Monday, August 14, 2017

शिकारी

आज पुन्हा शिकाऱ्याने शिकार केली.यावेळी शिकार होती चार वर्षांची कोवळी मुलगी.पण तिला मुलगी कसे म्हणू ??अजूनही बाळच होते ते सर्वांसाठी.पण शिकाऱ्याला काय त्याचे?.त्याला फक्त मादी हवीय.आपली भरलेली बंदूक रिकामी करण्यासाठी त्याला साठ वर्षाची वृद्धा ही चालली असती .योनीच्या शोधात फिरत असलेला विकृत हैवान होता तो.परिणामांची त्याला पर्वा नव्हतीच .फक्त अंगावर चढलेली वासना शमवायची होती .आता स्रीद्वेष्टे माझ्या कानात येऊन सांगतायत बघ म्हणूनच आम्हाला मुलगी नको होती .हे असे घडते मुलींच्या बाबतीत.म्हणजे तुम्हाला शिकारी जन्माला आलेला चालतो का ?? ज्याने केले तो पुरुष हवाय सगळ्यांना.अन्याय होणारी स्त्री नको .मुलगी असेल तर रात्री बाहेर पडू नकोस आणि मुलगा रात्रभर बाहेर काय करतोय याची चौकशीही नाही करणार .आता आम्ही मोर्चे काढणार ,मेणबत्त्या पेटवणार .त्या शिकाऱ्याला फाशी देणार पण शिकार वाऱ्यावर सोडून देणार .परत दुसरा शिकारी आहेच तयार .
पण मुळात शिकारी तयारच का करावेत ??घरात शिकारी जन्मला त्याचे खूप कौतुक केलात .त्याचे लाड केलात .खिशाला चाट लावून ,भीक मागून, स्वतः अर्धपोटी राहून शिकारी वाढवला .त्यासर्व गडबडीत तो बाहेर काय करतोय याकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही .मग शिकारी निर्ढावला त्याने इतर शिकऱ्यांशी दोस्ती केली .सर्व मिळून शिकारकथा वाचू लागले .शिकारकथेचे विडिओ क्लिप तर त्यांच्याकडे कायम असायचे . ते पाहून त्यांचे शरीर तापून निघायचे .बंदूक तर नेहमी भरलेली असायची .ती मोकळी केली नाही तर खूप त्रासदायक असायचे .किती दिवस ही स्थिती सहन करायची .मग अशी शिकार शोध की पटकन मिळेल .ओरडणार नाहीं.आणि तिच्यावर झालेला हल्ल्याची वाच्यता होणार नाही .आहेत ना अश्या भरपूर .शाळेत जाणाऱ्या .पालकांनी थोडेफार दुर्लक्षित केलेल्या.रस्त्यावर एकट्या फिरणाऱ्या .चढावा हल्ला त्यांच्यावर .आपली वासना शमेपर्यंत तिचा वापर करा आणि नंतर द्या फेकून. कधी थांबणार या गोष्टी .त्यांना कठोर शिक्षा देऊन ???? पण गुन्हा तर झालाय . आता रोज टीव्ही वर चर्चा ,सोशल मीडियावर चर्चा .पण घरात आम्ही मुलांशी बोलणार नाही .ह्याचा अभिनय किती छान तर ती किती बेकार नाचते याची चर्चा आम्ही करूच पण शरीर म्हणजे काय ? त्यांच्या विविध अवयवांचा उपयोग याची चर्चा होणारच नाही .घरात मुलगी जन्माला आली याचे टेन्शन घेण्यापेक्षा मुलगा शिकारी बनणार नाही याची काळजी घ्या .मुळात शिकारी निर्माणच झाला नाही तर शिकार होईलच कशी ???
© श्री.किरण बोरकर

No comments:

Post a Comment