Thursday, October 11, 2018

दुसरी माळ ...रंग ..??

दुसरी माळ .... रंग ????
आजच्या रंगाची साडी नेसून आपल्याबरोबर मुलीलाही सजवून ती देवीच्या दर्शनाला जायला तयार झाली . नवऱ्याची लाडिक नजर पाहून ती मोहरून उठली . बाहेर पडणार इतक्यात मोबाईल वाजला . न घेण्याचा प्रश्नच नव्हता स्टेशनने कामासाठीच फोन दिला होता तिला.
"दहा मिनिटात हजर हो ... डहाणूकर रोडवर  एका बिल्डिंगला आग लागली आहे. मूव्ह ...." साहेबांचा करडा आवाज कानावर पडताच मुलीचा हात सोडून बाईककडे पळाली . दोन मिनिटात तिची बाईक फायरबिग्रेड स्टेशनच्या दिशेने धावू लागली .तर सातव्या मिनिटाला ती व्हॅनजवळ हजर होती.
"आयला भारी .....!!  सहकाऱ्यांच्या तशाही स्थितीत मारलेल्या कॉमेंट्स ऐकून तिला हसू आले आणि त्यांना हात दाखवून ती केबिनमध्ये शिरली .दोन मिनिटात  कपडे बदलून ती चालत्या व्हॅनमध्ये चढली.
" कुठे ....?? दर्शनाला निघाली होतीस का ....?? साहेबांचा करडा आवाज ऐकून तिने मान डोलावली . "उद्या जा ...... भावनाहीन आवाजात त्यांनी उपाय सांगितला.हा उद्या कधी येत नाही हे तिला माहीत होते . काही न बोलता ती हसली .
त्या इमारतीच्या पाचव्या मजल्याला आगीने वेढले होते . आरडाओरड चालू होती. हातातील हत्यारे सावरत ती जिन्याकडे पळाली.एक एक मजला पार करत ती पाचव्या मजल्यावर पोचली . अडकलेल्या सर्वाना  सुखरून बाहेर काढून  तिने सुटकेचा निश्वास टाकला. इतक्यात एक छोटी मुलगी ओरडली "माझा चिंटू ....माझा चिंटू ....काही न कळून  सर्वांनी एकमेकांकडे पाहिले. तितक्यात एक घरचा म्हणाला "काही नाही हो .....आमचा छोटा कुत्रा आहे . राहिला असेल वर ..राहुद्या आता . आम्ही सर्व सुखरूप आहोत ना .??? पण त्या छोटीचे रडणे काही थांबत नव्हते . तिला राहवेना ,ती परत वर जाण्यास तयार झाली . साथीदारांनी तिला अडवले .कशाला एका कुत्र्यासाठी परत त्या आगीत जातेस .....पण एका थंड नजरेने त्यांना गप्प करून ती जिना चढू लागली.पाचवा मजला पूर्ण आगीच्या वेढ्यात होता . ती कानात प्राण आणून त्याच्या हालचालींचा मागोवा घेऊ लागली . अचानक एका जळत्या कापटामागून त्याचे रडणे ऐकू आले . सावधपणे ती तिथे गेली . एक छोटे गोजिरवाणे पिलू जीव मुठीत धरू बसले होते . मरणाची मूर्तिमंत भीती त्याच्या डोळ्यात दिसत होती. तिला पाहताच त्याने पुन्हा भुंकायला सुरवात केली . यावेळी त्याच्या भुंकण्यात आनंद दिसत होता . हळुवारपणे तिने त्याला  उचलले आणि परत फिरली. त्या छोट्या मुलीच्या हाती त्याला सोपावताना  चेहऱ्यावरचे हास्य पाहून तिला भरून आले.
खरेच ती देवीचं आहे.
© श्री . किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment