Tuesday, August 29, 2017

आरती

बंड्याकडे गणपतीच्या आरतीसाठी निघालोच होतो तोच विक्रम समोर आला.तोंड नेहमीप्रमाणे चालूच होते बहुतेक कुठून तरी गणपतीचा प्रसाद घेतला असणार .
"बरे झाले आलास.चल बंड्याकडे आरतीला जाऊ".मी हात धरून म्हटले.
"बाबा रे ..पाया पडतो तुझ्या .आताच त्या जोशीकडून आरती करून येतोय .पाऊण तास एका जागेवर नुसता टाळ्या वाजवत उभा होतो .हालत खराब झाली बघ".विक्रम वैतागून म्हणाला .
"अरे पण तुला आरत्या येतात.मग नुसत्या टाळ्या का वाजवत बसलास".मी हसून म्हणालो.
" येतात रे !! पण त्या आपल्या नेहमीच्या पाच.त्या बहुतेक सर्वाना येतात आणि एका तालात बोलताना जर शब्द इकडे तिकडे झाले तरी चालतात .काही शब्द गाळायला टाळ मृदुगांची साथ असते . त्यामुळे एक सुरात  आरती म्हणताना छान लय लागते . पण हे जाधव बुवा आले आणि वाट लावली". विक्रम शांत झाला नव्हता.
" जाधवबुवा तर छान आरत्या म्हणतात .भजनी मंडळात गातात ते.ते कसे वाट लावतील"?? मी आश्चर्याने विचारले.
"हो ते गातात .पण आज भजनी मंडळ नव्हते त्यांचे.कुठून कुठून एक एक आरती काढली आणि मन लावून एकटेच गात बसले .आम्हाला काय येतेय त्यात.आम्ही चूप बसून टाळ्या वाजवू लागलो.बरे त्या टाळ्या तरी लयीत वाजतात का ?? माहीतच नसेल काही तर टाळ्या कश्या वाजवणार .टाळ मृदुगवाल्यांचाही ठोका चुकला .मग आरतीची मजा गेली .कधी एकदा संपतेय असे वाटू लागले . योगेशही कंटाळला आरती फिरवून फिरवून .त्यात पंखे बंद . लोकांना घाम फुटू लागला . हात भरून येऊ लागले .मी तर खात्रीने सांगतो तो गणपती ही मनात बोलत असेल अरे बाबांनो पुरे आता .कंटाळून माझी आरती करू नका" विक्रम चिडून म्हणाला.
"तुझे काहीतरीच विकी .अरे आरती केल्यावर किती प्रसन्न वाटते . कंटाळा कसा येईल ?? आणि गणपतीही खुश होतो .समोर चाललेली त्याची स्तुती पाहून". मी मुद्दाम त्याला चिडवले .
"भाऊ थोडे फार शास्त्र मलाही कळते रे .आरती किंवा मंत्र योग्य पद्धतीने उच्चारले तर वक्तृत्व अर्थात भाषा आणि बोलणे स्पष्ट होते . रक्ताभिसरणावर अनुकूल परिणाम होतो. विशिष्ट ठेक्यात टाळ्या वाजविला तरीही छान व्यायाम घडतो ह्या दोन्ही गोष्टी एकत्र तालात घडल्या तर मनावर आणि शरीरावरही चांगला  परिणाम होतो .मन प्रसन्न होते .म्हणूनच पूर्वजांपासून विशिष्ट चालीत सुरात आरत्या मंत्र म्हणण्याची पद्धत आहे . ते एक समूह गान आहे असे आपण म्हणू . पण त्याची लय कोणी बिघडवली तर.?? तुमचे मन अचानक आलेल्या ह्या गोष्टी स्वीकारायला तयार नसते .एक आरती म्हणणार आणि बाकी सगळे गप बसून हव्या तश्या टाळ्या वाजवणार .बरे हे लवकर संपले तर ठीक .बराच वेळ चालू राहिले तर हळू हळू सगळे कंटाळतात .मग त्या आरतीला काही अर्थ आहे का ते सांग .?? विक्रमने त्याच्या भाषेत आज मुद्देसूद विचारले .
मीही विचारात पडलो."पण असेल एखाद्याची आवड काही वेगळे करायची ".
"जरूर वेगळे करा पण मग तुमचा गट बनवा आणि त्यांनी अश्या आरत्या म्हणा . बाकीचे गप्प बसून राहतील .कदाचित त्यांच्या सुरात वेगळेपण असेल जे इतरांना जास्त आवडेल .पण तुमची आवड इतरांवर का लादता . तो बिचारा गणपती समोर बसून ऐकून घेतो म्हणून वाटेल ते बोलाल का ?? उलट असे कंटाळलेले चेहरे बघून तो जास्त चिडत असेल".आज विक्रम काही ऐकण्याच्या मूड मध्ये नव्हता .
"तुला माहितीय आपण एक गजल प्रोग्रॅमला गेलो होतो . त्या उस्तादांची एक गजल तर किती फेमस होती . पण त्यांनी पहिल्यांदाच सांगितले ती गजल मी शेवटी गाणार आता माझ्या नवीन गजल ऐका .लोकांना आधी बरे वाटले पण नंतर नंतर बोअर झालेत .आणि तेही प्रत्येक गजल वेगवेगळी तान घेऊन जायचे .एक गजल चालू असताना मी बाहेर जाऊन चहा पिऊन आत आलो तरीही तीच गजल चालू होती .पस्तीस मिनिटे ती गजल चालू होती .मी त्या हजार लोकांचे कौतुक केले . त्यांच्या सहनशक्तीचा दाद दिली. नेहमी कानावर पडणारी गोष्ट वेगळ्या पद्धतीने कानावर आली किंवा नवीन काही ऐकायला मिळाले की पहिल्यांदा थोडा त्रास होतोच .
"हे बघ विकी ..तू उगाच कुठल्याही गोष्टीचा संबंध कुठे लावू नकोस .तुला यायचे असेल तर चल नाहीतर घरी निघ . तिथे आलास तर जाधवबुवा ही आहेत हे लक्षात ठेव . आणि हो प्रसादला पुरणपोळी,काजूकतली आणि चेरी आहे .येतोस का "?? मी निर्वाणीचे विचारले .
"काय म्हणतोस ?? एव्हडा प्रसाद ",?? विक्रम आनंदाने म्हणाला ",चल येतो मी .च्यायला... त्या जोश्याकडे सफरचंदाची  एकच फोड मिळाली".असे म्हणून मला  टाळी देत मोठ्याने हसला आणि खांद्यावर हात टाकून बंड्याच्या खोलीकडे वळला .
© श्री. किरण बोरकर

No comments:

Post a Comment