Tuesday, October 16, 2018

सातवी माळ ...रंग ....??

सातवी माळ ... रंग...??
तिची सकाळ नेहमीप्रमाणे उजाडली.सून नेहमीप्रमाणे झोपून होती.मुलगा कामावर गेला होता.स्वतःची तयारी करून ती सवयीनुसार पार्काकडे वळली.फेऱ्या मारता मारता तिला नातवाबरोबर झालेले कालचे बोलणे आठवत होते.
"आजी वृद्धाश्रम म्हणजे काय ग.....?? असा प्रश्न येताच ती चमकली होती.गेल्या काही दिवसांपासून तिला जो संशय येत होता तो पक्का झाला.आपली रवानगी  वृद्धाश्रमात होणार याची तिला खात्री पटली.आज आपल्याच मुलांना आपण नकोय ही जाणीवच वेदनादायी होती .
फेऱ्या पूर्ण झाल्यावर नेहमीप्रमाणे ती आपल्या ग्रुपमध्ये जाऊन बसली.सगळे हसत खेळत गप्पा मारत होते तरी तिचे लक्ष त्यात नव्हतेच.त्याचवेळी दुसरी राऊंड संपवून आली.आल्याआल्या तिने जाहिर केले ...."उद्यापासून मी तुमच्यात नाही .माझी रवानगी वृद्धाश्रमात होणार". सांगताना डोळ्यातील अश्रू काही थांबले नाहीत. सगळेच शांत झाले..... आज ना उद्या त्यातील काहीजणांवर हि परिस्थिती येणारच होती.
मग दबक्या आवाजात चर्चा चालू झाली .ही काहीतरी ठरवून उठली .दुसरीला समान घेऊन दुपारी घरी ये असे सांगून निघाली.कसलातरी ठाम निश्चय तिच्या चेहऱ्यावर दिसत होता .
घरी येऊन तयार झाली . कधी नव्हे तर आज तिने  आजचा रंग पाहून साडी नेसली . सुन आश्चर्याने पाहत बसली. दुपारी दुसरी बावरलेल्या नजरेने घरात शिरली . आजच्याच रंगाची साडी तिनेही नेसली होती .
सुनेने तिच्याकडे पाहून प्रश्नार्थक चेहरा केला "मीच बोलावले तिला ..आजपासून ही आपल्याकडे राहणार आहे.माझ्या सोबत ....."हे ऐकूनच सून उडाली "काय....?? यांचे करेल कोण ....?? मुले नाहीत का त्यांना ... ते बघत नाहीत का ..."??? तिच्या प्रश्नांची सबरबत्ती चालू झाली ."आहेत ना ... सगळे आहेत .. पण बघत कोणीच नाही ...म्हणून तिला वृद्धाश्रमात ठेवणार आहेत ...जसे तुम्ही मला पाठवणार आहात. म्हणून म्हटले तिथे कशाला जातेस माझ्याकडे ये . आपण दोघे राहू इथे ..."ती हसत सुनेला म्हणाली.
" असे कसे ....आम्ही नाही बघणार तिला...तसेही आम्ही तुम्हालाही वृद्धाश्रमात पाठविणार आहोत.." ती चिडून म्हणाली .
"हो का ... !! त्यापेक्षा तुम्हीच इथून का जात नाही . आपले वकील संध्याकाळी येतायत .त्यांना सांगूनच तुम्हाला बाहेर काढते . ह्यांना आधीच सर्व गोष्टींची कल्पना होती म्हणून घर माझ्यानावावर करून गेले .तेव्हा उद्यापासून तुमची सोय तुम्ही बघा .."हे ऐकताच सुनेचा चेहरा पडला.ती तणतणत आत निघून गेली.तसे हिने हसत दुसरीच्या हातावर टाळी दिली आणि म्हणाली "उद्या तुझ्या घरी जाऊ .वकीलाशी बोलून ठेवलेय.... दोघीही हसू लागल्या.
होय त्या देवीच आहेत .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment