Saturday, October 13, 2018

चवथी माळ ... रंग ????

चवथी माळ ... रंग ????
हे गणपती ...नवरात्र.. असे मोठे सण आले की ती खुश व्हायची. नवरात्रीला तर जास्त खुश असायची. बरेचसे लोक घराला कुलूप लावून  गरबा खेळायला बाहेर पडायचे. मग दोन तीन तास तरी तिला आरामात घर साफ करायला मिळायचे . फेसबुकवर काही स्वतःचे अपडेट ही द्यायचे प्लेयिंग गरबा विथ फॅमिली . आपण फक्त डोळे उघडे ठेवून नजर ठेवायची आणि हल्ली नऊ दिवस ठराविक रंगाचे ड्रेस किंवा साड्या नेसून बाहेर पडतात त्यामुळे ओळखायला ही कठीण जाते  एखादीला.होय ती चोर होती.बराच काळ एका फॅमिलीला लक्ष करून संधी मिळताच घर साफ करायचे तिचे काम.
आजही ती आजच्या रंगाचा ड्रेस घालून निघाली होती . एक घर हेरूनच ठेवले होते . आज गरबा खेळायला जाताच घरात घुसण्याचा तिचा प्लॅन.सर्व रस्त्यावर एकाच रंगाचे ड्रेस साड्या दिसत होत्या.त्या घरातील आई वडील मुलगी बाहेर पडताना तिने पाहिले .
"वा....रे...वा...!! सर्वांनी एकाच रंगाचे कपडे घातले आहेत . ती हसली आता दोन तीन तास तरी येणार नाहीत.आजूबाजूचेही गरबा पाहण्यात मग्न .
हातातील हऱ्याराने कुलूप उघडून ती अलगद घरात शिरली.पार्टी श्रीमंत होती यात काही वादच नव्हता . तसेही ती पार्टी बघूनच काम करायची. हातातील बॅटरीच्या साहाय्याने तिने एका खोलीची तपासणी करण्यास सुरुवात केली.तिथला वॉर्डरोब उघडणार तोच शेजारच्या रूममधून खोकण्याचा आवाज ऐकू आला .. ती दचकली. हे काय भलतेच...??. घरात अजून कोण आहे ..?? हळुवार पावले टाकीत ती शेजारच्या रूममध्ये शिरली . आत बेडवर एक लहानशी आकृती झोपली होती . तिची काही हालचाल होत नसलेली पाहून ती पुढे गेली आणि धक्का बसून तिथेच उभी राहिली .बेडवर एक कृश शरीराची म्हातारी झोपली होती .जोरजोरात धापा टाकीत होती.
" च्यायला...!! घरचे म्हातारीला कोंडून बाहेर मजा मारायला गेले वाटते " तिने मनात म्हटले .
"पाणी.....  म्हातारी खोकत खोकत म्हणाली.. तशी ती भानावर आली . म्हातारी सिरीयस झालीय हे तिच्या अनुभवी नजरेने ओळखले होते .काय करावे हा प्रश्न पडला . ती चोर होती पण निर्दयी नव्हती . किचनमधून पाणी आणून तिने तिला पाजले. कपाळावर हात ठेवला तर अंगात ताप होता . सहज खाली हात लागला तसे कळले बिछाना ओला झालाय . मग तिने तिला उचलले चांगले साफ केले . कपाटात तिच्या अनेक साड्या गाऊन होते . मुद्दाम तिने आजच्या रंगाचाच गाऊन निवडला आणि म्हातारीला घातला . किचनमध्ये जाऊन  वस्तू शोधल्या आणि गरम चहा बिस्किटे घेऊन आली . समोर बसून तिला भरवली. आता कुठे म्हातारीला तरतरी आली .बाजूच्या ड्रॉवरकडे तिने हात केला तेव्हा त्यातील बॉक्स काढून औषधें तिला दिली. हे सर्व करीत असताना मनात सतत धागधुग होती . घरचे आले तर काय होईल ....??? पण पाय काही हलत नव्हता.म्हातारीच्या नजरेतील ओढ तिला थांबवत होती.
"घरचे बाहेर गेलेत ....आजची रात्र काय येणार नाहीत...?? म्हातारी क्षीण आवाजात बोलली .तशी ती शांत झाली . मग तिने रात्रभर म्हातारीच्या उशाशी बसून कपाळावर पट्ट्या ठेवल्या . सकाळीच तिचा ताप उतरला . परत तिला चहा बिस्किटे भरवून ती निघायच्या तयारीला लागली .
"घरचे बाहेर गेलेत ...पण मुलगा सांगून गेला रात्रीसाठी काहीतरी सोय करतो तुझी . तुला पाठवलंय हो त्याने  . खूप छान केलेस तू माझे . मुलगा किती काळजी घेतो माझी .....". म्हातारी तिच्याकडे पाहून म्हणाली.
तिने मुलाला मनोमन शिव्या घातल्या आणि त्या माउलीला प्रणाम करीत बाहेर पडली . आज मन तृप्त करणारा अनुभव तिच्या पदरी पडला . होय ती देवीचं आहे .
© श्री . किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment