Wednesday, October 17, 2018

आठवी माळ...रंग ..??

आठवी माळ ...रंग ..??
"भाऊ ....वृद्धाश्रमातील चार नंबरातील म्हातारी गेली" बंड्याचा फोन आला.
"ठीक आहे ....मी निघतो .डायरेक्ट आश्रमात येतो"मी उलट निरोप दिला .
"तुम्ही या हो ....पण इथे प्रॉब्लेम वेगळाच आहे..."बंड्या चिंतीत स्वरात म्हणाला.
"आता काय ...."?? मी विचारले.
बंड्या आणि त्याचे मित्र त्या वृद्धाश्रमातील अनाथ वृद्धांचे त्यांच्या धर्मानुसार रितिरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करतो हे मला माहित होते त्यामुळे बऱ्याच वेळा अडचणी येत होत्याच.
"बोल काय अडचण आहे ...."??मी मोठ्या आवेशात विचारले.
"भाऊ म्हातारीने असे लिहिलेय की तिच्या  प्रेतावर रडणाऱ्या बायका हव्यात .तो रुदाली चित्रपट आहे ना ?? तसे काहीसे ... '?? च्यायला.... ही नकोशी झाली म्हणून हिला वृद्धाश्रमात टाकली  आणि हिच्या इच्छा बघा ....?? बंड्या चिडून बोलत होता.
बंड्या कितीही चिडून म्हणाला तरी त्याच्या ह्या कामावरची निष्ठा सर्वाना नाहीत होती.त्यामुळे त्याला सर्व माफ होते .मीही सर्व टेबल आवरले आणि साहेबांना सांगून निघालो .
आता या समस्येवर काय उपाय शोधावा असा विचार चालू असतानाच  तो माझ्या डब्यात शिरला .त्याच्या त्या विशिष्ट टाळीने मी भानावर आलो . खरे तर मला अश्या यावेळी बघून तो चमकला.अर्थात पैश्याची काही अपेक्षा नसल्यामुळे तो माझ्याकडे फिरकणार देखील नव्हता . नवरात्रीचे दिवस असल्यामुळे त्याने आजच्या रंगाची साडी नेसली होती . साडीच काय पण केसातील क्लिपपासून  पायातील चपलापर्यंत सगळे त्याच रंगाचे होते . ते पाहून मला हसू आले ,नेमके त्याने त्याचवेळी माझ्याकडे पाहिले . मला हसता येते हे पाहून त्याला नवल वाटले असावे. तो हसत माझ्याजवळ आला . "काय साहेब आज यावेळी ..…"?? त्याने सवयीनुसार टाळी वाजवत मला विचारले आणि हात बाजूच्या माणसाकडे पसरला.
" हो थोडे अर्जंट काम निघाले ......मी बोलून गेलो.
"काय काम साहेब ...??थोडे चिंतीत दिसता "त्याने बहुतेक माझ्या चेहऱ्यावरचे भाव वाचले असावेत.
अचानक माझ्या डोक्यात एक कल्पना आली . मी त्याला म्हटले "एक काम करशील माझे ....??मी पैसे देईन तुला ....माझ्याकडून अनपेक्षित विचारणा येताच तो चमकला .
"आहो साहेब ..पैश्यासाठीच करतो आम्ही  सर्व . काय ते सांगा पण पैसे किती ते मी सांगेन "
मी हसलो ... "एकाच्या प्रेताजवळ रडायचे आहे .तुझ्याबरोबर अजून तीन चार ही चालतील"
ही मागणी ऐकून तो हादरला . त्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलले ."काहीतरी काय साहेब ....? असे कोण करते का....?? तो चिडून म्हणाला.
"अरे पैसे देतो ना ...दोन तासाचा प्रश्न आहे .ह्या पत्त्यावर तुझ्या ओळखीच्याना पाठव आम्ही पैसे देऊ .". असे म्हणत मी पत्ता लिहून दिला .
"ठीक आहे साहेब ..असे बोलून त्याने दोन फोन केले आणि चारजणाना त्या पत्त्यावर पाठविले.
'आयला ....असाही पैसा कमावता येतो हे आजच कळले.."तो हसत टाळी वाजवत म्हणाला .अचानक तो म्हणाला "चला मीही येतो तुमच्या बरोबर .."आणि बाजूला बसला.
आम्ही स्टेशनवरून  रिक्शाने आश्रमाजवळ पोचलो .आजीचे शव बाहेरच अंगणात ठेवले होते .आश्रमातील वृद्ध स्त्रिया तिच्याभोवती रिंगण करून होत्या . त्याने फोन करून बोलावलेले साथीदारही  पोचले होते.त्या सर्वांनी आजच्याच रंगाच्या साड्या नेसल्या होत्या. याने खूण करताच सर्वांनी मोठमोठ्याने रडायला सुरवात केली.म्हातारीला आंघोळ घातल्यावर बंड्याने सामानातून साडी काढून त्यांच्या हाती दिली.तितक्यात तो उठला आणि म्हणाला काय दादा शेवटच्या यात्रेला तरी आजीला सजवा असे बोलून साडी त्याच्या हातातून काढून घेतलीआणी आत गेला. . थोड्या वेळाने बाहेर आला   तेव्हा त्याच्या शरीरावर आजीची साडी होती तर हातात तिची आजच्या रंगाची साडी .आहो देवी आहे ती आजच्या रंगाची साडी नेसुनच बाहेर पडेल आणि सर्वांनी मिळून तिला साडी नेसवली.सर्व तयारी होताच बंड्याने निघायची खूण केली.तसे मी त्या रडणार्यांना थांबविले आणि पैश्यासाठी खिश्यातून पाकीट काढले .
न राहवून त्याने मला विचारले "साहेब ...या कोण तुमच्या..?
मी म्हटले "इथे कोण कोणाच्या नात्याचे नाही. तिची इच्छा होती माझ्यासाठी रडणाऱ्या शोधा त्यासाठी काही पैसेही तिने बाजूला काढले होते .तेच तुला देतोय". हे ऐकून त्या सर्वांचे चेहरे गंभीर झाले.
'साहेब.. आम्हाला पैसे नको. त्याबदल्यात आम्हाला या महायात्रेत सामील होण्याची परवानगी द्या "तो हात जोडून मला म्हणाला बाकीच्यांनीही हात जोडून परवानगी मागितली .
"अरे विचारता काय ...??व्हा सामील ... "तिकडून बंड्या ओरडला .त्यांचे चेहरे खुलले .तो तिरडीच्या जवळ आला . म्हातारीच्या तोंडावरून हात फिरवून जोरात टाहो फोडला .बंड्याने खुणेनेच त्याला तिरडीला खांदा द्यायची खूण केली .  डोळ्यातील अश्रू पुसत त्याने एका बाजूने तिरडी खांद्यावर घेतली आणि अंत्ययात्रेला सुरवात केली . होय त्या देवीच आहेत .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment