Monday, August 7, 2017

अश्रू

शनिवारी दुपारीच बंड्याचा फोन आला "उद्या येतायका सकाळी वृद्धाश्रमात भेट द्यायला ??
मी म्हटले",अरे उद्या फ्रेंडशिप डे.तुझे प्लॅन्स असतील मित्रांबरोबर"?.
"ह्या ..!! ते संध्याकाळी.आपण सकाळी जाऊन येऊ".बंड्याकडे उत्तर तयार असतेच.
"ओके" !! मीही तयार होतोच.नाहीतरी बरेच दिवस त्याचे ते वृद्धाश्रम बघायची इच्छा होतीच .संधी मिळतेय तर जाऊच.
सकाळी लवकर उठून बंड्याबरोबर निघालो . वाटेत बंड्याने ,चिवडा ,मिठाई ,पत्ते, असे बरेच काही घेतले .आत शिरताच बंड्याला पाहून तिथली मंडळी खुश झाली ."हाय हिरो!!"हाय चिकण्या"!!अश्या हाक सुरू झाल्या .सगळी वृद्ध आजी आजोबा आपले वय विसरून बंड्याला हाका मारीत होते. बंड्याही त्यांच्याशी हसत उत्तरे देत होता .हातातील सर्व वस्तू ऑफिसमध्ये जमा करून फक्त एक छोटा मिठाईचा बॉक्स हातात घेऊन कोपऱ्यातल्या खोलीत शिरला.
त्या खोलीत व्हीलचेअरवर एक वृद्धा बसली होती .पंच्याहत्तर वय असेल तिचे पण चेहऱ्यावरील बुद्धिमत्तेचे तेज काही लपत नव्हते.डोळ्यातही वेगळीच चमक होती.
"ओय बुढी कैसी हो "??? बंड्याने तीला पाहताच आरोळी ठोकली.
"नालायका आहेस कुठे ?? तुझ्या मैत्रिणीला विसरलास की काय "?? तिने खणखणीत आवाजात उत्तर दिले आणि हात पसरले .बंड्या हसत हसत तिच्या मिठीत शिरला .माझी ओळख करून देताच तिने माझ्याकडे पाहून विनयाने हात जोडले.मी खाली वाकून पायाला स्पर्श करायचा प्रयत्न करतात तिने नको नको म्हणत व्हीलचेअर मागे घेतली.
"ही माझी मैत्रीण.थोडी म्हातारी दिसतेय पण लय खोडकर .एकमेकांना शिव्या दिल्याशिवाय दिवस जात नाही आमचा .मेल्यानंतर तिची सर्व इस्टेट माझ्या नावावर करणार आहे म्हणून सहन करतोय तिला".असे बोलून बंड्या हसला.
"काही मिळणार नाही तुला माझ्याकडून.मरणावर टपलायस माझ्या.डायबिटीस आहे हे माहीत असूनही गोड मिठाई आणतोस नेहमी .माझी इस्टेट तुझ्या नाही तर तुझ्या नातवाच्या नावावर करणार आहे मी ".तिनेही जोरात उत्तर दिले.
आश्चर्यचकित झालेला चेहरा पाहून दोघेही हसू लागले . मग ती सांगू लागली."मी जयमाला.पेशाने शिक्षिका ,विद्यार्थ्यातून चांगले नागरिक घडवायची जबाबदारी माझी .एक शाळेत प्रिन्सिपॉल म्हणून निवृत्त झाले .घरात नवरा आणि मी .मुलगा हुशार म्हणून बाहेर गेला आणि तीकडचीच गोडी लागली मग तीकडचाच झाला .आज कुटुंबाबरोबर सुखात आहे .मुलगी लग्न होऊन चांगल्या घरात गेली .पंचवीस वर्षे संसार केला पण माझ्याइतके  आयुष्य नाही लाभले तिला .पाच वर्षांपूर्वी तीही छोट्या आजाराचे निमित्त होऊन देवाघरी गेली .त्या गोष्टीचा धसका माझ्या नवऱ्याने घेतला आणि त्यातून ते सावरले नाहीच .