Friday, February 15, 2019

हॅपी व्हॅलेंटाईन डे

हॅपी व्हॅलेंटाईन डे
ती बस स्टॉपवर उभी असायची तेव्हा नेमका हा तिच्यासमोरून बाईकवर बसून जायचा. दिसायला तसा काही तो हँडसम नव्हता पण चेहऱ्यावर एक निरागस हास्य विलसत असायचे. तीही हल्लीच या शहरात बदली होऊनआली होती.ऑफिस आणि सहकारी तिच्यासाठी नवीन होते सतत दोन दिवस तो तिच्यासमोरून गेला .तिसऱ्या दिवशी टी टाइम मध्ये तिला तो तिच्याच कमर्शियल कॉम्प्लेक्समधून बाहेर पडताना दिसला. तिच्याकडे एक नजर टाकून त्याने बाईक चालू केली .पण नजरेत ओळख होती .पाठीवर रेंगाळलेली तिची नजर त्याला जाणवत होती.
दुसऱ्या दिवशी त्याची बाईक तिच्याजवळ थांबली . "चला सोडतो तुम्हाला ....."त्याचे हास्य पाहून ती भारावली . काही न बोलता ती मागे बसली .कॉम्प्लेक्समध्ये बाईक पार्कजवळ येताच तिने सहज सांगितले मी पाचव्या मजल्यावर आहे . तो म्हणाला मी तिसऱ्या मजल्यावर आयटी मध्ये .ती बाय करून निघाली .टी टाईमला तिची नजर त्याला शोधू लागली . तो बाईकजवळ उभा होता"चहा पिवूया ..."? तिने सहज विचारले . तो मुकाटपणे तिच्या मागून कॉफी शॉप मध्ये शिरला. बोलता बोलता एकमेकांबद्दल बोलून झाले . मोबाईल नो शेयर झाला.
मग दुसऱ्या दिवशीपासून रोजचे वेळापत्रक चालू झाले . सकाळी एकत्र जाणे ..दुपारी चहा ..कधीतरी संध्याकाळी सिनेमा किंवा बीचवर फिरणे .एके दिवशी बोलता बोलता त्याने तिचा हात सहजपणे हाती घेतला तिनेही काही विरोध दर्शविला नाही . एक सहज झालेली कृती होती ती.
आज व्हॅलेंटाईन डे होता . तिने त्याला घरीच बोलावले होते. तिची रूम पार्टनर बाहेरच जाणार होती . बाहेर त्या गर्दीत फिरण्यापेक्षा घरीच बोलत बसू असा प्रस्ताव तिने ठेवला.सकाळीच त्याने हातात केक आणि चॉकलेट बॉक्स घेऊन तिच्या घरात प्रवेश केला . एक अनामिक हुरहूर दोघांना जाणवत होती . बोलता बोलता दोघे शरीराने  कधी जवळ आले ते कळलेच  नाही . संध्याकाळी काही अनिच्छेनेच घरातून बाहेर पडला.
बाहेर पडताच त्याने एक फोन केला "साहेब ...आता दुसऱ्या ऑफिसचे काम द्या मला .इथल्या डिलिव्हरीचे काम खूप कमी झालेय . थोडे लांब असले तरी चालेल पण इथे नको.."स्वतःशी हसत हसत तो घरी निघाला.
संध्याकाळी मित्रांसोबत तो नेहमीच्या बारमध्ये शिरला."चला ...आज अजून एक लिस्टमध्ये ऍड झाली.उद्यापासून दुसरीचा शोध घेऊ .समोरच्या बिल्डिंगमध्ये नुकतीच एक भाड्याने राहायला आलीय. पुढच्या व्हॅलेंटाईन डे पर्यंत तिचा नंबर लागेलच  आणि नंतर  तिचीही बदली होईल....चला बियर प्या आज माझ्यातर्फे .. हॅपी व्हॅलेंटाईन डे ... चियर्स ..
© श्री.किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment