Sunday, October 14, 2018

पाचवी माळ.... रंग..??

पाचवी माळ ... रंग ???
आरश्याच्या बाजूला चिकटवलेल्या लिस्टकडे तिने नजर टाकली.नवरात्रात कोणत्या दिवशी कोणता रंग याची लिस्ट होती. अर्थात ती नुसती पहायची... कारण ते रंग तिच्याकडे असतीलच याची तिला खात्री नव्हतीच.
पण आजचा रंग पाहून ती खुश झाली .मागच्या वर्षी देवगिरी बिल्डिंगमधल्या उमाताईने याच रंगाची साडी तर दिली होती तिला.....आणि हो.. पोरीचा एक ड्रेसही याच रंगाचा आहे . ती मनोमन खुश झाली. आज आपल्याबरोबर पोरगी ही आजचा रंग वापरेल .
एका जुनाट चाळीत राहणारी साधी स्त्री होती ती . चार घरात मोलकरणीची कामे करून पोट भरणारी .बऱ्याच जणींच्या नशिबात येणार बेवडा नवरा तिच्याही नशिबात होताच . त्यामुळे शिव्या मारझोड हे प्रकार रोजचेच . सगळ्यांकडे थोड्याफार फरकाने तेच प्रॉब्लेम मग कोण  दुसऱ्यांच्या भानगडीत पडेल.....??. तरीही तिने दोन्ही मुलांनाआणि स्वतःला  टापटीप ठेवले होते . ज्या घरी कामे करायला जायची तिकडची मुले..त्यांची राहणीमान ...वागणूक ..पाहून आपल्या मुलांवरही तसे संस्कार करायचा प्रयत्न करायची . तरी एक बरे... नवरा सकाळी बाहेर पडला की रात्रीच घरी परतायचा . मग हिला शिव्या ..त्यानंतर जबरदस्ती ..ही मुकाटपणे झोपून राहायची . कसले सुख अन कसले काय.....
पण आता  मुलगी मोठी होत होती . तिची काळजी वाटू लागली होती . विचार करत करत तिने ती साडी नेसली.... मुलीला ड्रेस दिला .मस्तपैकी तयार होऊन दोघींनि एकमेकांना टाळ्या दिल्या आणि बाहेर पडल्या. आज ती जिथे जिथे गेली तिकडे तिचे कौतुक झाले त्यामुळे संध्याकाळी आनंदातच घरी आली.पण नवऱ्याच्या लडखडत्या एन्ट्रीमुळे आपला आनंद संपला याची तिला जाणीव झाली .पुढ्यात वाढलेले जेवण जेवून झाल्यावर नेहमीप्रमाणे तो तिच्यावर झपाटला. काही वेळाने तृप्त होऊन उठला आणि तिची पर्स उघडली . रिकामी पर्स पाहताच त्याचे डोके सणकले.
" नाही आहेत पैसे ... ...ती कपडे सावरत म्हणाली . मुलीला पॅड आणायला दिले... तिला अडचण आलीय"
तसा तो भडकला "चार घर घेतेस तरी पैसे नाहीत म्हणतेस ...मग काय मजा मारायला जातेस xxx ..?? मुलगी वयात आलीय मग तिलाही आता चार घरात घेऊन जा म्हणजे तीही पैसे कमावेल . नाहीतरी दोघींना सजून जायची सवय आहेच .."
मुलीबद्दल असे ऐकताच तिचा संयम संपला." लाज नाही वाटत स्वतःच्या मुलीबद्दल असे बोलायला.."?? संतापाने कपडे वाळत घालायची काठी तिने हातात घेतली आणि जीव खाऊन तिने त्याला फटकवायला सुरवात केली . तिच्या अश्या अनपेक्षित हल्ल्याने तो बावरला . अंग चोरून मार चुकवायचा प्रयत्न करू लागला पण तिचा संताप आता पराकोटीला पोचला होता . शिव्या देत मिळेल तिथे काठीचे तडाखे त्याला देऊ लागली .तो शेवटी घाबरून बाहेर पळून गेला . थोड्यावेळाने शांत झाली . भेदरून पाहत असलेल्या आपल्या मुलांजवळ गेली आणि हंबरठा फोडत त्यांना कुशीत घेतले . होय ती देवीच आहे.
© श्री.किरण कृष्णा बोरकर 

No comments:

Post a Comment