Sunday, August 20, 2017

शंकर सुर्वे

शंकर सुर्वे
"अरे किती रजा घेशील ?? रजा नाहीत तुझ्याकडे" .मी संतापून शंकरला म्हणालो.तसा शंकर म्हणाला"बिनपगारी झाल्या तरी चालतील पण गणपतीला गावी जाणारच" .मी नाइलाजाने हो म्हटले  आणि शंकरच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.
शंकर सुर्वे आमच्या मेंटेनन्स विभागातील कुशल कामगार . कोकणातील एक लहानशा गावातून आलेला . कितीही अडचण आली तरी गणपतीसाठी रजा मागायला येणारच . आम्हीही खूप त्रास होतोय असे दाखवून त्याची रजा मंजूर करतोच .कारण मनाने खूप निर्मळ असलेला चांगला माणूस आहे तो .
शंकर मोठ्या खुषीतच घरी आला .नेहमीप्रमाणे यंदाही रजेसाठी भांडावे लागले.पण साहेबलोक चांगले आहेत.कटकट करीत का होईना रजा देतात .घरी येऊन पोरांच्या पाठीवर धपाटे घालत बायकोला दम भरत गावी जाण्याची तयारी करायला सुरुवात केली .बाकीच्या भावांचे बरे आहे असल्या कटकटी नाहीत त्यांना. एक मराठी चित्रपटातील सुपरस्टार ,एक केरळमध्ये मोठ्या पदावर अधिकारी .तर एक कॅनडात उद्योगपती .पण कोणाला गर्व नाही हो . वर्षातून एकदा गणपतीसाठी दहा दिवस एकत्र  येतात .अशी संधी कोण सोडेल .पण भावांच्या मोठेपणाचा फायदा कधीच शंकरने उचलला नाही .
शंकर तालुक्यातील आयटीआयमधून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडला . मोठ्या भावावर फार बोजा पडू नये असे त्याला नेहमी वाटायचे . त्यात त्याला मशीनची आवड म्हणून फिटर झाला आणि मिळेल ती नोकरी स्वीकारून मुंबई आला .एक छोट्याश्या चाळीत आपल्या बायको मुलांसह राहत होता  . गावातून मुंबईत कोणीही आले तरी ह्यांच्याकडेच उतरायचे . विन्याही आपल्या उमेदवारीच्या काळात ह्यांच्याकडे राहत होता .काय करणार हा नाटके करून ?? असे रोज शंकर बायकोला बोलायचा. पण त्या बाईने विन्याला खूप धीर दिला हो ..!! आपल्या ताटातील भाकरी त्याला दिली .आज मोठा सुपरस्टार झालाय पण कितीही मोठा झाला तरी पाय जमिनीवर आहेत त्याचे .शेवटी भाऊच आहे आपला.  नेहमी आडून मदत करायला बघतोय.पण हे दोघेही मानी .आहे त्या परिस्थितीत राहतील पण कोणाकडे मदत मागणार नाहीत .
विन्याने लग्न करावे म्हणून मागे लागलेत पण हा पठया काही दाद देत नाही . बाकीचे भाऊ चांगल्या स्थितीत आहेत पण ते त्यांचे नशीब आणि मेहनतीवर वर चढलेत . दरवर्षी गणपतीला न चुकता येतात हेच महत्वाचे आहे . दादाने आई बाबा गेल्यावर आपल्या इच्छा मारून सर्वाना लहानाचे मोठे केले  याची जाणीव सर्वाना आहे . विन्या काल बायकोला फोन करून विचारात होता गाडीने येताय का ? पण ही माझ्या शब्दाबाहेर जायची नाय . नको बोलून मोकळी झाली .अरे आता नेशील एकदा ..नंतर आम्हाला नेहमीसारखे  धक्के खातच प्रवास करायचा आहे ना ?? कशाला नसत्या सवयी ....
यावर्षी परत नाम्या विषय काढेलच नोकरीचा . गेली दोन वर्षं मागे लागलंय केरळला चल माझ्याबरोबर. तिथे नोकरीला लावतो . पण मुंबई आणि गाव सोडून खय जावचा वाटत नाय . पण बघू  त्याचा विचार आता  नको .गणपती होऊन जाऊदे
.
© श्री. किरण बोरकर

No comments:

Post a Comment