Monday, October 15, 2018

सहावी माळ .... रंग ...??

सहावी माळ ... रंग ??
"अग....!! नको त्या रंगाचा ड्रेस घालू आज.आपल्या धर्मात नाही चालत असे..."आजच्या रंगाचा ड्रेस तिने कपाटातून बाहेर काढताच आई ओरडली.
"अग ....पण माझ्या सर्व मैत्रिणीने ठरविले आहे . रोज त्या त्या ठरलेल्या रंगाचा ड्रेस घालून यायचा आणि मलाही खूप आवडते ग...."ती चेहरा रडवेला करून म्हणाली.
"मान्य आहे बाळा ....पण कोणी बघितले तर काय म्हणतील. पोरगी धर्म बुडवते आहे ...त्यांच्या मागे लागलीय . तुझ्या वडिलांना काय काय ऐकावे लागेल .   एकतर आधीच वातावरण बिघडलेले आहे .त्यात तुझ्या ह्या रंगाची भर.."तिची आई केविलवाणा चेहरा करून तिला समजावीत होती .
"मला नाही कळत ह्या गोष्टी...असे ठराविक रंगाचे कपडे घालून गेले की धर्म कसा बुडतो..."असे म्हणून तिने तो ड्रेस चढविला आणि बाहेर पडली.
नाक्यावरच नेहमी सर्वजणी एकत्र भेटत होत्या आणि मग तिथून पुढे गप्पागोष्टी ..मस्ती ..करत जात होत्या . दहा बारा मैत्रिणींचा ग्रुप होता त्यात काही वेगळ्या धर्माच्या ही होत्या.बाकीच्यांना तसा काही प्रॉब्लेम नव्हता .पण हिलाही कोणीच कधी  वेगळे वागविलेच नाही.... ना त्यांच्या घरच्यांनी.... तिला मात्र खूप बंधने होती . आईबाबांना त्यांची मैत्री फारशी आवडत नव्हती पण ते तरी काय करणार ....?? मैत्रिणी खूप चांगल्या आहेत म्हणून ते गप्प होते.
नेहमीसारख्या त्या गप्पा मारत हसत खिदळत निघाल्या. एकमेकांच्या ड्रेसची चर्चा होत होतीच पण उद्या काय.........?? . त्याचीही चर्चा चालली होती.
अचानक चार तरुणांचे टोळके त्यांच्या पुढ्यात आले . ह्या विभागात तिच्याच धर्माचे लोक जास्त होते . त्यांना पाहून सर्व थांबल्या . त्यातील एक पुढे झाला आणि तिच्या पुढ्यात येऊन उभा राहिला.
"या दिवसात त्यांच्या रंगाचे ड्रेस घालू नकोस ..धर्म बुडतोय ...हे लक्षात येत नाही का तुझ्या ... "?? हळूहळू त्याचा आवाज वरच्या पट्टीत गेला .
ती घाबरली...असे काही सर्वांच्या पुढ्यात घडेल  वाटले नव्हते .इतक्यात एक पुढे आली .
"अश्या रंगाचा ड्रेस घातल्याने धर्म कसा बुडेल ....?तिने नजर रोखून त्यांना विचारले .
"ताई मी तुमच्याबद्दल नाही बोलत आहे ..मी माझ्या धर्माबद्दल बोलतोय .हिला सांगतोय ..."तिच्याकडे बोट दाखवून तो म्हणाला "हे रोज ठराविक रंगाचे कपडे तुम्ही यादिवसात घालता .त्याने तुमची भक्ती प्रकट करता पण आमच्या धर्मात असे चालणार नाही.. मुळात हिने तुमच्याशी संबंधच नाही ठेवले पाहिजे ...चल घरी जा ...असे म्हणत त्याने तिचा हात पकडला .
अचानक दोन मजबूत हाताची पकड त्याच्या दोन्ही हातावर बसली ."हात सोड तिचा ...... "दुसरीकडून आवाज आला .त्याने तिकडे पाहिले. तिच्या दोन मैत्रिणी त्याच्या बाजूला उभ्या होत्या आणि आपल्या हाताची पकड त्याच्या हातावर होती .  मग त्या प्रत्येक तरुणांभोवती दोन दोन मैत्रिणी उभ्या राहिल्या.
"परत तिला हात लावलास तर मुळापासून उखडून टाकू आम्ही .... तिला एकटी समजू नकोस ..आम्ही आहोत तिच्यासोबत . ती वेगळी नाहीय ..तर आमचाच भाग आहे ती...ती कोणत्या जातीची धर्माची आहे याची आम्हाला माहिती नाही पण ती आमची मैत्रीण आहे हेच माहिती आहे आम्हाला .." त्यांच्या डोळ्यातील अंगार पाहून तो हादरला . मुकाट्याने मान खाली घालून चालू पडला त्याच्या मागे इतरही निघाले . काही घडलेच नसल्याचे दाखवत त्या परत हसत खिदळत चालू लागल्या.
होय त्या देवीच आहेत.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment