Thursday, August 17, 2017

कोकण आणि गणेश उत्सव

स्थळ.. मुंबईतील उच्चभ्रू वस्ती असलेले ठिकाण
सुपरस्टार विनयकुमार  शांतपणे आपली बॅग भरत होता .त्याचे खरे नाव विनायक सुर्वे .कोकणातील आपल्या गावी गणपतीसाठी जाण्याची तयारी करीत होता .दरवर्षी गणपतीसाठी गावी जाण्याचा रिवाज अजूनही पाळत होता तो .त्यासाठी त्याने नवीन चित्रपटही नाकारला होता. शंकरलाही आपल्याबरोबर कारने घेऊन जायचे का ?? पण शंकर मानी  आहे .भाऊ असला तरी आपल्याबरोबर येणार नाही याची खात्री होती त्याला .
स्थळ... मुंबईतील एक मध्यमवर्गीय वस्ती
शंकर सुर्वे पोरांच्या पाठीवर धपाटे घालीत आणि बायकोच्या अंगावर ओरडत गावाला जाण्याची तयारी करीत होता . मोठ्या मुश्किलीने सुट्टी मिळाली होती त्याला . नाहीतरी तो गेलाच असता म्हणा .कितीही झाले तरी गणपती उत्सव गावाच्या घरात साजरा करायचा ही परंपरा होती .यावर्षी तरी विनायकचे लग्न होऊदे म्हणून साकडे घालणार होता.लग्न झाले तर दोघे पुढच्यावर्षी पूजेला बसतील . असेल तो मोठा सुपरस्टार पण पहिला भाऊ आहे माझा .
स्थळ .... केरळातील एक कॉर्पोरेट ऑफिस
हातातील पेपर्सवर भराभर सह्या करीत नामदेव सुर्वे आपले काम संपविण्याचा मागे लागला होता . संध्याकाळचे विमान पकडून त्याला मुंबईला जायचे होते .तिथून कोकणात आपल्या गावी . दरवर्षीप्रमाणे यंदाही हा नियम मोडणार नव्हता .तो एका मोठ्या कंपनीत उच्चपदावर काम करीत होता .पुढील दहा दिवसासाठी आपली सर्व कामे सहकाऱ्यांवर सोपवून निघणार होता. यावर्षी तरी शंकरला आपल्याकडे बोलवून छान नोकरी द्यावी असे ठरविले होते . त्या छोट्या चाळीत ,छोट्या कंपनीत काम करून आपले आयुष्य वाया घालवावे हे पटत नव्हते त्याला .
स्थळ....कॅनडा
प्रसिद्ध उद्योगपती अरविंद सुर्वे आपल्या कुटुंबासह विमानतळावर हजर होते .दरवर्षीप्रमाणे यंदाही दहा दिवस कोकणातील आपल्या गावी जायचे असा रिवाज होता त्यांचा . मुले आधी कटकट करायची.आतापर्यंत त्यांनी हुशार प्रसिद्ध उद्योगपती  पहिला होता होता .कोकणातील बाप नाही  . एक आवाज काढताच सरळ झाली .यावर्षी तरी नामदेवला कॅनडात घेऊन यायचे असे ठरविले होते .त्याच्या बुद्धीची कदर इथेच होईल याची खात्री होती त्याला . बघू काय होते .
स्थळ...कोकणातील एक छोटे गाव
सुदाम सुर्वे आपल्या हातातील डेकोरेशनचे सामान सांभाळत घरात शिरला .अजून खूप कामे  बाकी होती.गणपतीला सर्व भाऊ कुटुंबासमवेत घरी येतात याचा त्याला फार अभिमान होता ..आई वडील गेल्यानंतर खूप कष्टाने त्यांना वाढविले होते .आज जो तो आपापल्या क्षेत्रात प्रसिद्ध होते .पण जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी गणपतीसाठी गावी यायचेच .हीच तर खरी कोकणातील परंपरा आहे .
गणेश चतुर्थीचा पहिला दिवस
पारंपरिक वेशात ,डोक्यावर पांढऱ्या शुभ्र टोप्या घालून सारे भाऊ आपल्या मुलासह गणपती घरी घेऊन आले .नऊवारी लुगडे ,नाकात नाथ आणि दागिन्यांनी मढलेल्या आपल्या कुटुंबाकडे पाहून मन आनंदाने भरून गेले .आता दहा दिवस आपले शहरी आयुष्य ,डोक्यावरच्या कामाचा बोजा विसरून  गजाननाच्या चरणी स्वतःला वाहून घेणार होते ते .
© श्री.किरण बोरकर

No comments:

Post a Comment