Wednesday, October 10, 2018

पहिली  माळ ...... रंग ?????

पहिली  माळ ...... रंग ?????
नवरात्री आल्या की तिला आनंद व्हायचा.कोणत्या दिवशी कोणता रंग हे तिला तोंडपाठ असायचे .कचरा उलचणारी असली म्हणून काय झाले शेवटी तिलाही आवड  होतीच.........
त्या दिवशीही ती ठरलेल्या रंगाची साडी नेसून घराबाहेर पडली. तिचे पिलू पाठीवर बांधलेल्या झोळीत खुशाल झोपून होते.आईजवळ असण्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता .आजूबाजूच्यांच्या कुत्सित नजरा आणि पुरुषांचे अश्लील शेरे स्वीकारत ती बाहेर पडली .नेहमीच्या कचरापेटीतून हव्या त्या वस्तू गोळा करीत फिरू लागली . रस्त्यावरून त्याच रंगाचे ड्रेस आणि साड्या घालून जाणाऱ्या इतर स्त्रिया आणि।मुलींकडे पाहून ती खुश व्हायची . आपणही आज त्यातलेच आहोत याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर उमटायचा .
एका पेटीत कचरा निवडताना तिचा हात अचानक थबकला . तोंडातून बाहेर पडणारी किंकाळी तिने कशीतरी दाबून धरली .आजच्या रंगाच्या कापडात गुंडाळलेले मृत मूल अलगद तिने हातात घेतले. नुकतेच जन्मलेले होते ते. पोटात काहीच नसल्यामुळे रडून रडून बिचाऱ्याचे प्राण निघून गेले होते . हुंदका देत तिने त्याच्या तोंडावरून हात फिरवला आणि नियमाप्रमाणे जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याला घेऊन गेली . नेहमीच्या गोष्टी असल्याप्रमाणे पोलिसाने पेपर बनविले आणि मूल बेवारस म्हणून नोंद केली . सगळेच दगडी मनाने काम करीत होते.....तिला रहावेना . धीर करून तिला त्या मुलाचे अंत्यसंस्कार करण्याची परवानगी मागितली . समोरचा हवालदार आश्चर्याने तिच्याकडे पाहत बसला . तर इन्पेक्टरने विचार करून परवानगी दिली . तिने ते कलेवर अलगद उचलले.आणि विधिवत अंत्यसंस्कार करण्यासाठी पावले स्मशानाकडे वळवली. होय ती देवीचं आहे .
© श्री . किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment