Tuesday, August 1, 2017

पावतीबुक

सोमवारी सकाळी टेन्शनमध्येच ऑफिसात शिरलो .शुक्रवारी संध्याकाळीच म्हापुसकर गावाला जातोय म्हणून सांगून गेला तेव्हापासूनच आम्ही टेन्शनमध्ये होतो. कारण सोमवारी हा पावतीबुक घेऊन येणार याची आम्हाला खात्री होती.
माझ्यामागूनच म्हापुसकरने प्रसन्न चेहऱ्याने प्रवेश केला."काय मंडळी..असे म्हणत सर्वाना हात दाखवीत टेबलवर आला.थोड्यावेळाने चहा येताच पिशवीतून त्याने शेंगदाण्याचे लाडू ,काजूची पिशवी काढली आणि आमच्या समोर ठेवली.ते पाहूनच आमच्या खिशाला चाट पडणार याची पक्की खात्री झाली.
इकडतिकडच्या बातम्या झाल्यावर त्याने हळूच पावतीबुक काढले ."माझ्या गावच्या देवळाच्या सभोवती फारश्या बसवायच्या आहेत. तरी तुम्ही आर्थिक मदत देऊन धार्मिक कार्याला हातभार लावावा", असे नाटकी ढंगात बोलून माझ्याकडे आला.
"भाऊ पहिला मान तुमचा .पाचशेची फाडु का" ??
"अरे पण दोन वर्षांपूर्वी हेच मंदिर बांधायला हजार रुपये घेऊन गेलास माझ्याकडून आणि नंतर सर्वांकडून काढलेस .कमीतकमी दहा हजार रुपये जमवलेस. आणि नंतर दरवेळेस हे पावतीबुक आणून काहींना काही घेऊन जातोस".मी थोड्या छद्मीपणेच बोललो.
"हो रे बाबा !! काहींना काही चालूच असते बघ .आता मोठे देऊळ बांधायचे तर खर्च होणारच .आठ लाखाचे बजेट दहा लाखावर गेले.देवळाच्या आजूबाजूला घाण होते म्हणून तिथेही फारश्या लावायचे ठरले .परत बजेट वाढले".म्हापुसकर हसून म्हणाला.
"एक विचारू "?? इतका खर्च देवळावर करण्यापेक्षा गावाच्या विकासावर करा ना" ?मी म्हटले.
"अरे ग्रामपंचायत आणि सरकारी योजना आहेत ना त्यासाठी"?देवळाला आम्हीच बघणार.
"बरे ठीक आहे .गावातल्या शाळेसाठी काहीतरी करा ना ?? आज मुंबईच्या शाळेत आणि गावाच्या शाळेत किती फरक आहे .मुलांना सामान मिळत नाही .लांबून उन्हापावसातून चपला ही न घालता येतात .कोणाकडे धड कपडेही नसतात .त्यांच्यासाठी काहीतरी करा .आठ दहा लाखातील पन्नास साठ हजार त्यांच्यासाठी खर्च करा".मी जोरात म्हटले.
"अरे भाऊ किती करणार त्यांच्यासाठी" ?? करू तितके कमीच आहे .सरकारकडून मिळते तरी आपण द्यायचे का"?म्हापुसकर थोड्या गुस्यात म्हणाला.
"काय हरकत आहे ?? आपल्याला जमेल तेव्हडे करू ना"आपल्याच गावातली मुले असतात ती "
" तुझे आपले काहीतरीच".असे म्हणून म्हापुसकर जागेवर जाऊन बसला.पैसे वाचले या आनंदात मीही शांतपणे काम करू लागलो .
दुसऱ्या दिवशी म्हापुसकर आला तोच सरळ माझ्या टेबलसमोर."भाऊ काल घरी गेलो तेव्हा बायकोने मुलाच्या जुन्या कपड्याचा ढीग काढून ठेवला होता .बोहरणीला देणार होती पण शेजारचे कोचरेकर  म्हणाले आदिवासीपाड्यातील मुलांना देतो त्यांना गरज आहे .ते पाहून तुझी आठवण झाली .खरेच काही करू शकतो का आपण" ?मी आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहिले "का नाही ?? खूप काही  करू शकतो .आज मुलांना वाचायला पुस्तके नाहीत. आपण ग्रंथालय बनवू शकतो.किती मुले आहेत शाळेत"?मी उत्सुकतेने विचारले.
"चाळीस तरी असतील.
"अरे वा!!! मग आपण त्यांच्यासाठी गोष्टीची पुस्तके घेऊ .पाच हजारात पन्नास ते साठ पुस्तके येतील.अजून जमले तर एक ड्रॉईग बोर्ड घेऊ.चित्रकलेचे साहित्य घेऊ .मुलांना शाळेत येण्याची गोडी लागली पाहिजे .तू महिन्यातून एकदा गावी जतोसच ना ?? एक तास त्या शाळेत जाऊन घालवं.जसे नवीन देवळासाठी झटतोस तसे मुलांना चांगले शिक्षण आणि जबाबदार नागरिक बनविण्यासाठी झट. तुला देवळासाठी मदत करण्यापेक्षा या गोष्टीला मदत करण्यासाठी लोक आपोआप पुढे येतील .आपण दरवर्षी काहींना काही मदत करू .अरे आपला पैसा आपणच चांगल्या कामासाठी खर्च करू ".ते ऐकून म्हापुसकर खुश झाला .आणि खिशातले पावतीबुक बॅगेत ठेवून दिले .

@ श्री.किरण बोरकर

No comments:

Post a Comment