Monday, August 7, 2017

संवाद

संध्याकाळी अजय जरा घुस्यातच घरात शिरला .निहारच्या डोक्यावर टपली मारून म्हणाला "चिरंजीव!!!!..मोठे झालात तुम्ही " हल्ली निर्णय स्वतः घ्यायला लागलात".
त्याचा आवाज ऐकून अर्चना बाहेर आली आणि डोळ्यांनीच विचारले काय झाले ?
"साहेबांनी क्लासमध्ये एक विषय कमी केला .सरांनी विचारल्यावर सांगतो एका विषयासाठी इतके पैसे भरणे पटत नाही.त्यापेक्षा घरी अभ्यास करेन.अरे बारावी आहे याची.हे वर्ष किती महत्वाचे आहे".
अर्चना हसली.निहार शांतपणे पुस्तकात डोके घालून बसलेला."त्याने निर्णय घेतला आहे ना ?? मग त्याचा तोच जबाबदार .घेऊ दे काही निर्णय त्याला.लहान नाही तो".ती प्रेमाने निहारच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.
"तरीही बापाला विचारायची पद्धत आहे की नाही .उद्या काहीही निर्णय घेईल.अजून लहान आहे तो".अजयच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती.
"राहूदे ...तुम्ही या वयात काय काय धंदे केलेत ते माहीत नाही का मला??तुम्ही लहान होतात का ?? बोलावू का विक्रम भाऊजीना ?? तीन वर्षे सकाळी बॅग आणि डबा घेऊन कुठल्या कॉलेजला जात होते ते शेवटपर्यंत कळले नाही असे बाबा म्हणायचे .डायरेक्ट सर्टिफिकेट दाखवले तेव्हा कळले पोरगा पदवीधर झाला".आता अर्चना जोशातच आली.
निहारला हसू आवरत नव्हते .
अजय काहीसा मावळला."पुरे.. पुरे..तरीही त्याने चर्चा करावी असे वाटते मला.काही निर्णय चुकीचे असू शकतात".अजयने बापाची काळजी व्यक्त केली.
"'पपा आईला सांगितले होते मी .तिने पाठिंबा दिला मला.एक दोन विषय मी घरी बसून आरामात करू शकतो.त्यासाठी जास्त पैसे द्यायची गरज नाही असे वाटले मलाआणि तुम्हीच तर म्हणता आता माझे भविष्य मलाच घडवायचे आहे .मला जास्त मार्क मिळवायच्या स्पर्धेत भाग घ्यायचा नाही . माझ्या मेहनतीने आणि बुद्धीने जेवढे जमेल तेवढे कारेन मी".निहार अर्चना कडे पाहत म्हणाला.
"होय मीच म्हणाले त्याला.आम्ही सांगतो किंवा दुसर्याकडे पाहून काही ठरवू नकोस.तुझी आवड आणि बुद्धी याचा कल पाहून योग्य मार्ग निवड .यशाच्या शिखरावर पोचायला दहा रस्ते असतात.आपल्याला कोणता सोपा पडेल ते आपण निवडायचे".अर्चनाने कबूल केले.
"अरे वा!! मायलेकानी खूपच चर्चा केलेली दिसतेय.नक्की काहीतरी ठरलय". तुमचे अजय कौतुकाने म्हणाला.
"पप्पा खरे सांगू ? रात्री झोपताना तुम्हा दोघांच्या सर्व गप्पा कधी कधी ऐकतो मी.तुम्ही  मोकळेपणाने बोलता एकमेकांशी.भविष्याची स्वप्ने ,वर्तमानातील अडचणी .भूतकाळातील सोनेरी क्षण याची सर्व कल्पना आहे मला .तुम्ही तुमच्या अडचणी माझ्यासमोर आणीत नाही .पण हे सर्व करताना तुम्हा दोघांना किती त्रास होतोय हे कळते मला .मीही या कुटुंबाचा छोटा हिस्सा आहे .जमेल तेवढी जबाबदारी घेतली पाहिजे असे मलाही वाटते .मी मेहनत करून तुमचा भर हलका करू शकतो .मला कलेची,चित्रकलेची आवड आहे ,त्या क्षेत्रात नाव कमवायचे आहे .डॉक्टर,इंजिनियर मी बनू शकणार नाही कारण ते मनापासून आवडत नाही मला .मग त्याक्षेत्रात जाऊन ही मी काही करु शकणार नाही . आणि तुम्हीच तर म्हणता ना मेहनत करणाऱ्याला कोणतेही क्षेत्र अवघड नसते.तो मिळेल त्या क्षेत्रात उंचीवर जाऊ शकतो".
अजयने डोळे वटारून अर्चनाकडे पाहिले."ही सर्व आपली शिकवण आहे वाटते ".
"ह्या..!!  रोज तुमच्याबरोबर कॉलेजला जायला बाहेर पडतो तेव्हा मारत असलेल्या गप्पाचे फळ आहे हे",मिस्किलपणे निहारला जवळ घेत अर्चना म्हणाली.
@ श्री.किरण बोरकर

No comments:

Post a Comment