Friday, October 12, 2018

तिसरी माळ.. रंग ..??

तिसरी  माळ ..... रंग ????
धुळीने भरलेल्या रस्त्यावर ती ट्रॅफिक कंट्रोल करीत सकाळपासूनच  उभी होती.दुपारी रिलिव्हर न आल्यामुळे अजूनच चिडली होती त्यात हे ट्रॅफिक तुंबलेले रोजचे ट्रॅफिक .संध्याकाळी आजच्या रंगाची साडी नेसून नाक्यावरच्या देवीला जायच तिचा प्लॅन ठरलेला होता.पण हा रिलिव्हर शेवटी पुरुषच.... स्त्रियांच्या भावनांचा विचार करणार नाहीच.
मुबईच्या ट्रॅफिकला इतरांप्रमाणे तीही शिव्या देत काम करायची . इतक्यात वायरलेसवर मेसेज आला एका मंत्र्याची गाडी येतेय ट्रॅफिक मोकळे करून घ्या. मनोमन शिव्या हासडत ती कामाला लागली. लोक काय मजा म्हणून ट्रॅफिक जाम करतात का ....?? तर ह्या मत्र्यांनाच घाई असते का ...?? इतरजण काय गाड्या घेऊन फिरायला बाहेर पडलेले असतात ....??? रस्त्यावरील धूळ ....गाडीतील कार्बन...आणि हॉर्नचा आवाज अंगावर घेत ती कामाला लागली. ट्रॅफिक थांबविताच इतर गाड्यांचे हॉर्न मोटारसायकलवाल्यांच्या शिव्या तिच्या कानावर पडल्या .इतक्यात एक मध्यमवयीन स्त्री हातात छोट्याला घेऊन धावत रस्ता क्रॉस करू लागली . फारच घाईत दिसत होती चेहरा ही रडवेला होता.त्या बाईच्या अंगावर ही आजच्या रंगाची साडी दिसत होती . तिची अवस्था बघून काहीतरी गडबड आहे हे तिला जाणवले . मुलाला काही झाले असेल का ..??? की अजून काही ...?? ड्युटी सोडून आपण तिला काही मदत करू शकत नाही हे तिला जाणवले. क्षणभर विचार करून तिने  मंत्र्याची गाडी अडवली आणि तिला जाण्याची खूण केली . रस्ता क्रॉस करून त्या बाईने तिच्याकडे पाहून हात जोडले आणि धावायला सुरवात केली .एक चिडलेला आवाज त्या गाडीतून तिच्या कानावर पडला आणि  तिडीक तिच्या मस्तकात निघाली आणि काहीतरी उत्तर देण्यासाठी ती गाडीजवळ आली .तिचा चेहरा पाहूनच ड्रायव्हर हादरला. इतक्यात आतून मंजुळ आवाजात तिला सॉरी म्हटले गेले . आश्चर्य चकित होऊन तिने आत पाहिले . आत एक तरुण स्त्री तिच्याकडे पाहून हसली . तिनेही त्याच रंगाची साडी नेसली होती . पुन्हा एकदा तिने सॉरी बोलून तिला हात जोडले आणि हाताने थंप्स अपची खूण करून गाडी पुढे नेण्याचा ड्रायव्हरला इशारा केला.
होय त्या देवीचं आहेत .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment