Monday, October 29, 2018

मी टू ...1

सुप्रसिद्ध मराठी सुपरस्टार विनयकुमार मी टू  प्रकरणात अडकला आणि त्याच्या कुटुंबात मित्र परिवारात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या
स्थळ.... कोकणातील एक छोटे गाव
"मेले नरकात पडतील सगळे....... !! फटकी येऊन मरतील.....माझ्या लेकावर नको नको ते आरोप करतात.....??  घरात शिरताच बायकोच्या तोंडाचा पट्टा चालू असलेला पाहून सुदाम सुर्वे काय झाले ते समजून गेला.
सध्या गावात विनायकुमारचीच चर्चा होती.विन्याला त्यांनी मुलासारखे वाढविले होते त्यामुळे ती संतापणार हे नक्की होते. त्याच्या शांत आणि भिडस्त स्वभावामुळे तो या गोष्टीची चर्चा करत नव्हता आणि गाववाले ही त्याच्यासमोर काही बोलत नव्हते .
सुदाम घरात शिरलेला बघताच ती अजून बिथरली. आतून दोन चार भांडी पडताच सुदाम स्वतःशीच हसला.ती चहा घेऊन बाहेर आली .त्याच्यासमोर चहाचा पेला आपटत म्हणाली "तुम्ही कायच बोलूंचा नाय असा ठरवलाव की काय ...??? माझो पोर अशी भांनगड करुचो नाय हे म्हायती आहे तुमका .."
"पण लोकांची तोंडा बंद करता येतात काय...?? सुदाम चहाचा घुटका घेत म्हणाला.
"कोण हो ती सटवी... ??? खयसून इली ती ...?? समोर तर येऊ दे .. झिंझ्या उपटून हातात देईन तरच खऱ्या बापाची मी ..." तिचा आवाज चढला तसा सुदामला ठसका लागला.
"आपल्या गावाची तर दिसत नाय... !! .नायतर तिचो इतिहास काढलो असतो.. "सुदाम सहज म्हणाला
"म्हणजे ...?? गावाच्या सर्व बायकांचो इतिहास तुमाक माहिती असा... "तिचा आवाज चढला तसा सुदाम वरमला. आपण काहीतरी भलतेच बोलून गेलो याची जाणीव त्याला झाली.
"तसा नाय गो ....पण गावातली असती तर माहिती झाली असती खरा खोटा काय ता...?? त्याने ताबडतोब सारवासारव केली .
"मी काय म्हणते ...?? कोणी काय बाहेरचा केला नसात ना ...??? त्या दिवशी दोन कोंबड्या मेल्या ... बाहेर पिंजर लावलेलो लिंबू पण होतो .भटाला जाऊन विचारायचा काय ...?? पोराची प्रगती कोणाक बघवत नसात...?? चिंतातुर नजरेने ती सुदामकडे पाहत म्हणाली .आपल्या बायकोचे छोट्या दिरावरचे हे निरागस प्रेम पाहून सुदाम गहिवरला.
" तू म्हणतेस तर बाहेरचा काय ता बघू ... लोकांका त्याची प्रगती डोळ्यावर आली असेल .. असे बोलून त्याने बायकोला धीर दिला.
खरे तर विन्यावर कितपत विश्वास ठेवायचा याबाबतीत तो साशंक होता . दोन वर्षांपूर्वी तो मुंबईला विन्याकडे गेला होता तेव्हा त्याच्या बेडरूम मध्ये स्त्रियांची अंतवस्त्रे त्याने पहिली होती . पण तरुण मुलगा आहे त्यात प्रसिद्ध .... अश्या गोष्टी आयुष्यात घडतात हे त्याला माहित होते म्हणून तो गप्प राहिला .पण रात्री फोन करून त्याला विचारायचे आणि आम्ही पाठीशी आहोत हे सांगून त्याला धीर द्यायचा हे पक्के ठरवून तो उठला .
© श्री . किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment