीच करू ,बघू कितपत जमते ,आता तुम्ही बोलाल बाईचे काम बाईच करते त्यात काय मोठे ?? मान्य ,पण ती हे काम मनापासून करते ,कधीच आराम नाही ,तर कुठे पाट्या टाकणे नाही ,आपल्याला ताटात गरम पोळ्या दिसतात पण तिची मेहनत नाही दिसत ." असे बोलून बंड्याने बाबांच्या हातात कांदे आणि सुरी दिली तर स्वतः भाताचा कुकर लावला .  सौ च्या चिमट्यांकडे लक्ष न देता मी विचारले "मग आज काय बेत आहे ?? बाबा म्हणाले ",काही नाही सर्व काम दोघात वाटून घेतले आहे .सकाळी कपडे मी धुतले तर जेवणाची जबाबदारी बंड्याची .मग भांडी दोघे मिळून घासु ,त्या दोघी जातील नाटकाला . "वा !!वा!! मी टाळ्या वाजवल्या तश्या वहिनी छान लाजल्या "ह्यांचे आपले काहीतरीच "पण त्यांच्या बोलण्यात एक आनंद होता कुटुंबाबद्दल अभिमान जाणवत होता . पण घरी गेल्यावर माझ्याबाबतीत काय घडेल या चिंतेत मी डुंबून गेलो.

No comments:

Post a Comment