Sunday, November 12, 2023

The good The bad and The ugly ( 1966 )

The good The bad  and The ugly  ( 1966 )
 द गुड द बॅड अँड द अग्लि
ही  1862 सालातील अमेरिकन सिव्हिल वॉरच्या काळात घडलेली घटना आहे. ब्लँडी हा निष्णात गन फायटर .खरे तर त्याला काहीच नाव नाहीय .
टुको नावाच्या गुंडाशी संगनमत करून पैसे कमवीत असतो.जिथे जिथे टुकोवर इनाम लागलेय तिथे त्याला हजर करून बक्षीस घ्यायचे आणि फाशी देताना त्याला पळवून न्यायचे. 
पण एक दिवस तो टुकोला धोका देतो आणि संधी मिळताच टुको त्याला वाळवंटात मैलोनमैल चालायला लावतो .मरणाच्या दारात असताना अमेरिकन सैनिकांची एक घोडागाडी दिसते.त्यातील एक सैनिक मरणापूर्वी ब्लँडीच्या कानात एका कबरीतल्या सोन्याचे रहस्य सांगतो. आता टुकोला त्या खजिन्यासाठी तरी ब्लँडीला जिवंत ठेवावे लागेल.
एंजल आय एक खाजगी मारेकरी.त्यालाही खजिन्याची कबर शोधायची आहे.टुको आणि ब्लँडीकडे त्या कबरीची माहिती आहे असे कळते.तो दोघांना घेऊन तो खजिना शोधायला निघतो . पण खजिना कोणाला मिळणार ?
सुप्रसिद्ध दिग्दर्शक सर्जीओ लिओनचा डॉलर ट्रायोलॉजी मधील हा चित्रपट. 
या चित्रपटाने अभिनेता क्लिंट ईस्टवूडला नाव मिळवून दिले. बराचसा चित्रपट क्लोजअप शॉटमध्ये चित्रित केलाय.चित्रपटातील पात्रे डोळ्याच्या भाषेतून बरेच काही बोलतात. यात लॉंग शॉटही खूप परिणामकारक आहेत.
पण चित्रपटात सर्वात जास्त परिणामकारक आहे ते पार्श्वसंगीत. याची थीम जगप्रसिद्ध आहे.अंगावर शहारे आणणारी ही थीम सतत आपल्याला भीतीची जाणीव करून देत राहते.आजही ही थीम अनेकजणांची मोबाईल ट्यून आहे .
क्लिंट ईस्टवूडची खुरटी दाढी ,भेदक डोळे , तोंडात छोटा सिगार ठेवून पुटपुटणे आणि डोळ्यांचे पाते लवते न लवते इतक्या वेगात बंदूक झाडणे बघण्यासारखे आहे . जोडीला ली वान क्लीफ आणि एली वालच आहे.
साधारण पावणेतीन तासांचा हा चित्रपट आपल्याला श्वास रोखून  वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो.
प्राईम व्हिडिओवर  चुकवू नये असा हा चित्रपट आहे.

No comments:

Post a Comment