दोन वर्षात तेही गेले . मुलाने माझ्यासाठी चोवीस तास बाई ठेवली .परदेशातून पैसे पाठवीत राहिला.मलाही हे गुढग्याचे आजारपण सुरू झाले आणि मी ते अंगावर काढले त्याचा परिणाम म्हणून ही व्हीलचेअर माझ्या नशिबात आली .माझ्या अश्या असवस्थेमुळे कुठलीच बाई टीकायची नाही .मुलगी गेल्यावर जावयानी संबंध तोडले.मुलाला इकडे यायची इच्छा नाही .खूप निराश झाले होते मी .शेवटी मुलाने नाईलाजाने वृद्धाश्रमाचा पर्याय आणला आणि मी आनंदाने स्वीकारला .इथे आल्यावर अवतीभोवती सर्व असायचे पण एकटेपणाची भावना काही कमी व्हायची नाही .तेवड्यात बंड्या भेटला .तो आणि त्याचे मित्र अनाथ आणि निराधार व्यक्तींवर आपले नातेवाईक समजून अंत्यसंस्कार  करतात.देवा ..!! असेही लोक असतात तर समाजात.मग हे लोक मला आपले वाटू लागले .हा बंड्या नेहमी हसरा .याला दुःख म्हणजे काय ते माहीत नसावे असेच वाटते .कोणाच्या अंत्यसंस्काराची तयारी करताना याचा चेहरा गंभीर पण डोळ्यात दुःख दिसत नाही .पहिल्यांदा मला भेटला तेव्हा मिठाईचा तुकडा हाती दिला. मी म्हणाले मला डायबिटीस आहे .तर म्हणाला असे किती वर्षे जगायचे आहे तुम्हाला . पुरे झाले आता आयुष्याची आणि तब्बेतीची काळजी करत जगणे .मरण लवकर येऊ दे बोलता पण तब्बेतीची काळजी घेता .खा गप तेवढीच वर्षे कमी होतील .मन मारून जगू नका आणि मेल्यावर मीच येणार आहे तुम्हाला पोचवायला .त्याचे हे प्रवचन ऐकून दिवसभर हसत होते .त्या दिवसापासून माझे आयुष्य बदलून गेले .आता फक्त प्रसन्न राहणे ,स्वतःवर हसणे हेच मला माहितीय ".त्यांचे बोलणे ऐकून आम्ही हसू लागलो .
मी म्हटले "हो ..हा ,असाच आहे .मीही याला कधी गंभीर बघितले नाही.
तशी ती म्हणाली ",होय ,पण बंड्या आज फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने या मैत्रिणीला एक गिफ्ट देशील" ??
तसा बंड्या हसला ",च्यायला या वयातही तुझ्या इच्छा आहेतच का ?? काय पाहिजे ग तुला ?? तुझे अंत्यसंस्कार तर मीच करणार .दिवसही करू का"?
"नको ..!! दिवस नको करुस ,फक्त थोडे रडशील का माझ्यासाठी .आपण मेल्यावर आपल्यासाठी कोणी रडणार नाही ही कल्पनाच काहीतरी वाटते रे . तुला मी मित्र मानते .पण तुही रडणार नाहीस याची खात्री आहे मला .म्हणूनच नाईलाजाने आज तुझे अश्रू मागतेय.देशील का रे ",??ही अनपेक्षित मागणी ऐकताच बंड्या हादरला.एका क्षणासाठी त्याचा चेहरा दुःखाने पिळवटून निघाला .मीही अस्वस्थ झालो.
"च्यायला,म्हातारे काहीही मागतेस"असे म्हणत बंड्याने तिचे हात हातात घेतले .थोडावेळ स्तब्ध होऊन तिच्या डोळ्यात पाहिले आणि डोळे पुसत पराभूत योध्यासारखा खोलीच्या बाहेर पडला.
@ श्री. किरण बोरकर

No comments:

Post a Comment