Friday, August 25, 2017

नामदेव सुर्वे

नामदेव सुर्वे
हातातील महागड्या घड्याळाकडे नजर टाकून नामदेवने आपल्या सेक्रेटरीला केबिनमध्ये बोलावले ."अजून काही राहिले असेल तर घेऊन ये पटकन  नंतर दहा दिवस मी भेटणार नाही ". बोलतानाही त्याचे एक हाताने पेपरवर सह्या करणे चालूच होते.
आज त्याला सर्व कामे संपवून सुट्टीवर जायचे होते . आता दहा/बारा दिवसतरी ऑफिसचे तोंड पाहणार नव्हता.इथून सरळ विमानतळ गाठणार होता तो .आपल्या कुटुंबालाही त्याने तिथेच बोलावले होते . तिथून मुंबई आणि त्यानंतर कारने कोकणातल्या आपल्या आवडत्या गावात .सरळ सुटसुटीत प्लॅन होता त्याचा.
कामे संपवून तो कारने विमानतळाकडे निघाला तेव्हा जुन्या आठवणीत रमून गेला . गावात त्याला सर्व नाम्या बोलायचे . हा घरात तिसरा . मागे शंकर आणि शेवटी विन्या . ते दोघेही अभ्यासात तसे ढ च . पण हा प्रचंड हुशार . मोठ्या भावाने त्याची हुशारी पाहून उच्च शिक्षणासाठी खूप मदत केली . प्रसंगी बायकोचे दागिनेही गहाण टाकले. दादा आणि वाहिनीच त्याचे आईवडील होते .पुढे त्याची बुद्धिमत्ता पाहून केरळातील एक मोठ्या कंपनीने नोकरी दिली . मोठा फ्लॅट गाडी ,भरपूर पगार आणि इतर सोयीसुविधा दिल्या .दादा वहिनी आणि इतर भावाना सोडून येताना डोळ्यात पाणी आले त्याच्या. पण दरवर्षी गणपतीला दहा दिवस तरी गावाला येईन असे वचन देऊन केरळात बस्तान बसविले.
इथल्याच एक सुंदर मुलीशी लग्न केले पण दहा दिवस तरी गावी जावे लागेल ही अट घालूनच.नशिबाने बायको ही सुस्वभावी मिळाली . दक्षिणेकडील असूनही गावाच्या रीतीभाती उत्तम पाळते .गावी वहिनी सांगेल त्याप्रमाणे सर्व करते .मुलनाही सवय लागलीय.बाकीच्या दिवसात उनाडक्या करतील पण गणपतीचे दहा दिवस कुटुंबासोबत हे ठरलेल आहे त्यांच.इकडचे सर्व मित्र चिडवतात त्यांना पण ते लक्ष देत नाही . त्या निमित्ताने सर्व भावंडाना भेटायला मिळले .जाम खुश असतात.विन्या तर काय मोठा स्टार झालाय.पण गावात आल्यावर वाटतच नाही मोठा स्टार आहे . शंकर पहिल्यापासूनच मानी . दरवर्षी सांगतोय माझ्याकडे ये नोकरीला पण विषय टाळतो . यावर्षी परत प्रयत्न करू .मला मोठे करण्यात त्यानेही कष्ट घेतलेत.
दादा ही थकलाय, त्याच्याही भविष्याची सोय करायला हवी.आमची स्वप्न पूर्ण करता करता स्वतःची स्वप्ने मारताना पाहिलंय मी . आताही कसलीच मदत घेत नाही .तरी बरे मुलाच्या अकाउंट मध्ये थोडे थोडे पैसे भरतोय त्याच्या नकळत .ह्यावेळी त्याच्या अकाउंट मध्ये भरु .अरविंदला सांगतो तसे .त्यांना सांभाळायची जबाबदारी आपली आहे .विरोध करायची कोणाच्यात हिम्मत नाही .दादा वहिनींनी आमच्यासाठी केलेल्या कष्टाची जाणीव सर्वाना आहे .
विचार करता करता विमानतळ कधी आले ते कळलेच नाही . त्याने गाडीतून उतरून समोर उभ्या राहिलेल्या कुटुंबियासमवेत विमानतळावर   प्रवेश केला .
© श्री. किरण बोरकर

No comments:

Post a Comment