Sunday, August 13, 2017

समुपदेश

नित्यानंदला इतका संतापलेला मी कधीच पाहीला नव्हता.टपरीवर चहाचा घोट घेताच अण्णावर चढला. चहा करायला जमत नसेल तर परत गावी जा असेही म्हणाला.तेव्हाच मी समजलो आज काहीतरी गडबड झालीय.थोडा वेळ जाऊ दिला तर बरोबर स्वतःहून बोलेल हे माहीत होते म्हणून मी शांत राहायचे ठरविले.
थोड्यावेळाने शेजारून जाणाऱ्या सुंदर बाईंकडे पाहत माझ्याकडे डोळे मिचकावले तेव्हा मी समजलो साहेब मूळस्वभावर आले आहेत.
"काय झाले रे चिडायला ? निलीमाशी भांडण का"?
"ह्या .. मी तिच्यापुढे आवाज चढवतो का" ??  तो हसून म्हणाला.
"मग "..मी हसून विचारले .
"अरे !! माझ्या मुलाच्या मोबाइलमध्ये विडिओ क्लिप सापडली .धक्काच बसला मला .च्यायला चांगलेच तुडवले त्याला .डोकेच आउट झाले .ह्यासाठीच मोबाईल दिला आहे का ?? आता रोज लक्ष देणार त्याच्याकडे".तो चिडून म्हणाला.
"म्हणजे हे कळले नसते तर तू लक्ष दिले नसतेस का मंदारकडे"? .मी असे विचारातच तो चपापला.
"तसे नाही रे माझे लक्ष होतेच म्हणूनच हे सापडले ना" त्याने बाजू सावरली.
"मग ?? यापुढे तो असे करणार नाही याची खात्री आहे का तुला ? मार देऊन प्रॉब्लेम सुटला असे वाटते का तुला ?मी हसून विचारले.
" मग काय करू सायबा"?? त्याने छद्मीपणेच विचारले.
"मलाही माहीत नाही. पण काहीतरी आपल्यापरीने केले पाहिजेत ना "? तुही तसली पुस्तके वाचत होतास की ? व्हीसीआर आणून व्हिडीओ पाहत होतोच की रात्रभर आपण .अजूनही तुझ्या मोबाइलमध्ये काही क्लिप असतीलच ना ?? मग मुलाला बोलून काय उपयोग ?? हे सर्व निसर्ग नियमानुसार प्रत्येकाच्या आयुष्यात त्या त्या वेळी येतेच . फक्त ती भावना कशी हँडल करायची हे शिकवता  आले पाहिजे "?मी स्पष्टपणे सांगून पाहिले.
"काय शिकवायचे ?? आपण जोडीने हे बघू "?? नित्यानंद परत तिरसटला.
"बघायला कशाला पाहिजे ?? तू बोल स्पष्ट त्याच्याशी . तुझ्याकडे असलेले ज्ञान तू दे त्याला .त्याला यातील फायदे तोटे समजावं".
"पण त्यासाठी वेळ पाहिजे भाऊ" त्याचे नेहमीचे कारण.
इतरगोष्टीसाठी वेळ आहे तुझ्याकडे ?? मुलाबरोबर बोलायला नाही ?? तुम्ही त्याच्याशी चांगल्या वाईट गोष्टींची चर्चा का नाही करू शकत . वयात येताना येणाऱ्या नैसर्गिक भावना .शरीरात होणारे बदल.शरीराची घ्यायची काळजी .मुलींकडे ,स्त्रियांकडे बघण्याची नजर. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मुलांशी बोलत आल्या पाहिजे .इतर मित्रांकडून चुकीचे ज्ञान मिळण्यापेक्षा आपण ते दिलेले चांगले नाही का" ?मी जरा जोरातच बोललो.
  "पण अश्या गोष्टी मुलांशी कश्या बोलणार ?? खूपच ओकवर्ड फील होते".
"हो मलाही याची कल्पना आहे. पण हे असे डायरेक्ट भलतेसलते दुसऱ्यांकडून ऐकण्यापेक्षा आपण पुढाकार घेतलेला बरा . शेवटी आपली मुले आहे .आपल्यासमोर वाया जाऊ नये म्हणून हे केलेच पाहिजे .प्रथम त्यांची आपल्याबद्दलची भीती घालवली पाहिजे. मग त्यांचे प्रॉब्लेम समजून घेऊन सोडविले पाहिजे . मोबाईलमुळे आज त्यांच्याकडे भरपूर बरे वाईट ज्ञान आहे .त्यांना प्रॅक्टिकल करायची इच्छा होतेय आणि त्यातूनच ती वाईट मार्ग अवलंबितात.अतिशय नाजूक वळणावर पालक म्हणून आपण उभे आहोत .आपण आपली कर्तव्य चुकलो तर मोठे परिणाम भोगावे लागतील".मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणालो.
"हो खरे आहे तुझे.मी आताच घरी जाऊन मंदारशी बोलतो .तस तो गुणी आहे.हे पहिल्यांदाच घडले त्याच्या हातून .मी निघतो. तू कटिंगचे पैसे देऊन टाक .असे बोलून निघूनही गेला.

© श्री.किरण बोरकर

No comments:

Post a Comment