Thursday, October 18, 2018

नववी माळ ... रंग ..???

नववी माळ ....रंग ...?????
तश्या त्या दोघी सासूसुना पण ते नाते कधीच जाणवले नाही .सासरे 65 च्या युद्धात शाहिद झाले पण सासूने ते दुःख चेहऱ्यावर कधीच येऊ दिले नाही.कारण ते दुःख नव्हतेच मुळी..... तिला सार्थ अभिमान होता तिच्या नवऱ्याचा.वीरपत्नी होण्याचं भाग्य प्रत्येक स्त्रीला नाही लाभत...... विधवा म्हणून ती कधी जगली नाही. नवरात्री आली की तिच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत असायचा. सगळ्या रंगाच्या साड्यांनी तिचं कपाट भरलेलं असे. आजही ती आजच्या रंगाची साडी नेसून सुनेबरोबर तयार झाली होती. सूनही तशीच हौशी. नवरा कमांडो म्हणून सैन्यात रोज मृत्यूशी खेळत होता. पण ती आनंदात असे. कारण एकच...! सैनिकाची पत्नीसुद्धा तशीच जिगरबाज असते. हिच्या लग्नाआधीच सासऱ्याला वीरमरण आले होते.
"सासूबाई पडा आता बाहेर... नंतर मंडपात गर्दी होईल...." असे बोलून तिने घरातील पसारा आवरला. दोघीही एकाच रंगाच्या साडीत अगदी खुलून दिसत होत्या. घरात तसे पुरुष माणूस कोणीच नव्हते. बाहेर पडणार इतक्यात सुनेचा मोबाइल खणाणला. अनोळखी नंबर पाहून तिने कट केला . पण ताबडतोब सासूचा मोबाईल वाजू लागला . तिने फोन कानाला लावला ..आणि पलीकडून काही ऐकताच तिच्या हातातील मोबाईल गळून पडला, डोळ्यांतून खळ्ळकन पाणी आले. सुनेला समजले काहीतरी घडले आहे नक्की.... तिने धावत पुढे जाऊन सासूला सावरले. फोन कानाला लावला पण फोन बंद झाला होता.
तिने थोडा वेळ सासूला सावरू दिले मग हळूच विचारले" काय झाले आई ...."???
"आज तुझ्या नवऱ्याने..माझ्या मुलाने ..देशासाठी बलिदान दिले "सासूने थंडपणे आपल्या सुनेला सांगितले. सून हादरून गेली. अतिशय शांतपणे तिने हा धक्का पचवला. आपल्या सासूलातेव्हा  काय वाटले असेल ते तिला आता समजले. ती उठली शांतपणे सासूला उठवले. "चला आई ...आज शेवटची माळ आहे. देवीचे दर्शन करून येऊ .तीच आपली शक्ती आहे".
दोघी उठल्या इतक्यात पुन्हा फोन वाजला. सुनेने फोन उचलला आणि क्षणभर तिच्या चेहऱ्यावर हास्य चमकून गेले. सासूने धडधडत्या अंतःकरणाने विचारले "काय झाले....??
"आपल्या घरातून अजून एक जवान भारतमातेसाठी बलिदान देण्यास सज्ज झाला आहे... तुमचा नातू, माझा मुलगा मिलिटरी अकॅडमी मधून बेस्ट कॅडेट म्हणून निवडला गेलाय"ती गर्वाने सासुकडे पाहून म्हणाली .
दोघीही स्मित करून एकमेकींचा आधार घेऊन देवीच्या मंडपाकडे  चालू लागल्या. होय त्या देवीचं आहेत .

© श्री . किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment