Thursday, August 17, 2017

तिरस्कार आणि प्रेम

आई बाबांच्या   लग्नाचा बावन्नवा वाढदिवस साधेपणाने करायचे असे प्रमोदने ठरविले तेव्हा मला आश्चर्य वाटले .आई बाबांबद्दल त्याच्या मनात किती प्रेम होते हे आम्हाला माहीत होते .त्यांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस किती झोकात केला होता ते आम्हाला माहीत होतेच . विक्रमला याचे कारण विचारले तर नेहमीप्रमाणे उत्तर आले जेवण मिळतेय ना एक वेळ फुकट ? मग जास्त विचार का करतोयस.?गप जेवू आणि घरी जाऊ.मी हात जोडले .
वाढदिवसाला आम्हा दोघांचेच कुटुंबीय बाहेरचे होते . सर्व मिळून पंधराजण असतील .कार्यक्रम सुरू होताच माईंची थोडी कटकट चालू झाली . अण्णांच्या प्रत्येक वाक्यावर, शब्दावर काहीतरी आक्षेप घेत होत्या . प्रत्येक गोष्टीवर काहीतरी निषेधाचे सूर होतेच .आम्हाला थोडे खटकलेच .पण म्हातारा म्हातारी चे प्रेम असेल म्हणून आम्ही गंभीरपणे घेतले नाही . तरी बाहेर आल्यावर विक्रम बोललाच म्हातारी सरबरलीय.किती कटकट करते.
काही दिवसांनी अण्णा नातवाला घेऊन गार्डनमध्ये बसले होते .मला पाहून हात हलवला.
मी जवळ जाऊन म्हटले "काय अण्णा ?? एकटेच..!! माई कुठेय" ??
ते हळूच हसले ",ती नाही म्हणाली .आता काय तरुण आहोत का गार्डन मध्ये बसून बोलायला? वय झाली आपली .असे म्हणत अर्धा तास लेक्चर दिले . मी आलो ह्याला घेऊन".
" एक विचारू अण्णा" ?? मी शेजारी बसून विचारले  "या वयात प्रेमाने हसत खेळत राहायचे सोडून सतत भांडणे का होत असतात तुमची ".
अण्णा हसले पण त्यात वेदनाच जास्त दिसत होती .
"अरे ह्या वयात चालायचच  अस ,आता उत्तरार्ध चालू झालाय आमचा .थोडीफार उणी दुणी निघणारच .शेवटी बावन्न वर्ष संसार केला आहे आम्ही .अण्णा माझ्या पाठीवर थाप मारून म्हणाले .
"तसे नाही अण्णा ,मी लहानपणापासून तुम्हाला पाहतोय.आदर्श जोडपे म्हणून  तुम्हाला ओळखले जायचे . पण काल माईंचे  वागणे विचित्रच वाटले .इतका राग आहे तुमच्याबद्दल ?? तुमच्या प्रत्येक वाक्याला तिच्याकडे तिरकस उत्तर तयार होते .आणि तुम्ही ही काही बोलत नव्हता .इतके शांत कसे राहता तुम्ही." मी थोडे आग्रहाने विचारले .
अण्णा परत हसले", खरे सांगू भाऊ ?? ,तिला माझा राग नाही येत .तिचे माझ्यावर अजूनही पूर्वी इतकेच प्रेम आहे .पण हल्ली ती जाणवू देत नाही . रात्री अपरात्री मध्येच उठलो की ही पटकन जागी होते .बुधवार,रविवार आठवणीने माझ्या आवडीची मच्छी आणते .उशीर झाला तर  नातवाला काहीतरी करण सांगून फोन करायला लावते.
"पण तरीही इतकी कटकट का करते" मी चकित होऊन विचारले.
"कारण ती तयारी करतेय ?? अण्णांनी शांतपणे उत्तर दिले .
" कसली तयारी "??  मी हादरून गेलो .
"माझे मरण सहन करण्याची.....असे पाहून नकोस . खरे तेच बोलतोय.इतक्या वर्षाचा संसार ,सारी सुखदुःखे एकत्र भोगलेली .कठीण परिस्थितीत एकमेकांना साथ दिलेली .तर पै पै साठवून संसार उभा केलेला . कसे विसरू शकतो आपण?? आणि त्या संसारातील आपला साथीदार अचानक निघून गेला तर ? किती धक्का बसेल दुसऱ्याला.?  तोच धक्का सहन करायची तयारी चालू आहे तिची....आतापासूनच तिरस्कार करायला सुरुवात करायची .इतका तिरस्कार करायचा की मी अचानक गेलो तरी त्याचा धक्का ती सहन करेल ".
"पण अण्णा तुमच्या आधी ती गेली तर ? मी गंभीर झालो.
"पुरुष थोडे धीट असतात .त्यांनी आधीच हा विचार केलेला असतो. स्वतःची दुःखे पुरुष कधीच उघडपणे व्यक्त करीत नाहीत .पण आतल्या आत रडत असतो . आमचे आज ना उद्या जाणे मी स्वीकारलय आणि ती ते पचवायची ताकद निर्माण करतेय .कदाचित हे सर्व नैसर्गिक असावे निसर्गचक्र चालू राहण्यासाठी . काल प्रमोदने  वाढदिवस  घरीच साजरा केला . उगाच लोकांपुढे  तमाशा नको असे त्याला वाटले असेल".असे बोलून त्यांनी नातवाला हाक मारली आणि त्याचा हात धरून घरची वाट धरली .
© श्री. किरण बोरकर

No comments:

Post a Comment