Saturday, February 2, 2019

प्रगती ..१

प्रगती ...१
"आज पहिला पगार झाला तुझा.... पार्टी झालीच पाहिजे." मैत्रिणीने तिच्या पाठीवर थाप मारून म्हटले ."मस्तपैकी खाऊ पिऊ . ."
" हो .....! नक्कीच करू पार्टी. पण मी घरी जाऊन येते. फ्रेश होऊन जाऊ .."तीही हसत हसत म्हणाली.
पहिल्या पगाराचा आनंद काय असतो... हे आज ती अनुभवत होती.ऑफिस सुटल्यावर ती घरी निघाली .अचानक तिची नजर दुकानात ठेवलेल्या पुरणपोळीवर पडली.काहीतरी विचार करून तिने एक पुरणपोळी विकत घेतली.
घरी आली तेव्हा आई नेहमीप्रमाणे शिलाई मशीनवर बसली होती. गेली कित्येक वर्षे ती तिला ह्याच पोझिशनमध्ये पाहत होती . समोर बाबांचा फोटो .तिची चाहूल लागताच आई नेहमीप्रमाणे गोड हसली.
"चहा आहे ....तो घे गरम करून .."ती मुकाटपणे आत गेली. नेहमीसारखा एक कप चहा गॅसवर होता . काही न बोलता ती गरम चहा आणि पुरणपोळी घेऊन आईच्या पुढ्यात आली आणि प्लेट तिच्यासमोर ठेवली.पुरणपोळी पाहताच आई चमकली.
"आज तू चहा आणि पोळी खा ..."तिने आईला सांगितले .भरल्या डोळ्यांनी आईने अर्धी पोळी तिच्या समोर ठेवली.
' तू खा ...मला भूक नाही .यापुढे आपल्या पोळीचे कधीच दोन तुकडे होणार नाहीत आई .आजपासून प्रत्येकाला पूर्ण वाटा मिळेल.माझा पगार झालाय.."
आईच्या अश्रूंने भिजलेल्या पुरणपोळीची चव अप्रतिम होती.
© किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment