Saturday, August 19, 2017

विनायक सुर्वे उर्फ विनायकुमार

विनायक सुर्वे उर्फ विनयकुमार
कोकणातील छोट्या गावातून आलेला विनायक सुर्वे तसा अभ्यासात ढ होता .पण व्यावहारिक ज्ञान भरपूर होते .
पाच भावांमध्ये सगळ्यात लहान .आई बाबा लहानपणीच देवाघरी गेलेले .मोठ्या भावाने त्यांना वाढविले .गरिबी काय असते? याचा अनुभव घेतला होता .जगण्यासाठी कष्टच करावे लागतात या मतावर तो ठाम होता.
दशवतारात छोटीछोटी कामे करता करता आपल्यातील गुणांची खात्री पटली त्याला आणि मुंबईत आला .काही दिवस आपल्या मोठ्या भावाच्या घरी राहिला . पण शंकरला स्वतःच्या कुटुंबाचे भागवताना जीव मेटाकुटीला येत होता .पण त्याने आणि वहिनीने कधी तोंडातून तक्रारीचा शब्द काढला नाही .आपल्यातलीच भाजी भाकरी त्याला दिली .पुढे तो मिळेल त्या नाटकात छोटी मोठी कामे करू लागला आणि वेळीअवेळी घरी येण्याच्या कारणावरून भावाचे घर सोडले. शंकरला खूप वाईट वाटले .पुढे हळू हळू चित्रपट, मालिका मिळू लागल्या .काही वर्षातच तो चित्रपतशृष्टीत सुपरस्टार म्हणून ओळखला जाऊ लागला .मुंबईच्या उच्चभ्रू वस्तीत मोठे घर घेतले .दारासमोर गाड्या आल्या .आज त्याने आपल्या चित्रपटात काम करावे यासाठी निर्माते त्याच्या घरासमोर रांग लावू लागले .
मोठा स्टार होऊनही त्याचे पाय अजूनही जमिनीवर होते . भावांचे कष्ट ,गावातील घर, काहीही विसरला नव्हता तो .कामाच्या रगाड्यात गावी जाणे होत नव्हते पण गणपतीला  काहीही करून हजर राहत होता .ते दहा दिवसच त्याचे होते .सर्व सुर्वे कुटुंब एकत्र यायचे .वडीलांसमान असलेल्या मोठ्या भावाच्या चेहऱ्यावरील आनंद वर्षभर हृदयात साठवून ठेवत होता.
आपल्या व्यवसायात विनायक सुर्वे हे नाव शोभत नाही म्हणून विनायकुमार नाव ठेवले .पण गावात कोण विनयकुमार म्हणाला की चिडत असे .विन्या हेच नाव बरे वाटे .
अजूनही अविवाहितच होता तो .दरवर्षी गणपतीला त्याच्या लग्नाचा विषय निघत असे आणि हसून तो टाळत असे .कारकिर्दीला उतरती कळा लागली की लग्न करायचे असे त्याने ठरविले होते . यावर्षी ही गणपतीसाठी दहा दिवस गावी जाणार होता.
एका निर्मात्याने त्याला नवीन चित्रपटाची ऑफर दिली होती.पण शुटिंग गणपती उत्सवात करायचे अशी अट होती .तगडी स्टारकास्ट असलेला चित्रपट त्याने केला असता तर अजून प्रसिद्धीच्या शिखरावर पोचला असता आणि हिंदी चित्रपटसुष्टीची दारे त्याच्यासाठी उघडली असती .पण त्याने नकार दिला.
आता तो शांतपणे आपली बॅग भरत गावी जाण्याची तयारी करत होता .शंकर ,वहिनी आणि त्याच्या मुलांनाही आपल्या बरोबर घेऊन जावे असे त्याला वाटत होते .पण शंकर खूप मानी आहे तो यायला नकार देईल हे त्याला माहित होते .तो नाही मग वहिनी ही नाही आणि मुले ही नाही .शंकरने मोठे घर घ्यावे ,आणि चांगली नोकरी करावी यासाठी मित्रांकडे शब्द टाकायची तयारी होती त्याची पण तो ऐकणार नाही याचीही खात्री होती त्याला.  जाऊदे कोकणी माणूस आपला स्वभाव सोडणार नाही.
आता गणपतीचे दहा दिवस फक्त आपल्या कुटुंबासमवेत घालवायची आणि  मज्जा करायची असे ठरवत विनायक सुर्वे उर्फ विनयकुमार आपल्या कारमध्ये बसला.
© श्री. किरण बोरकर

No comments:

Post a Comment